बुधवार, १२ मार्च, २०२५

शंभर दिवसाच्या कृती आराखड्याची सर्व कार्यालयांनी अंमलबजावणी करावी - विभागीय आयुक्त श्वेता सिंघल.

शंभर दिवसाच्या कृती आराखड्याची सर्व कार्यालयांनी अंमलबजावणी करावी - विभागीय आयुक्त श्वेता सिंघल. अमरावती दि. 12 : राज्य शासनाने शंभर दिवसासांठी सात कलमी कृती आराखडा निश्चित केला असून अमरावती विभागातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी असे निर्देश अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी दिले. विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक, महानगर पालिका आयुक्त, आणि सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांची दूरदृश्य प्रणालीमार्फत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सर्व संबंधित विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. क्षेत्रीय कार्यालयाच्या कृती आराखड्यातील कामांचा आढावा घेऊन विभागीय आयुक्त सिंघल पुढे म्हणाल्या की, राज्य शासनाने प्रशासनिक विभागासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा निश्चित केला असून त्याच धर्तीवर क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांकरिता 7 मुद्यावर प्रभावी कार्यवाही करणे अपेक्षित आहे. त्यामध्ये 1) संकेतस्थळ 2) सुकर जीवनमान 3) स्वच्छता 4) जनतेच्या तक्रारीचे निवारण 5) कार्यालयातील सोयी सुविधा 6) गुंतवणूक प्रसार आणि 7) क्षेत्रीय कार्यालयांना भेटी याचा समावेश आहे. सर्व विभागाच्या कार्यालयांना या मुद्यावर कार्यवाही करून 15 एप्रिल पर्यंत अहवाल सादर करायचा आहे. अशा कार्यवाहीची पाहणी करण्यात येऊन पुरस्कार देण्याची योजना आहे. प्रत्येक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 10 ते 15 दिवस लक्ष देऊन काम केल्यास कृती आराखड्यातील सर्व बाबींची उत्कृष्ट अंमलबजावणी होऊ शकते. यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे असे सांगून आयुक्त सिंघल म्हणाल्या की, सर्व कार्यालयांच्या इमारतीत साफसफाई, स्वच्छता आणि सुविधांवर भर देण्याची गरज आहे. पिण्याच्या पाण्याची व स्वच्छतागृहाची व्यवस्था चोख असली पाहिजे. सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्त कार्यालयात ह्या सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्याची खातरजमा करावी व कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा सातत्याने आढावा घ्यावा असेही त्या म्हणाल्या. नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करतांनाच कार्यालयातील आस्थापना विषयक बाबींची पूर्तता होईल याची दक्षता घ्यावी असे सांगून आयुक्त सिंघल यांनी ‘आयजीओटी’ या ॲपवर नोंदणी करून प्रशिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन केले. ई ऑफिस प्रणालीच्या वापराचे महत्त्वही त्यांनी विशद केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा