शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबध्द - अपर आयुक्त सुरेश वानखेडे

आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबध्द -अपर आयुक्त सुरेश वानखेडे · जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा · आदिवासी विकास विभागाव्दारे गुणगौरव सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन अमरावती, दि. 9 : जगातील सर्व देशांमध्ये आदिवासी समाजाचे लोक राहतात. त्यांची भाषा, संस्कृती, सण-उत्सव, चालीरीती, पेहराव या सर्व गोष्टी वेगळ्या आहेत. आदिवासी जमातींचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी, त्यांची संस्कृती आणि आदर-सन्मान जतन करण्यासाठी आदिवासी दिन सर्वत्र साजरा करण्यात येतो. आदिवासी बांधवांच्या सर्वांगिण विकासासाठी विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या आदिवासी घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे, अशा सूचना अपर आयुक्त (आदिवासी विकास) सुरेश वानखेडे यांनी संबंधित यंत्रणांना आज केल्या. आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थींच्या गुणगौरव सोहळा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनातून जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 9 ऑगस्ट, जागतिक आदिवासी दिनानिमित्त येथील आदिवासी विकास विभागाव्दारे कार्यालयाच्या परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून पोलीस उप आयुक्त सागर पाटील व प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ कोषागार अधिकारी श्रीमती शिल्पा पवार, माजी महापौर वंदनाताई कंगाले उपस्थित होत्या. तसेच ज्येष्ठ आदिवासी समाजसेविका श्रीमती महानंदाताई टेकाम, आदिवासी समाजसेवक विठ्ठल मरापे, रामेश्वर इवनाथे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती. प्रारंभी थोर पुरुषांच्या पुजन व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कलावैभव शिक्षण संस्थेव्दारे प्रशिक्षित चिरोडी शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थीनींनी यावेळी स्वागत गीत सादर केले. विभाग अधिनस्त आदिवासी आश्रमशाळा व वसतीगृहाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी विविध आदिवासी नृत्य सादर केले. चिरोडी शासकीय आश्रमशाळेतील इयत्ता तिसरीच्या कु. उन्नती मरकाम व इयत्ता चौथीच्या कु. रेणु बेठेकर या चिमुकल्या विद्यार्थीनींनी आदिवासी दिनानिमित्त सुंदर भाषण दिले. कार्यक्रमाला उपस्थित विशेष व प्रमुख अतिथी तसेच आदिवासी समाजसेवकांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीच्या वाटचालीसंबंधी त्यांचे मनोगत व्यक्त केले. यावेळी अमरावती आदिवासी विकास विभागांतर्गत एकूण सात प्रकल्पातील प्रकल्पनिहाय उत्कृष्ट आश्रमशाळा व रंगबिरंगी आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच अपर आयुक्त कार्यालय, प्रकल्प कार्यालय तसेच आश्रमशाळा व वसतिगृहातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वर्ग-1 ते वर्ग-4 संवर्गातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देऊन गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अपर आयुक्त सुरेश वानखेडे अमरावती यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा