सोमवार, १६ जून, २०२५
मोझरी, कौंडण्यपूर, वलगाव विकास आराखड्यातील कामांचा आढावा आराखड्यातील उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठी नियोजनपूर्वक प्रस्ताव सादर करा - विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल
अमरावती, दि. 16 : जिल्ह्यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी श्रीक्षेत्र मोझरी, संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव आणि श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे विकास आराखड्याद्वारे संतांच्या अनुयायी, भक्त, नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी मोठा निधी उपलब्ध करून देऊन अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामांना चालना देण्यात आली आहे. विकास आराखड्यातील उर्वरित कामे व नव्याने राबवावयाच्या वैशिष्ट्यपूर्ण कामांबाबत सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विकास आराखडा कार्यकारी समितीच्या अध्यक्षा तथा विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांना आज दिले.
विविध विकास आराखड्यांबाबत कार्यकारी समितीची बैठक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार राजेश वानखडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, उपायुक्त (नियोजन) कावेरी नाखले यांच्यासह कार्यान्वयन यंत्रणांचे अधिकारी तसेच मोझरी, वलगाव, कौंडण्यपूर तीर्थक्षेत्र संस्थांचे विश्वस्त, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. सिंघल म्हणाल्या की, आराखड्यातील प्रत्येक काम वैशिष्ट्यपूर्ण आहे. दर्जेदार सुविधांची निर्मिती याद्वारे होत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या मोझरीच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाने 150 कोटी 83 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे. यातून त्याठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आध्यात्मिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संकुल, ग्रामगीतेवर आधारित ग्रामविकास प्रबोधिनी, ग्रामीण रुग्णालय, स्मृती संग्रहालय, भक्त निवास, महासमाधी सौंदर्यीकरण, बसस्थानक, आयुर्वेदिक रुग्णालय आदी विकासकामे झाली आहेत. पूर्ण झालेल्या इमारतींचे हस्तांतरण तसेच आराखड्यातील उर्वरित कामे लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश डॉ. सिंघल यांनी यावेळी दिले.
विठ्ठल-रुक्मीणीचे तीर्थस्थान असलेल्या कौंडण्यपूर क्षेत्राचा विकास आराखडा 20 कोटी रुपयांचा आहे. यातून त्याठिकाणी मंदीर परिसरातील विकास कामे, घाट बांधकाम व सौंदर्यीकरण, पर्यटक विसावा, बालोद्यान, प्रवेशव्दार/ रिंगण सोहळा, वाहनतळ, सिमेंट रस्ते, पाणी पुरवठा व जलनिस्सारण कामे, विद्युतीकरण आदी कामांना चालना देण्यात आली. आराखड्यातील उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे, असे आदेश विभागीय आयुक्तांनी यावेळी दिले.
संत गाडगेबाबा निर्वाणभूमी वलगाव विकास आराखड्यांतर्गत 37 कोटी 86 लक्ष रुपयांच्या निधीतून विविध कामे राबविण्यात येत आहेत. आराखड्यात पूर संरक्षक भिंतीचे बांधकाम व अस्तित्वातील बांधाची दुरुस्ती-नुतणीकरण, संत गाडगेबाबा समाधीजवळील पेढी नदीवरील घाटाचे बांधकाम, बसस्थानकाचे बांधकाम, समाधीस्थळाचा विकास, समाधीस्थळाच्या बाजूच्या 10 एकर जागेतील विकास कामे, भक्त निवास, खुले सभामंडप, वृध्दाश्रम इमारतीचे बांधकाम, वाहनतळ, स्मशानभूमीचा विकास, वलगाव गावठाणातील अंतर्गत रस्ते, नाल्यांचे बांधकाम आदी कामांचा समावेश असून यातील काही कामे पूर्णत्वास गेली आहे. आराखड्यातील उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे डॉ. सिंघल यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. सिंघल व आमदार श्री. वानखडे यांनी तीनही विकास आराखड्यातील पूर्ण व अपूर्ण कामांचा सविस्तर आढावा घेतला. आराखड्यातील प्रत्येक इमारत बांधकाम व नागरिकांच्या सोयी सुविधांची कामे ही गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असावी, अशा सूचना त्यांनी कार्यान्वयन यंत्रणांना दिल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा