शुक्रवार, २८ मार्च, २०२५
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेत व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रीय कार्यालयास प्रथम पुरस्कार सर्वांच्या सांघिक प्रयत्नामुळे प्रथम पारितोषिकाची प्राप्ती -व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक प्रदीप घुले यांचे मनोगत
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेत
व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रीय कार्यालयास प्रथम पुरस्कार
सर्वांच्या सांघिक प्रयत्नामुळे प्रथम पारितोषिकाची प्राप्ती
-व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण सहसंचालक प्रदीप घुले यांचे मनोगत
अमरावती, दि. 28 : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2024-25 अंतर्गत राज्यस्तरीय पारितोषिक विजेत्यांची नावे राज्य शासनाव्दारे बुधवारी (ता.26 मार्च) जाहीर करण्यात आली आहे. त्यात विभागीय स्तरावर उत्कृष्ट आय.टी.आय.,रोजगार मेळावे, संवाद फोरम या बाबींतर्गत सहसंचालक, व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयास 10 लक्ष रुपयाचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रधान सचिव मनीषा वर्मा, संचालक माधवी सरदेशमुख यांच्या मार्गदर्शन आणि विभागातील सर्व प्राचार्य, शिल्प निदेशक, अधिकारी-कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नामुळे प्रथम पारितोषिक प्राप्त झाला, असे मनोगत सहसंचालक प्रदीप घुले यांनी व्यक्त केले.
पुरस्कारासाठी सादर केलेल्या प्रस्तावात विविध घटकांतर्गत केलेल्या विकासकामांचा श्री. घुले आलेख मांडला. राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेकरीता विभागातील कार्यरत 63 शासकीय आयटीआय व 25 तांत्रिक उच्च माध्यमिक शाळांच्या संसाधनांचा विविध योजनांच्या माध्यमातून विकास करण्यात आला असून 20 ऑगस्ट ते 24 ऑक्टोंबर 2024 दरम्यान हे अभियान उत्तमरित्या राबविण्यात आले आहे. राज्यातील 25 उत्कृष्ट आयटीआय निवडल्यास त्यापैकी 24 आयटीआय हे एकट्या अमरावती विभागात कार्यरत आहेत, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमांतर्गत प्रशासकीय कामांमध्ये सुधारणा, प्रशासन लोकाभिमूख, ई गर्व्हनन्स, वैशिष्ट्यपूर्ण व नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणे, महसूल गोळा करणे, विद्यार्थी हिताच्या दृष्टीने कौशल्याधारित अभ्यासक्रम राबविणे, रोजगार मेळावे आदी घटकांतर्गत विविध विकासकामांचा समावेश असून त्याचे छायाचित्रण स्वरुपात सादरीकरण राज्य शासनास करण्यात आले आहे, असे श्री. घुले यांनी सांगितले.
विभागातील 63 शासकीय आयटीआयमध्ये विद्यार्थीहिताच्या दृष्टीने डिजीटल लायब्ररी, स्मार्ट क्लासरुम, ओपन जीम, रेनवॉटर हारवेस्टींग, लॅन्डस्केपिंग, खेळाचे मैदान निर्माण केले असून सर्व संसाधनयुक्त लॅब्स् -कार्यशाळा विकसित केल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट खेळाडू घडावे यासाठी 16 आयटीआय मध्ये इनडोअऱ बॅडमिंटन हॉल्स विकसित केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना तसेच तांत्रिक कलागुणांना वाव मिळावा म्हणून विभागस्तरीय तंत्र प्रदर्शनी, क्रीडा स्पर्धा, रोजगार मेळावे, संवाद वारी यासारखे विविध उपक्रम राबविले आहेत. कौशल्यपूर्ण विद्यार्थी-विद्यार्थीनी घडावेत यासाठी सहसंचालक कार्यालय येथे कार्यान्वित असलेल्या राज्यातील एकमेव निवासी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विभागातील 350 कार्यरत व नवनियुक्त शिल्प निदेशकांना व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिलेले आहे. अभियान कालावधीत विभागाव्दारे जवळपास 100 रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून यामाध्यमातून सुमारे 5 हजार मुला-मुलींना चांगल्या, नामांकित आस्थांपनांमध्ये नोकरी मिळाली आहे, असे श्री. घुले यांनी सांगितले.
आयटीआय प्रशिक्षण करणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. विद्यार्थी हा केद्रबिंदू ठेवून त्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देवून रोजगार व स्वयंरोजगार उभारण्यासाठी विभागाकडून नियमितपणे मार्गदर्शन व सहाय्य केले जाते.
आगामी काळात विभागातील सर्व आयटीआयमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पीपीई योजनेंतर्गत इलेक्ट्रीकल व्हेईकल, सोलर टेक्नॉलॉजी, आयओटी, एआय टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, टेक्निशीयन मॅकॅट्रोनिक्स यासारखे नवीनतम अधिक मागणी असणारे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात येणार आहे.
तालुका स्तरावरील आयटीआयच्या प्राचार्य, गटनिदेशकांनी आयटी क्षेत्रातील संस्थांच्या धर्तीवर त्यांच्या संस्था विकसित केल्या आहेत. विभागातील सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अभियान कालावधीत उत्तम विकास कार्य केल्याने अमरावती विभागीय कार्यालयास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. राज्यातील सर्व विभागातून अमरावती विभागाने सर्वोत्कृष्ट काम केले आहे, त्याचीच ही फलश्रुती आहे, असेही ते म्हणाले.
त्यांच्या कारकिर्दीत यापूर्वी सन 2010 मध्ये घाटंजी आयटीआयला प्राचार्य असताना राज्यातून तृतीय क्रमांकाचा 4 लक्ष रुपयाचा पुरस्कार मिळाला होता. आता हा दुसऱ्यांदा विभागस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल विभागप्रमुख या नात्याने राज्य शासनाचा आभारी असल्याचे त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा