गुरुवार, १२ जून, २०२५

उपमुख्यमंत्र्यांकडून ज‍िल्ह्यातील व‍िकास कामांचा आढावा यंदा १० कोटी व पुढील वर्षापासून २५ कोटी वृक्षलागवड; विमानतळ विकासाला चालना मिळेल कामे गुणवत्ता राखून वेळेत पूर्ण करावीत - उपमुख्यमंत्री अजित पवार

अकोला द‍ि. 12 : जिल्हा नियोजन समितीचा संपूर्ण न‍िधी योग्य व गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च व्हावा. २०२५-२६ या वर्षात कुठलाही निधी अखर्चित राहता कामा नये. फेब्रुवारीपर्यंत सर्व न‍ियोज‍ित कामे पार पडतील याची दक्षता घ्यावी, असे न‍िर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज येथे दिले. अकोला व वा‍शिम ज‍िल्ह्यातील विविध व‍िकास कामे व योजनांचा अंमलबजावणीचा आढावा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी नियोजन भवनात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार अमोल म‍िटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार किरण सरनाईक, आमदार संजय खोडके, आमदार साज‍िद पठाण, आमदार सईबाई डहाके, अप्पर ज‍िल्‍हाधिकारी प्रमोद गायकवाड, महापा‍लिका आयुक्त सुनील लहाने, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक आदी उपस्थ‍ित होते. बैठकीत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जिल्ह्याचे आर्थिक नियोजन, २०२३-२४ या काळातील कामे व त्यावरील खर्चासंबंधित माहिती घेतली. त्याचप्रमाणे, खरीप हंगामासंदर्भात शेतकरी बांधवांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. शासकीय रुग्णालयांतील वैद्यकीय व्यवस्था व नियोजन याबद्दल सविस्तर माहिती घेतली. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, न‍ियोजन सम‍ितीच्या न‍िधीचा अपेक्ष‍ित कामांवर खर्च होत नाही व अनावश्यक खरेदी आदींबाबत तक्रारी येतात. असे घडता कामा नये. तसे घडल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. निधी संपूर्णपणे खर्च होणे आवश्यक आहे. त्यासाठी मुदतीत नियोजनपूर्वक कामे व्हावीत. फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण कामे पार पाडली पाहिजेत. नाव‍िण्यपूर्ण योजनेत चांगली व भरीव कामे होतील, याची दक्षता बाळगावी. ते पुढे म्हणाले की, खर‍ीप हंगामात कृषी न‍िव‍िष्ठांच्या व‍िक्रीत लिंकींग अज‍िबात खपवून घेणार नाही. थेट गुन्हे दाखल करावे. दोषी कंपनीवरही गुन्हे दाखल करावे. शेतीत व कृषी संशोधनात होण्यासाठी एआयचा वापर शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. कृषी व‍िद्याप‍िठाच्या सहकार्याने तशी प्रात्यक्ष‍िके राबवावी. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती वाढवावी. खरीप प‍ीक कर्ज व‍ितरणाचा आढावाही त्यांनी घेतला. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, शहरातील अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमचे काम गुणवत्तापूर्वक पूर्ण करावे. शहराची 25 वर्षाची भव‍िष्यातील वाढ लक्षात घेऊन त्यानुसार नियोजन ठेवून कामे राबवा. शहरातील विकासकामांसाठी महापा‍लिकेला अत‍िर‍िक्त न‍िधीची आवश्यकता पाहता तसा प्रस्ताव द्यावा. निधी म‍िळवून देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेला पीएम सूर्यघर मोफत व‍ीज योजना जोडली आहे. जास्तीत जास्त गरजूंना त्याचा लाभ म‍िळवून द्यावा. शासनाने शंभर द‍िवस कृती कार्यक्रमानंतर आता 150 दिवस कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यात अधिकाधिक कामे पूर्ण करून योजनांचा लाभ जास्तीत जास्त गरजूंना मिळवून द्यावा. प्रधानमंत्री आवास योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत उद्द‍िष्टपूर्ती व्हावी. गाळमुक्त धरण, गाळयुक्त श‍िवार ही योजना व्यापक प्रमाणावर राबवावी. वैद्यकीय महाविद्यालय व सुपर स्पेशालिटी रूग्णालयाशी संबंधित प्रश्न सोडविण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. विमानतळ पूर्ण होण्यासाठी प्रयत्नरत अकोला येथील व‍िमानतळावर नाईट लँड‍िंग, धावपट्टी व‍िस्तारीकरण व्हावे यादृष्टीने सकारात्मक प्रयत्न करू. धावपट्टीच्या रूंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. विमानतळाचे काम पूर्ण होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यात यंदा १० कोटी झाडे लावणार राज्यात यंदा 10 कोटी वृक्षारोपणाचा प्रकल्प हाती घेतला आहे. पुढील वर्षापासून हे उद्दिष्ट 25 कोटी इतके असेल. त्याचप्रमाणे, कॅम्पाअंतर्गत ३ हजार रू. निधी असून, त्यातून व्यापक कामे राबवली जातील, असेही त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा