सोमवार, २ जून, २०२५
आजारावर नियंत्रणासाठी संयमी जीवनशैली आवश्यक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिक, दि. २ : नागरिकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे. अशा आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक उपचार पद्धतीसोबत संयमी जीवनशैली आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
श्री साईबाबा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, हार्ट इन्स्टिट्यूट ॲण्ड रिसर्च सेंटर नाशिकच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार हिरामण खोसकर, रुग्णालयाचे प्रमुख डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी, डॉ.पल्लवी धर्माधिकारी, अण्णासाहेब मोरे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, रुग्णालयाला श्री साईबाबा यांचे नाव देण्यात आले आहे. साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जीवनात अंगिकारता आल्यास कुठलाच आजार होऊ शकत नाही. गेल्या काही वर्षात चांगल्या चिकित्सा पद्धती विकसित झाल्याने भारतीयांचे जीवनमान वाढले आहे. साईबाबा हॉस्पिटलमधील आधुनिक उपचार पद्धतींमुळे रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल. सेवा करणे हा रुग्णालय काढण्यामागचा उद्देश असल्याने गरिबातील गरीब माणसाची सेवा येथे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला उत्तम आरोग्य लाभावे, अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा