गुरुवार, १९ जून, २०२५

अमरावती विभागात 'जिवंत सातबारा' मोहिमेला यश; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक

अमरावती, दि. 19 : महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरू केलेल्या 'जिवंत सातबारा' मोहिमेला अमरावती विभागात चांगला प्रतिसाद मिळाला असून, यामुळे मृत खातेदारांच्या वारसांना मोठा दिलासा मिळाला आहे. वारसांची नोंद शेतजमिनीच्या कागदपत्रांमध्ये, विशेषतः सातबारा उताऱ्यावर, वेळेत न झाल्यामुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी ही मोहीम अत्यंत प्रभावी ठरली आहे. या यशस्वी उपक्रमाबद्दल सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांनी पालकमंत्री महोदयांचे आभार मानले आहेत. मृत खातेदारांच्या वारसांना शेतजमिनीच्या संदर्भात दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित मुदतीत अधिकार अभिलेखात न झाल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन श्री. बावनकुळे यांनी संपूर्ण राज्यात 'जिवंत सातबारा' मोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. गावातील सर्व मृत खातेदारांच्या वारसांच्या सातबारातील नोंदीची प्रक्रिया पूर्ण करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. अमरावती विभागात '100 दिवस कृती आराखडा' कार्यक्रमांतर्गत ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आली. प्राप्त आकडेवारीनुसार, अमरावती विभागातील 56 तालुक्यांमध्ये एकूण 32 हजार 195 खातेदार मृत असल्याचे निदर्शनास आले. यापैकी तब्बल 19 हजार 150 वारसांच्या नावे यशस्वीपणे नोंद घेण्यात आली आहे. अमरावती विभागातील 56 तालुक्यांमध्ये एकूण 32 हजार 195 मृत खातेदार आढळले. 20 हजार 502 वारस नोंदीसाठी अर्ज दाखल झाले, तर 20 हजार 301 प्रकरणांवर निर्णय घेण्यात आला. एकूण 20 हजार 192 फेरफार दाखल झाले, त्यापैकी 19,150 फेरफार मंजूर झाले, तर केवळ 143 फेरफार नामंजूर झाले आहेत. 'जिवंत सातबारा' मोहिमेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या कागदपत्रांबाबत समस्या दूर होण्यास मदत होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा