गुरुवार, १९ जून, २०२५

दोन वर्षीय बालकाला पालकमंत्र्यांची मदत *साडेतीन लाख रूपयांचे मशिन दिले

अमरावती, दि. 19 : एकांश या दोन वर्षीय बालकाचे कानातील मशिन बसस्थानकावर अनावधानाने हरवले. त्यामुळे बालकाला ऐकण्याची समस्या झाली. परंतू घरची हालाखीची परिस्थिती असल्याने नवीन मशिन घेणेही शक्य नव्हते. मात्र पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मदतीचा हात देऊन या बालकाला साडेतीन लाख रूपयांचे मशिन उपलब्ध करून दिले. कर्णबधिर एकांशवर मोफत कॉकलिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजमध्ये झाली. गेल्या दोन महिन्यांपासून बाळाचा भाषा आणि वाचा विकास होण्यासाठी स्पीच थेरपी दिली जात आहे. स्पीच थेरपीसाठी 'साउंड प्रोसेसर' आवश्यक आहे. सदर साऊंड प्रोसेसर पालकांनी विकतही घेतले होते. मात्र उपचारासाठी अमरावती येथे आले असताना बसस्थानकावर मशिन अनावधानाने हरविले. वडील स्वप्नील खडसे यांनी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने साउंड प्रोसेसर खरेदी करणे शक्य नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे मदती विनंती केली. स्पीच थेरणीसाठी साउंड प्रोसेसर अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी श्री. खडसे यांनी जिल्हा नियोजन निधीतूनही मदत करण्याची विनंती केली. मुलाचे आयुष्य वाचवण्यासाठी आणि त्याला सर्वसामान्य जीवन जगता यावे, यासाठी साउंड प्रोसेसर लावणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने जिल्हा प्रशासनाने या प्रकरणी मदत करावी अशी विनंती केली. बसस्थानकावर कानातील मशीन हरवल्यामुळे मागील सहा महिन्यापासून दोन वर्षीय बालक ऐकू, बोलू शकत नव्हता. त्यातच घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे नवीन यंत्रसुद्धा घेण्याची स्थिती नव्हती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबत माहिती आल्यानंतर त्यांनी तातडीने दखल घेत मुख्यमंत्री सहायता निधीला पत्र देऊन एकांतला त्वरीत साडेतीन लाख रूपयांची मशीन उपलब्ध करण्याची विनंती केली. मात्र ही मशीन राज्याच्या कोणत्याच योजनेत येत नसल्यामुळे विशेष बाब म्हणून प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. जिल्हा परिषद आणि पालकमंत्री कार्यालयाच्या पाठपुरावाने एकांशला कर्ण यंत्र मिळाले. त्यामुळे दोन वर्षीय बालकाला आता ऐकता आणि बोलता सुद्धा येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा