सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन कार्यक्रम · धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा अभिनव उपक्रम · आवेदन अर्ज सादर करण्याची 15 फेब्रुवारी अंतीम मूदत

अमरावती, दि. 02 : आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी या प्रकल्पाव्दारे शासकीय, अनुदानित व एकलव्य मॉडेल स्कुल या शाळांमध्ये इयत्ता दहावी व बारावीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी नामवंत खाजगी प्रशिक्षण संस्थेच्या सहाय्याने अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी नीट व सीईटी परीक्षांचे मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज संबंधित शाळामार्फत 15 फेब्रुवारीपर्यंत धारणी प्रकल्प कार्यालयास सादर करावी, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ शुक्ला यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. या योजने अंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले तसेच मार्च 2026 मध्ये दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीत प्रवेश दिला जाईल. या कार्यक्रमांतर्गत इच्छुक विद्यार्थ्यांकडून NEET (नीट) व CET (सिईटी)/JEE (जेईई) या परीक्षांची तयारी करुन घेण्यात येईल. योजने अंतर्गत प्रशिक्षणाचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, तसेच विद्यार्थ्यांला अनुसूचित जमाती प्रर्वगाचा जातीचा दाखला प्रवेशावेळी सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असावे. विद्यार्थी मार्च 2026 मध्ये इयत्ता दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ असावा. चाळणी परीक्षा मे 2026 मध्ये घेण्यात येईल. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनपर प्रशिक्षणासाठी विहित नमून्यातील आवेदन पत्र दि. 15 फेब्रुवारीपर्यंत धारणी प्रकल्प कार्यालयास सादर करावीत. नमूद मुदतीनंतर प्राप्त होणारे आवेदन पत्र स्विकारल्या जाणार नाहीत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी व आवेदन अर्जाचा नमूना प्राप्त करण्यासाठी धारणी, प्रकल्प कार्यालयाशी प्रत्यक्षरित्या अथवा दूरध्वनी क्रमांक 07226-224217 आणि poitdp.dharni-mh@gov.in ईमेल यावर संपर्क साधावा, असेही प्रकल्प कार्यालयाव्दारे कळविण्यात आले आहे.

जिल्ह्यात कलम 38 लागू

अमरावती, दि. 2 : जिल्ह्यात शांतता व सुव्य‍वस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस अधीक्षक,अमरावती ग्रामीण विशाल आनंद यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 38 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. प्रतिबंधात्मक आदेश संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तांचे परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 2 फेब्रुवारी ते 31 डिसेंबर 2026 पर्यत लागू करण्यात आला आहे. कोणीही सदर आदेशाचा भंग केल्यास तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 1951 चे कलम 136 अन्वये शिक्षेस पात्र राहील. या कलमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांनी कळविले आहे.

जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समृद्धी शेत पांदन रस्ते व जल पुनर्भरण योजनेची अंमलबजावणी सुरू

अमरावती, दि. 2 : जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या दळणवळणाची समस्या सोडविण्यासाठी आणि पाणी साठा वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संपूर्ण जिल्ह्यात 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समृद्धी शेत पांदन रस्ते व जल पुनर्भरण योजना' राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये बारामाही शेत रस्ते तयार करण्यात येणार असून, यासाठी स्थानिक नदी व नाल्यांमधील गाळ व साहित्याचा वापर केला जाणार आहे, यामुळे जलस्त्रोतांचे खोलीकरण होऊन पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. योजना लोकसहभाग आणि शासकीय निधीच्या संयुक्त विद्यमाने राबविली जाणार आहे. योजनेसाठी प्रति किलोमीटर 9 लाख रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला असून, त्यापैकी 7.5 लाख रुपये शासन देणार आहे, तर उर्वरित 1.5 लाख रुपये संबंधित अशासकीय संस्थेला लोकसहभागातून उभे करावे लागणार आहेत. या कामासाठी रस्ते बांधणीचा अनुभव असलेल्या सेवाभावी संस्थांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. निवड झालेल्या संस्थांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय सामंजस्य करार करणार आहे. या योजनेमुळे शेत रस्त्यांवरील अतिक्रमणे दूर होऊन शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेपर्यंत नेणे अधिक सुलभ होईल, असे उपजिल्हाधिकारी रोहयो यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

रविवार, १ फेब्रुवारी, २०२६

हिंद-दी-चादर' शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवारी 3 फेब्रुवारी, 2026 रोजी रात्री 8.00 वाजता 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत “हिंद-दी-चादर” शहीदी समागम समितीचे सदस्य तथा उपजिल्हाधिकारी जयराम पवार या कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 18 व 19 फेब्रुवारी 2026 रोजी खारघर, नवी मुंबई येथे भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक राज्य तसेच देशातून उपस्थित राहणार आहेत. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे विचार, त्याग आणि मानवतावादी मूल्ये पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनामार्फत विविध जनजागृतीपर तसेच शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही श्री. पवार यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.या कार्यक्रमानिमित्त शीख, शिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहियाल, वाल्मिकी, उदासीन तसेच वारकरी संप्रदाय समुदाय एकत्र सहभागी होत आहेत. या समाजाचा इतिहास, संस्कृती त्यांचे गुरु नानक आणि गुरु तेग बहादुर यांच्याशी कसा संबंध आहे, याबद्दल अधिक माहिती दिली आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षाचे ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करताना, समाजात सलोखा, एकात्मता आणि परंपरेचे संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे उपजिल्हाधिकारी पवार यांनी सांगितले.

कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाजातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी ठरणार महत्त्वाची - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 31 : महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अ‍ॅडव्होकेट ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर' (बीबीएटीआरसी) चे कौतुक करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत या ऐतिहासिक वास्तूचे लोकार्पण केले. याप्रसंगी बोलताना त्यांनी आवर्जून नमूद केले की, ज्याप्रमाणे न्यायमूर्तींसाठी प्रशिक्षण अकॅडमी आहे, त्याप्रमाणे वकिलांसाठी प्रशिक्षण अकॅडमी का नाही, याचे उत्तर बार कौन्सिलने दिले आहे. कायद्याचे शिक्षण आणि प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज (कोर्ट क्राफ्ट) यातील दरी भरून काढण्यासाठी ही अकॅडमी अत्यंत महत्त्वाची ठरेल. तळोजा येथील या अकॅडमीचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते पार पडले. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी भूषविले.यावेळी व्यासपीठावर मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे, भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. अनिल सी. सिंग, महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ.मिलिंद साठे आणि गोव्याचे महाधिवक्ता अ‍ॅड. देविदास पांगम यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने कायदेविषयक प्रशिक्षण आणि संशोधनाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या जागेचा अतिशय उत्तम उपयोग करून अतिशय कमी कालावधीत ही उत्कृष्ट वास्तू उभारली गेली आहे. अकॅडमीच्या इमारतीचे दर्जेदार आणि अल्पावधीत पूर्ण झालेले बांधकाम हे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यशैलीची आठवण करून देणारे असल्याचे सांगून त्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वकिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय हा देशातील पहिलाच निर्णय असून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र यांनी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी विशेष कौतुक केले. बदलते कायदे, नवीन फौजदारी कायदे, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी प्रशिक्षित वकील आणि अभियोजक तयार करणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी अकॅडमीसाठी राज्य शासनाकडून 10 कोटी रुपयांचे अनुदान आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर वितरित केले जाईल, असेही सांगितले. विस्तारित अर्थव्यवस्थेनुसार तंत्रज्ञानातील बदलांशी अनुरूप आपली यंत्रणा प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. पिटिशन ड्राफ्टिंगसाठी एआयचा उपयोग करताना होणाऱ्या धोक्यांबाबतही सतर्क राहायला हवे. संशोधनाशिवाय गुणवत्ता येत नाही, त्यामुळे हे रिसर्च सेंटर भविष्यात दर्जेदार कायदेविषयक संशोधनाचे केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ वकील तथा बीसीएमजीचे अध्यक्ष हर्षद निंबाळकर यांनी केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'विधी महर्षी पुरस्कार' न्यायमूर्ती बी.बी. चव्हाण यांना प्रदान करण्यात आला, तर अमरावतीचे दिवाणी वकील ज्ञानेश्वर बावरेकर यांचा मरणोत्तर पुरस्कार त्यांचे पुत्र अ‍ॅड. संजय बावरेकर यांनी स्वीकारला. या सोहळ्याला बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा (बीसीएमजी) चे उपाध्यक्ष अ‍ॅड. जयंत डी. जायभावे, बीबीएटीआरसीचे अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. उदय पी. वारुंजीकर, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे (बीसीआय) सदस्य अ‍ॅड. आशिष पी. देशमुख आणि समन्वयक व उपाध्यक्ष अ‍ॅड. संग्राम डी. देसाई उपस्थित होते. तसेच बार कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड. मोतीसिंह जी. मोहता, अ‍ॅड. गजानन बी. चव्हाण, अ‍ॅड. मिलिंद एस. पाटील, अ‍ॅड. वंसत डी. साळुंखे, अ‍ॅड. मिलिंद एस. थोबडे, अ‍ॅड. अविनाश जे. भिडे, अ‍ॅड. वसंतराव ई. भोसले, अ‍ॅड. अनिल एम. गोवर्दिपे, अ‍ॅड. विवेकानंद एन. घाटगे, अ‍ॅड. आसिफ एस. कुरेशी, अ‍ॅड. अविनाश बी. आव्हाड, अ‍ॅड. अमोल एस. सावंत, अ‍ॅड. अण्णाराव जी. पाटील, अ‍ॅड. सतीश ए. देशमुख, सीनिअर अ‍ॅड. सुदीप आर. पासबोला, अ‍ॅड. सुभाष जे. घाटगे, अ‍ॅड. विठ्ठल बी. कोंडे-देशमुख, अ‍ॅड. अहमदखान यू. पठाण, अ‍ॅड. राजेंद्र बी. उमाप आणि अ‍ॅड. पारिजात एम. पांडे यांचीही विशेष उपस्थिती लाभली. 000

केंद्रीय अर्थसंकल्प हा युवाकेंद्रित- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन केले आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगतीपथावर वाटचाल करत असताना सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा युवाकेंद्रित, शेतकरीहिताचा आणि सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप असल्याची प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या संदेशात म्हणाल्या की, केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, उद्योग, कृषी व रोजगारनिर्मिती या सर्व क्षेत्रांत केलेल्या ठोस तरतुदी भारताला आत्मनिर्भरतेकडे नेणाऱ्या ठरणार आहेत. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी जाहीर झालेल्या मेट्रो प्रकल्पांसाठीच्या तरतुदी, मुंबई–अहमदाबाद हायस्पीड रेल्वे, तसेच मुंबई–पुणे व पुणे–हैदराबाद उच्चगती रेल्वे कॉरिडॉरच्या घोषणेमुळे राज्याच्या विकासाला नवी गती मिळेल. शहर विकास, नदी पुनरुज्जीवन, कृषी व्यवसाय नेटवर्क आणि ग्रामीण जोडसुधार प्रकल्पांसाठी मिळालेला निधी महाराष्ट्राच्या समतोल विकासाला बळ देणारा आहे. आरोग्य क्षेत्रातील बायोफार्मा धोरण, कॅन्सर व मधुमेहावरील औषधे स्वस्त करण्याचा निर्णय, तसेच सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी ४० हजार कोटींची तरतूद ही भारताच्या ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेसाठी मैलाचा दगड ठरेल. हा अर्थसंकल्प देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निर्णायक ठरेल, असे सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

२०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्प-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सादर केलेला २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात 12 लाख कोटींची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी वसतिगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल. मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. प्रत्येक ग्रोथ हबसाठी 5000 कोटी प्रत्येकी 5 वर्षांत प्राप्त होणार आहेत, त्याचा लाभ मुंबई महानगर (एमएमआर), पुणे महानगर, नागपूर महानगर ग्रोथहबसाठी होणार आहे. #ViksitBharatBudget

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील वर्षा शासकीय निवासस्थानी थोर संत रविदास महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथील वर्षा शासकीय निवासस्थानी थोर संत रविदास महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. @Dev_Fadnavis #SantRavidasJayanti

राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली.

राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली. ‘आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव–शाहू–फुले–आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत आहे.' - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. लोकभवन येथे साधेपणाने आयोजित या #शपथविधी साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्रिमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

शुक्रवार, ३० जानेवारी, २०२६

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेची अंतीम उत्तरसूची जाहिर

अमरावती, दि. ३० : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद‌मार्फत २८ डिसेंबर, २०२५ रोजी इयत्ता आठवीसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://2026.mscenmms.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अशी माहिती आयुक्त अनुराधा ओ‍क यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. या परीक्षेच्या (सॅट व मॅट) विषयाच्या पेपरच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तराबाबत त्रुटी आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन दि. १६ जानेवारी २०२६ अखेरपर्यंत पाठविण्याबाबत प्रसिध्दी निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते. त्यानुसार विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आली आहे. या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन/आक्षेप स्विकारले जाणार नाहीत, तसेच सदर परीक्षेसाठी गुणपडताळणी केली जाणार नाही, याची मुख्याध्यापकांनी, पालकांनी व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. या अंतिम उत्तरसूचीनुसार राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) निकाल यथावकाश. परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असेही परिषदेव्दारे कळविण्यात आले आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधान भवन येथे श्रध्दांजली

मुंबई, दि. 30 : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधान भवन येथे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. विधान भवन इमारतीतील मुख्यप्रवेशद्वाराजवळ त्यांच्या प्रतिमेस सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातर्फे पुष्पहार आणि गुलाबपुष्प अर्पण करण्यात आले. सर्वांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रध्दांजली अर्पण केली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-1 जितेंद्र भोळे, सचिव-2 मेघना तळेकर इटकेलवार, सचिव-3 डॉ. विलास आठवले, सचिव-4 शिवदर्शन साठ्ये, सभापती महाराष्ट्र विधानपरिषद यांचे सचिव पंडित खेडकर, अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांचे सचिव सुनिल वाणी यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात तीव्र दु:ख आणि हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अधिवेशन कामकाजाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वक्तशीरपणा तसेच शिस्तप्रियता स्पष्ट करणाऱ्या अनेक प्रसंगांना यावेळी उजाळा देण्यात आला.

गुरुवार, २९ जानेवारी, २०२६

केंद्रप्रमुख पदासाठी विभागीय स्पर्धा परीक्षा ३ व ४ फेब्रुवारीला ऑनलाइन परीक्षा प्रवेशपत्र www.mscepune.in संकेतस्थळावर उपलब्ध

अमरावती दि. 29 : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हापरिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025” या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने 3 फेब्रुवारी व 4 फेब्रुवारी या कालावधीत प्रत्येक दिवशी तीन सत्रामध्ये आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेचे प्रवेश पत्र ऑनलाइन पद्धतीने 29 जानेवारीपासून www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. परीक्षार्थी उमेदवारांनी www.mscepune.in या संकेतस्थळास भेट द्यावी. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी 1800222366/18001034566 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा. व तसेच काही तक्रार असल्यास http://cgrs.ibps.in/ या लिंकवर तक्रार नोंदवावी. प्रवेशपत्र डाउनलोड करून घेण्यासाठी आवश्यक असलेला लॉगिन आयडी रजिस्ट्रेशन नंबर आवेदनपत्रावर उपलब्ध आहे. तसेच पासवर्ड हा संबंधित उमेदवाराची आवेदनपत्रावरील जन्मतारीख आहे, याची सर्व परीक्षार्थी उमेदवारांनी नोंद घ्यावी असेही महाराष्ट्र परीक्षा परिषदेद्वारे कळविण्यात आले आहे.

बुधवार, २८ जानेवारी, २०२६

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीने मन सुन्न झाले -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. 28 : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, माझे ज्येष्ठ मित्र अजितदादा पवार यांच्या बारामती येथील विमान अपघातातील दुर्दैवी निधनाच्या बातमीने मी अक्षरशः हादरून गेलो आहे. मन सुन्न झाले आहे. या दुःखद बातमीवर अजूनही विश्वास बसत नाही. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला दिशा आणि गती देणारे लोकनेते म्हणून अजितदादांचे व्यक्तिमत्त्व कायम स्मरणात राहील, अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. महसूलमंत्री बावनकुळे म्हणतात, प्रशासनावरची त्यांची मजबूत पकड, कामाचा अफाट वेग आणि लोककल्याणाचा अखंड ध्यास या साऱ्यांमुळे त्यांनी जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. अजितदादांचा प्रशासनातील अनुभव अतिशय समृद्ध होता. अनेकदा मी स्वतः त्यांच्याकडून सल्ला घेत असे. विविध विषयांवर त्यांच्याशी हक्काने चर्चा करीत असे. काम करत असताना अनेक प्रश्नांवर मोकळेपणाने संवाद साधण्याची त्यांची शैली मला नेहमी प्रेरणा देणारी वाटली. त्यांच्या सहवासातून मी स्वतः अनेक गोष्टी शिकलो. अजितदादांचे जाणे हे केवळ एका नेत्याचे जाणे नाही; ते महाराष्ट्रावर कोसळलेले एक मोठे संकट आहे. देशाने एक दूरदृष्टीसंपन्न नेता गमावला आहे आणि मी माझा एक जिवलग ज्येष्ठ मित्र! अजितदादा आता आपल्यात नाहीत ही जाणीव अजूनही मनाला स्वीकारता येत नाही. अजितदादांसह या अपघातात मृत्यु पावलेल्या सर्वांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या, आप्तस्वकीयांच्या आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या दुःखात मी मनापासून सहभागी आहे. असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

उत्तम प्रशासक व कणखर नेतृत्व हरपले - वन मंत्री गणेश नाईक

मुंबई, दि. 28 : आपल्या दूरदर्शी व कणखर नेतृत्वाने राज्याच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटविणारे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकास्मिक निधनाची बातमी अतिशय वेदनादायक आहे. दादांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणातील दादा व्यक्तिमत्व हरपले, अशा शब्दांत वन मंत्री गणेश नाईक यांनी श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्राला लाभलेले एक अनमोल रत्न हरपल्याची भावना नाईक यांनी व्यक्त केली. नाईक यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, अजितदादांच्या कामाप्रति असलेल्या समर्पणाने राज्याच्या विकासाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. स्पष्टवक्ते असले तरी कामाच्या दर्जाच्या बाबतीत ते गंभीर असायचे. कामातील हलगर्जीपणा त्यांनी कधीच मान्य केला नाही. प्रशासकीय कामावरील पकड व विकासाची दृष्टी असलेला जनतेचा नेता आज आपल्यातून निघून गेला. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वर चरणी प्रार्थना. पवार कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्याबरोबरच या अपघातात निधन झालेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा शब्दांत मंत्री गणेश नाईक यांनी श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे लोकभवन येथील राष्ट्रध्वज अर्ध्यावर

मुंबई, दि.२८ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्य शासनाने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. महाराष्ट्र लोकभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर मुंबई येथील लोकभवनातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राची अपरिमित हानी राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि लोकसभेकडून भावपूर्ण श्रद्धांजली

नवी दिल्ली, दि.28 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाबद्दल देशाच्या राजकीय वर्तुळातून तीव्र शोक व्यक्त करण्यात आला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पवार यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक कार्याचा गौरव करत त्यांना आदरांजली वाहिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची शोकसंवेदना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, 'बारामती येथील विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याचे वृत्त अत्यंत क्लेशदायक आहे. त्यांचे अकाली जाणे हे राज्याच्या विकासासाठी नुकसानकारक आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीत, विशेषतः सहकारी क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान ऐतिहासिक आहे. ' प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची श्रद्धांजली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात अजित पवार यांच्या संदर्भातील आठवणींना उजाळा दिला. प्रधानमंत्री मोदी म्हणाले, "अजित पवार हे जमिनीशी जोडलेले नेतृत्व होते. महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी सदैव तत्पर असणारे कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखले जायचे. त्यांची प्रशासकीय कामांची जाण आणि गरिबांच्या कल्याणाची तळमळ उल्लेखनीय होती. त्यांचे निधन धक्कादायक आहे. लोकसभेत शोकप्रस्ताव आणि आदरांजली संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अजित पवार यांच्या निधनाबाबत शोकप्रस्ताव मांडला. त्यात अध्यक्षांनी नमूद केले की, "अजित पवार १० व्या लोकसभेचे सन्माननीय सदस्य होते. सहा वेळा उपमुख्यमंत्री आणि आठ वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपली पकड निर्माण केली होती. सार्वजनिक जीवनातील त्यांची बांधिलकी सदैव स्मरणीय राहील." यानंतर संपूर्ण सभागृहाने दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण केली.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. दिवंगत अजित पवार यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो व पवार यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य समर्थकांना हा दुखद प्रसंग सहन करण्याचे धैर्य प्रदान करो, ही प्रार्थना करतो, असे महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री अजित पवार के निधन पर राज्यपाल की शोक संवेदना महाराष्ट्र एवं गुजरात के राज्यपाल आचार्य देवव्रत ने महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री अजित पवार के निधन पर गहरा शोक व्यक्त किया है। “महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री श्री अजित पवार जी के असमायिक निधन से गहरा दुख हुआ । दिवंगत श्री अजित पवार जी के आत्मा को ईश्वर सद्गति प्रदान करें और परिजनों व समर्थकों को इस अपूरणीय क्षति को सहन करने की शक्ति दें।

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना माझ्या मनात आहे. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे. महायुती सरकारमधले ते केवळ माझे सहकारी नव्हते तर माझे चांगले मित्रही होते. त्यांचं अकाली जाणं जीवाला चटका लावणारं आहे, अशा भावपूर्ण शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, महाराष्ट्र त्यांना ‘दादा’ म्हणून ओळखायचा आणि ते तसे होते. त्यांच्याकडे ‘वेळ’ साधण्याचा अप्रतिम गुण होता. त्यांच्या कामाचा झपाटा आणि निर्णयक्षमता आम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे. मी केवळ सहकारी म्हणूनच नाही तरी मित्र म्हणून सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलुंना जवळून पाहिलं आहे. आज दादा आपल्यात नाहीत ही कल्पना सुद्धा मनाला पटत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

दादा गेले! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी, मनाला चटका लावणारी आहे. या दुर्घटनेमुळे मन सुन्न झाले आहे, अशा शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत. दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत. थोड्याच वेळात बारामतीसाठी निघतो आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

मंगळवार, २७ जानेवारी, २०२६

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू -आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर · महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल

मुंबई, दि. 27 : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले. आरोग्य राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, मेनोपॉज हा महिलांच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील टप्पा. या काळात होणारे शारीरिक बदल, मानसिक ताण, हॉर्मोन असंतुलन, हाडांचे आजार, झोपेचे विकार व नैराश्य याकडे आजवर दुर्लक्ष होत होते. हीच गरज ओळखून राज्य शासनाने महिलांसाठी ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. औषधोपचार व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्‍ध होणार आरोग्य राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले की, या क्लिनिकच्या माध्यमातून, तज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्ला, मानसिक आरोग्य समुपदेशन, हाडे, हृदय व हॉर्मोन तपासणी, औषधोपचार व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. देशात प्रथमच अशा प्रकारचे ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. महिलांच्या आरोग्याबाबत राज्य शासनाने उचललेले हे पाऊल इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. मेनोपॉज हा आजार नाही, तर महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे. राज्यातील प्रत्येक महिलेला या काळात योग्य सल्ला, उपचार आणि सन्मान मिळावा, यासाठीच मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

ग्रंथ हे मनुष्याचे सच्चे मित्र - राज्यपाल आचार्य देवव्रत ''घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स' कथासंग्रहाचे प्रकाशन

मुंबई, दि. 27 : समाजमाध्यमे प्रभावी असली तरीही, ग्रंथ हे माणसाचे सच्चे मित्र असून ग्रंथ वाचनाच्या माध्यमातून शांती व आंतरिक खंबीरता लाभते, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते 'घोस्ट्स, हॉरर अँड हिल्स' या कथासंग्रहाचे प्रकाशन लोकभवन येथे करण्यात आले. 'हाय ऑन कसोल' या पुस्तकाचे लेखक, पत्रकार व अध्यापक आदित्य कांत हे या पुस्तकाचे लेखक आहेत. पुस्तकाचे नाव जरी गुढ व भयप्रद वाटत असले तरी पुस्तकातील 18 कथांच्या माध्यमातून लेखकाने सामाजिक कार्य व सकारात्मकतेचा संदेश दिला आहे. लेखकाने या लोककथांचा उपयोग करून हृदयस्पर्शी कथा लिहिल्या असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. संवेदनशीलता ही मानवाची सर्वात मोठी ओळख असून साहित्याच्या माध्यमातून युवकांमध्ये संवेदनशीलतेची भावना वृद्धिंगत झाली तर त्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन होईल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. कोरोना काळात जीवन मरणाशी लढताना तशाही स्थितीत कोरोना रुग्णांना मदत करण्याची आंतरिक इच्छा होती अशी भावना लेखक आदित्य कांत यांनी यावेळी सांगितले. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला रेड चिलीज एन्टरटेन्मेंटच्या व्यवसाय व्यवस्थापिका करुणा बडवाल, संगीतकार संजीव वाधवानी व चित्रपट निर्माते राजन खोसा यासह मनोरंजन व माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) मंगळवार, दि. २७ जानेवारी, २०२६. मंत्रिमंडळ निर्णय (एकूण - ५)

(कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग) राज्यातील आयटीआयचे आधुनिकीकरण, पीएम – सेतू योजना राबविणार पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे यांचा समावेश राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (ITI) पीएम सेतू योजनेंतर्गत आधुनिकीकरण करण्याच्या योजनेस आ़ज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. कुशल मनुष्य़बळाची मागणी आणि पुरवठा यांच्यातील तफावत भरून काढण्यासाठी पीएम सेतू योजनेतून आयटीआयचे आधुनिकीकरण करण्याची योजना आहे. या योजनेच्या पहिल्या टप्पात नागपूर, छत्रपती संभाजी नगर आणि पुणे येथील आयटीआयचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी हब अँड स्पोक प्रारूप विकसित केले जाणार आहे. या योजनेची पुढच्या वर्षात टप्प्या-टप्प्याने अंमलबजावणी करण्यासही मान्यता देण्यात आली. योजनेकरीता केंद्र सरकारचा ५० टक्के राज्य सरकारचा ३३ टक्के आणि उद्योग क्षेत्राचा १७ टक्के निधी असेल. आयटीआयच्या आधुनिकीकरणासाठी वरील प्रमाणे निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली. राज्यात एका क्लस्टरकरिता (१ हब आयटीआय व ४ स्पोक आयटीआय) पाच वर्षाकरीता अंदाजित २४१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याकरीता केंद्र सरकारचे ११२ कोटी रुपये, राज्य शासनाचे ९८ कोटी रुपये आणि उद्योग क्षेत्राचा ३१ कोटी रुपयांचा वाटा असेल. त्यापैकी राज्य सरकारकडून पाच वर्षाकरीता करावयाच्या ९८ कोटी रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली. नागपूर येथील गव्हर्न्मेंट आयटीआय, नागपूर आयटीआयचे हब म्हणून आधुनिकीकरण केले जाईल. मुलींसाठीचे आयटीआय, नागपूर, कामती, हिंगणा आणि बुटीबोरी येथील आयटीआयचा समावेश आहे. छत्रपती संभाजी नगर येथील आयटीआय हब म्हणून आधुनिकीकरण करणार. त्याचबरोबर पैठण, खुल्ताबाद, गंगापूर आणि फुलंब्री येथील आयटीआयचेही आधुनिकीकरण केले जाणार आहे. पुण्यातील औंध येथील आयटीआयचा हब म्हणून आधुनिकीकरण केले जाणार. औंध येथील मुलींसाठीचे आयटीआय, खेड-राजगुरूनगर आणि मुळशी येथील आयटीआयचे आधुनिकीकरण करणार. एका हब आयटीआय मध्ये सरासरी चार नवीन अभ्यासक्रम सुरू केले तर दहा विद्यमान अभ्यासक्रमांची श्रेणी सुधारणा केली जाणार आहे. स्पोक आय़टीआयमध्ये दोन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत तर आठ अभ्यासक्रमांची श्रेणी सुधारणा केली जाणार आहे. उद्योगांची संख्या कमी असलेल्या ठिकाणी सेवा क्षेत्र, बहुकौशल्य अभ्यासक्रम आणि उपजिविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. --00-- (सार्वजनिक बांधकाम विभाग) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देयकांसाठी ट्रेड प्लॅटफॉर्म कंत्राटदारांसाठी सुविधा, पारदर्शकता, सूसुत्रता वाढणार सार्वजनिक बांधकाम विभागामधील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक, कंत्राटदारांची प्रलंबित देयके आदा करण्यासाठी ट्रेड प्लँटफाँर्मचा (TReDS Platform) अवलंब करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस होते. राज्यातील सर्वच विभागांनी TReDS Platform चा अवलंब करावा. प्रत्येक विभागाने आपल्या विभागाच्य़ा कार्यपध्दतीशी आणि कामकाजाच्या आवश्यकतेनुसार आदर्श कार्य प्रणाली निश्चित (एसओपी) करावी. त्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. ट्रेड रिसिव्हेबल इलेक्ट्राँनिक डिस्काऊंटींग सिस्टीम भारत सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेचा संयुक्त उपक्रम आहे. वित्तीय समावेशन, मेक इन इंडिया, स्किल इंडिया आदी कार्यक्रमांना चालना देणे. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना स्वस्त आणि वेळेत वित्तपुरवठा उपलब्ध करून देणे आहे. या प्रणालीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील देयक प्रक्रियेत सुसूत्रता व पारदर्शकता येण्यास मदत होईल. प्रणालीमुळे विभागाकडे नोंदणी असलेल्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक कंत्राटदारांना आवश्यक खेळत्या भांडवलाची सुलभता मिळेल. त्यामुळे त्यांना कामकाजाचा विस्तार, तंत्रज्ञान अद्ययावत करणे आणि स्पर्धात्मकता वाढवणे शक्य होईल. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजक कंत्राटदारांना खेळत्या भांडवलाच्या समस्यांवर मात करण्यासाठी आणि करारांची वेळेवर पूर्तता करण्यास मदत होईल. या प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणी नंतर पुढील टप्प्यात ई-टेंडरिंग, ई-प्रोक्युरमेंट पोर्टलला TReDS प्लॅटफॉर्मशी जोडणार. यामुळे एकाच ठिकाणी इनव्हॉईस सबमिशन, पडताळणी आणि डिस्काउटिंग शक्य होणार आहे. --00-- (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क) शत्रू मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क माफ करणार शत्रू मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क प्रथम नोंदणी करताना माफ करण्यास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्र सरकारच्या गृह विभागाच्या नियंत्रणाखालील शत्रू संपत्तीच्या विश्वस्ताव्दारे-सेपी ( Custodian of Enemy Property of India) शत्रू मालमत्तांचे जतन, व्यवस्थापन आणि विक्री केली जाते. शत्रू मालमत्ता कायदा, १९६८ अनुसार शत्रू संपत्तीचे विश्वस्त संपत्तीचे विक्री करू शकतात. राज्यात एकूण ४२८ शत्रू मालमत्ता आहेत. त्यापुढीलप्रमाणे – छत्रपती संभाजी नगर-२, जालना -२, मुंबई-६२, मुंबई उपनगर-१७७, नागपूर-६, पालघर-७७, पुणे-४, रत्नागिरी -११, सिंधुदुर्ग-१, ठाणे-८६. युध्दकाळात भारत सोडून शत्रू देशात स्थलांतरित झालेल्या नागरिकांच्या या मालमत्ता आहेत. सेपीकडून अशा प्रकारच्या मालमत्तांची विक्री करण्यासाठी लिलाव करण्यात येतो. मात्र या लिलावांस कमी प्रतिसाद मिळतो. सेपीव्दारे विक्री प्रमाणपत्र जारी केल्यानंतर मालमत्तेच्या पहिल्या नोंदणीवेळी मुद्रांक शुल्क माफ केल्यास शत्रू मालमत्ता खरेदीचा खर्च कमी होऊन खरेदीस प्रतिसाद मिळेल. त्यामुळे अशा मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्कात माफी द्यावी, असा प्रस्ताव सेपीकडून महसूल विभागास सादर करण्यात आला होता. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शत्रू मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्कात प्रथम नोंदणी करताना माफी देण्यास मान्यता देण्यात आली. --00-- (वस्त्रोद्योग विभाग) धुळे येथील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनरूज्जीवन, १५6 कोटी ९० लाखांचा निधी देणार धुळे जिल्ह्यातील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या पुनरूज्जीवनाचा प्रस्ताव मान्य करण्यास आणि तो राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडे पाठविण्यास आज राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यातील सहकारी सुतगिरण्यांना आधुनिकीकरण, विस्तारीकरण, पुनर्वसन आणि उभारणी करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येते. सहकारी सुतगिरणीच्या पुनरुज्जीवनासाठी राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून निधी प्राप्त करुन घेऊन तो सुतगिरणीला दिला जातो. या योजनेनुसार धुळे जिल्ह्यातील मोराणे येथील जवाहर शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या पुनरुज्जीवनासाठी १५६ कोटी ९ ० लाख रुपयांचा प्रस्ताव आज मान्य करण्यात आला. हा प्रस्ताव राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडे पाठविण्यासही मान्यता देण्यात आली. --००— (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क) शासकीय जमिनींच्या भाडेपट्टीचा कालावधी तीस हून अधिक वर्षे वाढविण्यास मान्यता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ मधील तरतुदी अन्वये शासकीय जमीन विविध कारणांसाठी ३० वर्षांसाठी भाडेप‌ट्ट्याने देण्यात येतात. त्यांचा कालावधी पुढे ४९ वर्षांपर्यंत वाढवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शासनाच्या विविध प्रशासकीय विभागाच्या मालकीच्या अथवा महसूल विभागाने विशिष्ट प्रयोजनासाठी त्या विभागाकडे हस्तांतरीत केलेल्या तसेच त्यांच्या अख्यत्यारितील महामंडळ, मंडळ, प्राधिकरणे यांच्या मालकीच्या अथवा हस्तांतरित केलेल्या शासकीय जमिनी महामंडळ, मंडळ, प्राधिकरणे यांच्या उत्पन्न वाढीसाठी विविध व्यावसायिक प्रयोजनास्तव विविध संस्थांना ३० वर्षांसाठी भाडेपट्ट्यांवर दिल्या जात होत्या. अशा जमिनी आता आवश्यकतेनुसार प्रथमतः जास्तीत जास्त ४९ वर्षापर्यंत व त्यानंतर कोणत्याही अटी व शर्तीचे उल्लंघन झालेले नसल्यास, संबंधित विभागाला आवश्यकतेनुसार या भाडेपट्ट्याचे पुन्हा एकवेळ जास्तीत जास्त ४९ वर्षांच्या मर्यादेत नुतनीकरण करुन, योग्य तो भाडेपट्टा आकारुन जमीन भाडेपट्ट्याने देता येतील. तसेच, सध्या भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींचे संभाव्य नुतनीकरण, भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींच्या भुईभाड्यामध्ये ठराविक निश्चित मुदतीत वाढ तसेच भुईभाड्याची रक्कम भाडेपट्टाधारकाकडून नियमितपणे शासन जमा करण्यात येईल व त्यावर योग्यप्रकारे संनियंत्रण संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांकडून ठेवण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची 'दिलखुलास' कार्यक्रमात विशेष मुलाखत

मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात 'राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त' कोल्हापूर जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत बुधवार, दि. 28 आणि गुरुवार, दि. 29 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवर प्रसारित होणार असून, ‘News on AIR’ या मोबाईल ॲपवरुनही ऐकता येणार आहे. कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातील सहायक संचालक वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे. 25 जानेवारी रोजी देशभरात राष्ट्रीय मतदार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात मतदार नोंदणी, मतदानाचा हक्क आणि लोकशाहीतील नागरिकांची भूमिका याबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम, नवमतदार नोंदणी मोहिम तसेच घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांबाबत जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी माहिती दिली आहे. येत्या 5 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेली तयारी, मतदान प्रक्रिया, निवडणुकीदरम्यान माध्यमांचा वापर करताना उमेदवारांनी घ्यावयाची खबरदारी, प्रचार प्रसारासाठी परवानगी देण्यासाठीची व्यवस्था, आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, मतदारांसाठी सुविधा तसेच शांततापूर्ण, पारदर्शक व निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांवरही त्यांनी या मुलाखतीतून सविस्तर प्रकाश टाकला आहे. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने निर्भयपणे मतदान करुन मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. अमोल येडगे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो जोडणीस मान्यता · भूसंपादनासह सर्व परवानग्यांची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · गडचिरोली जिल्ह्यात खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोर ते सुरजागड या चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता

मुंबई, दि. २७: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मेट्रो मार्गिका ८ च्या ३५ किलोमीटरच्या जोडणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासोबतच ६६ किलोमीटर लांबीचा नाशिक शहर परिक्रमा मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यास आणि गडचिरोली जिल्ह्यात खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोर ते सुरजागड या चार पदरी सिमेंट काँक्रिट महामार्गाच्या सुधारित आखणीस मान्यता देण्यात आली. पायाभूत सुविधा प्रकल्पाला आवश्यक असलेले भूसंपादन आणि सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त करून घेण्याची कार्यवाही प्रकल्प सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. तसेच कुठलाही पायाभूत सुविधा प्रकल्प भूसंपादनानंतर पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावी. कुठल्याही परिस्थितीत कामे रेंगाळू नये, काम पूर्ण होण्यास विलंब लागल्यास प्रकल्पाच्या खर्चामध्ये वाढ होते. नागपूर ते गोंदिया, भंडारा ते गडचिरोली या समृद्धी महामार्गाच्या विस्तारित कामांना गती द्यावी. प्रकल्प कार्यादेश देतानाच प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्याची अट करण्यात यावी. प्रकल्प विहित कालमर्यादेत पूर्ण झाल्यास कंत्राटदाराला प्रोत्साहन मूल्य आणि विहित कालावधीपेक्षा जास्त वेळ लागल्यास दंडाची व्यवस्था असलेली ' ऑटो मोड' वरील यंत्रणा विकसित करावी. गडचिरोली जिल्ह्यातील महामार्गाचे काम करीत असताना रस्त्याच्या बाजूला गॅस वाहिनीसाठी जागेची उपलब्धता असल्याची खात्री करावी. भविष्यात सुरजागडपर्यंत गॅस वाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी आतापासून जागेची तरतूद महामार्गाच्या बाजूला करण्यात यावी, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिल गायकवाड, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते. बैठकीमध्ये अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम विभाग) मनीषा म्हैसकर आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सादरीकरण केले. पायाभूत प्रकल्पांविषयी... · छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो लाईन 8 जोडणीस मान्यता. · मेट्रो मार्गाची एकूण लांबी 35 किलोमीटर, भूमिगत मार्ग 9.25 किलोमीटर, उन्नत मार्ग 24.636 किमी, एकूण 20 स्थानके, 6 स्थानके भूमिगत, 14 स्थानके उन्नत. · छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानक ते घाटकोपर (पूर्व) पर्यंत भूमिगत स्थानके. · घाटकोपर (पश्चिम) स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल दोन स्थानकापर्यंत उन्नत स्थानके, दोन स्थानकांतील सरासरी अंतर 1.9 किलोमीटर. · 30.7 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता, भूसंपादनासाठी 388 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी एकूण 22 हजार 862 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाची निर्मिती, मार्गाची एकूण लांबी 66.15 किलोमीटर, या प्रकल्पासाठी एकूण 3 हजार 954 कोटीच्या खर्चास मान्यता. या प्रकल्पाला विशेष बाब म्हणून 50 टक्के भूसंपादन झाल्यास कार्यादेश देण्याचा निर्णय. गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे - कोनसरी - मूळचेरा - हेदरी - सुरजागड महामार्गाच्या सुधारित 85.76 किलोमीटर लांबीस मान्यता, चार पदरी सिमेंट काँक्रिटकरणाचा महामार्ग.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची शासकीय विद्यानिकेतनला, सदिच्छा भेट • विद्यानिकेतनचा कायापालट सहा महिन्यांत करणार –शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

अमरावती, दि. २७ : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त दि. २६ जानेवारी रोजी शासकीय विद्यानिकेतन, अमरावती येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यानिकेतन अंतर्गत असलेल्या वस्तीगृह शाळांची पाहणी करून तेथील शैक्षणिक, निवासी व भौतिक सुविधांचा आढावा घेतला. शासकीय विद्यानिकेतन ही संस्था १९६७ पासून कार्यरत वसतीगृह असून राज्य शासनाच्या अखत्यारितील निवासी शाळा आहे, येथे प्रज्ञाशोध परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या संस्थेत प्रवेश दिला जातो. या शाळांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मंत्री महोदयांनी यापूर्वी मंत्रालय स्तरावर विविध बैठकांचे आयोजन करून प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी प्रत्यक्ष विद्यानिकेतनला भेट देऊन पाहणी केली. मार्गदर्शन करताना मंत्री भुसे म्हणाले, “राज्यातील पाच शासकीय विद्यानिकेतन या महाराष्ट्र शासनाच्या शाळा असून त्यांचे पालकत्व थेट राज्य शासनाकडे आहे. आगामी सहा महिन्यांत विद्यानिकेतनचा सर्वांगीण कायापालट करण्याचे उद्दिष्ट आमच्या डोळ्यांसमोर आहे. या शाळांना पुन्हा एकदा वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन व प्रशासन पूर्ण ताकदीने कार्यरत आहे.” या कार्यक्रमास अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संदीप संघवे, शिक्षण उपसंचालक (अमरावती विभाग) निलिमा टाके, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि. प. अमरावती प्रिया देशमुख, प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मुघल, शिक्षण निरीक्षक मनवर, प्रभारी प्राचार्य तथा उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) मानकर, उपशिक्षणाधिकारी इम्रान, माजी प्राचार्य नरेंद्र गायकवाड, अधीक्षक श्रीमती निलिमा सोलंके, प्रभारी गृहप्रमुख दिनेश सोनोने, शिक्षक मोहम्मद आफाक, माजी विद्यार्थी प्रभाकरदादा वाघमारे, गावंडे, निस्ताने तसेच शासकीय विद्यानिकेतन येथील सर्व शिक्षक व कर्मचारी आणि विद्यानिकेतनला सेवा देणारे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोमवार, २६ जानेवारी, २०२६

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्य माहिती आयोगात ध्वजारोहण

अमरावती, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्य माहिती आयोग, खंडपीठ अमरावती कार्यालयात राज्य माहिती आयुक्त रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी आयोगातील उप सचिव देविसिंग डाबेराव, कार्य अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व पोलीस कर्मचाऱ्यांकडून तिरंग्यास मानवंदना याप्रमाणे कार्यक्रम संपन्न झाला.

भारतीय प्रजासत्ताकाचा 76 वा वर्धापन दिनोत्सव विभागीय आयुक्तालयात ध्वजारोहण व तिरंग्यास मानवंदना

अमरावती, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताकाच्या 76 व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त विभागीय आयुक्तालयात आज विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी विभागीय आयुक्तांनी उपस्थित सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत व राज्यगीतानंतर पोलीस पथकाव्दारे तिरंग्यास मानवंदना देण्यात आली. यावेळी अपर आयुक्त सुरज वाघमारे, संजय जाधव, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके, सुशील आग्रेकर, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे, नायब तहसीलदार मधुकर धुळे, संदीप टांक, श्यामसुंदर देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

रविवार, २५ जानेवारी, २०२६

‘हिंद-दी-चादर’ गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानातून मानवी मूल्यांच्या रक्षणाची प्रेरणा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - नांदेड येथे 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागमनिमित्त कार्यक्रमाला लाखो भाविकांची उपस्थिती - श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न - श्री गुरु नानक देवजी यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारे नऊ समाज प्रथमच लाखोंच्या संख्येने एकत्र

नांदेड, दि.25 : 'हिंद-दी-चादर' गुरू तेग बहादुर साहिबजी यांचे बलिदान मानवी मूल्यांसाठी होते. त्यांचे बलिदान आपल्याला सत्य, धर्म आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी निर्भीडपणे उभे राहण्याची प्रेरणा देते. त्यामुळेच त्यांचे विचार राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित 'हिंद दी चादर' श्री गुरू तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे, नवी दिल्लीचे उद्योग, अन्न व नागरी पुरवठा मंत्री सरदार मनजिंदर सिंघ सिरसा, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ.अजित गोपछडे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार जितेंद्र अंतापूरकर, आमदार रवींद्र चव्हाण, राज्य अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, गुरूव्दारा बोर्डाचे प्रशासक डॉ.विजय सतबीर सिंघ, शहीदी समागम समितीचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गुरू तेग बहादुर साहिब जी यांनी दिलेले बलिदान हे केवळ शीख धर्मासाठी नव्हते, तर या देशाची संस्कृती, सभ्यता, विचारधारा आणि धर्म यांच्या रक्षणासाठी होते. त्यांचा पराक्रम, वीरता, शौर्य आणि सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने समाज नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत एकत्र आला आहे. गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या बलिदानामुळे संपूर्ण देशात धर्म, स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानासाठी लढण्याची नवी चेतना निर्माण झाली. त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांपर्यंत पोहचावा, यासाठी शहीदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून प्रत्येक गावात, वाड्या-वस्त्यांवर जावून श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास घराघरात पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. शीख गुरूंचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. श्री गुरु नानक देवजींना मानणारा, त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारा सर्व समाज एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. देशाच्या विपरीत परिस्थितीत श्री गुरु नानक देवजींनी एकत्र बांधणारा, भेदाभेद नष्ट करणारा महान विचार दिला आहे. त्या विचारांनी संपूर्ण देशात विविध समाजांना जोडण्याचे काम केले. हा विचार घेवून सर्व समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. संत नामदेव महाराज हे महाराष्ट्रातील महान संत होते. त्यांची समाधी पंजाबमधील घुमान येथे आहे. संत नामदेवांनी मांडलेले विचार, त्यांचे अभंग आणि पंक्ती यांना श्री गुरु ग्रंथ साहिबमध्ये स्थान मिळाले आहे. त्यांचे विचार गुरुबाणीचा अविभाज्य भाग बनले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील वारकरी परंपरा आणि शीख समाज यांच्यातील अनोखे, अतूट नाते अधिक दृढ झाले आहे. श्री गुरु गोविंद सिंघ महाराजांच्या दीर्घकाळ वास्तव्याने नांदेडची भूमी पावन झाली आहे. या भूमीने सामाजिक सलोखा अधिक मजबूत करण्याचे काम केले असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचे बलिदान हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवी सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी होते.जुलमी शासकांच्या दमनकारी धोरणांविरुद्ध विचार स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी दिलेले गुरु तेग बहादुर जी यांचे बलिदान हे अभूतपूर्व ऐतिहासिक उदाहरण असून,त्यांच्या निर्भय आचरणातून धार्मिक व नैतिक दृढतेचा आदर्श मिळतो,असे त्यांनी सांगितले. धर्मतत्त्वज्ञान जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी गुरु तेग बहादुर साहिब जी यांनी देशभर प्रवास करून आध्यात्मिक,सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी रचनात्मक कार्य केले.अंधश्रद्धा व अपप्रथांविरुद्ध त्यांनी प्रबोधन केले, तसेच विहिरी खोदणे, धर्मशाळा उभारणे, दानधर्म व प्राणीसेवा यांसारखी सार्वजनिक कल्याणाची कामे केली, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी आपल्या भाषणाला मराठी भाषेत सुरुवात करत महाराष्ट्रात पुन्हा येऊन आनंद झाल्याचे सांगितले. श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या बलिदानाच्या स्मरणासाठी होणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरेल, असे ते म्हणाले. गुरू तेग बहादूर जी यांच्या जीवनाचा आदर्श घेत युवकांनी देशाला नव्या उंचीवर घेवून जाण्याचा, तसेच देशाला अखंडीत ठेवण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतिहासातून सामर्थ्यासोबत सद्भाव जपण्याचा संदेश महाराष्ट्राने दिला आहे, असा उल्लेखही श्री. कल्याण यांनी केला. दिल्लीचे उद्योग, अन्न व नागरी पुरवठा मंत्री सरदार मजिंदर सिंघ सिरसा म्हणाले, या समागम कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले, याचा आनंद आहे. अतिशय भव्य कार्यक्रमाचे आयोजन राज्य शासन व नऊ समाजाच्या सहभागातून केले आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास जगासमोर आणण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्षात आणला. नांदेडच्या ऐतिहासिक भूमीत होत असलेल्या या समागम कार्यक्रमानिमित्त श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानत हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या मातीतील विविध समाजाला एकत्र आणणारा ठरल्याचे त्यांनी सांगितले. संत ज्ञानी हरनाम सिंघ म्हणाले, संत नामदेव यांनी पंजाब आणि महाराष्ट्राला जोडण्याचे काम केले, त्यानंतर श्री गुरु गोविंद सिंघ यांनी महाराष्ट्रात येवून दोन्ही राज्यातील समाजाला जोडण्याचे काम केले. देशावर जेव्हा संकट आले, तेव्हा महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांनी शौर्य दाखविले. ज्या धार्मिक सभ्यतांसाठी श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांनी बलिदान दिले, त्या धार्मिक सभ्यता जपण्याचा, त्यांना आपल्या जीवनाचा हिस्सा बनविण्यासाठी संकल्प युवा वर्गाने करावा, असे आवाहन त्यांनी केले. शालेय अभ्यासक्रमात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा इतिहास समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. तसेच शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांचा इतिहास घराघरात पोहचत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. श्री गुरु नानक देवजी यांच्या विचारांवर श्रद्धा असणाऱ्या नऊ समाजांना पहिल्यांदाच एकत्र आणून आयोजित केलेला हा कार्यक्रम समाजाला जोडणारा आहे.नऊ समाज श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्याशी जोडले गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यात तीन ठिकाणी होणाऱ्या शहीदी समागम कार्यक्रमांच्या निमित्ताने हे समाज पुन्हा एकत्र येत आहेत.शीख समाजाचा इतिहास शाळांमध्ये शिकवला जात आहे, ही अतिशय आनंददायी बाब असल्याचे गुरूव्दारा बोर्डाचे प्रशासक डॉ.विजय सतबीर सिंघ यांनी यावेळी सांगितले. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री गुरू ग्रंथ साहिब जी यांचे दर्शन घेतले. तसेच यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पंच प्यारे यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर बाबा कुलवंत सिंघ, बाबा हरनाम सिंघ, बाबा बलविंदर सिंघ यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक अखिल भारतीय धर्म जागरण समितीचे प्रमुख शरदराव ढोले यांनी केले. शहीदी समागम कार्यक्रमाचे राज्य समन्वयक रामेश्वर नाईक यांनी आभार मानले.

शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना विभागीय आयुक्तालयात अभिवादन

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना विभागीय आयुक्तालयात अभिवादन अमरावती, दि. 23 : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते व आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन केले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अपर आयुक्त सुरज वाघमारे, संजय जाधव, उपायुक्त संतोष कवडे, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. मतदार दिनाची शपथ राष्ट्रीय मतदार दिनाच्या औचित्याने यावेळी विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांना मतदार दिनाची शपथ दिली. 00000

लेख : श्री गुरु तेग बहादुर साहिबजी अर्थात हिंद दी चादर !

लेख : श्री गुरु तेग बहादुर साहिबजी अर्थात हिंद दी चादर !

धर्म व मानवतेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांचे नाव इतिहासात अजरामर होत असते. शीख गुरु परंपरेतील नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिब यांनी धर्म रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. ज्यांची ‘हिंद दी चादर’ म्हणजेच 'भारतभूमीचे कवच' अशी अभिमानास्पद ओळख आहे. त्यांनी धर्म स्वातंत्र्य, न्याय आणि सहिष्णुतेच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान म्हणजे भारतीय संस्कृतीतील एक गौरवास्पद अध्याय आहे. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा आदर्श बाळगणे हीच त्यांना खरी आदरांजली आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानामुळे धर्म अबाधित राहिला. त्यांच्या या महान बलिदानास ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या या बलिदान दिनानिमित्त नांदेड येथे विशेष सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख.

अमृतसरमध्ये एप्रिल १६२१ मध्ये शिखांचे सहावे गुरू हरगोबिंद आणि माता नानकी यांच्या कुटुंबात श्री गुरू तेग बहादूर यांचा जन्म झाला. १६६४ मध्ये त्यांना गुरू ही पदवी प्राप्त झाली. गुरू तेग बहादूर यांचे मूळ नाव त्यागमल होते. लहान वयातच एका घनघोर युद्धात अतुलनीय शौर्य दाखवल्याबद्दल त्यांना 'तेग बहादूर' असे गौरवाने संबोधले जाऊ लागले. 'तेग बहादूर' म्हणजे 'शूर, तळपती तलवार' होय ! श्री गुरु तेग बहादूर यांनी त्यांच्या नावाप्रमाणेच तळपत्या तलवारीसारखे शौर्य दाखवत धर्म रक्षणाचे पवित्र कार्य केले.

तो काळ क्रूर शासकांच्या राजवटींमुळे धार्मिक-राजकीय संघर्षाचा होता. समाजातील मोठा वर्ग विविध अत्याचारांना बळी पडत होता. धर्म, संस्कृती, श्रद्धा समूळ नष्ट करण्यासाठी अत्यंत वाईट मार्गांचा अवलंब करण्यात येत होता. लोकांचा केवळ छळच नव्हे तर त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्यात येत होते. बळजबरी करून लोकांचे धर्मांतर करण्याचा मार्ग या क्रूर शासकांनी अवलंबिला होता. यामुळे सर्वत्र हाहा:कार माजला होता, या साऱ्यांची इतिहासात नोंद आहे.

अशा आव्हानात्मक परिस्थितीत श्री गुरु तेग बहादुर शौर्याने अखेरपर्यंत लढले. समाजाची चेतना व संकल्पशक्ती जागवण्यासाठी प्रसंगी बलिदान दिले. औरंगजेबाच्या क्रूर राजवटीला त्यांनी आव्हान दिले. श्री गुरु तेग बहादुर जुलमी राजवटीसमोर झुकले नाहीत. त्यांचा तेजस्वी निश्चय मोडून काढण्यासाठी मुघल राज्यकर्त्यांनी त्यांच्या परिवारासही संपवले व क्रूरतेचा कळस गाठला. तरीही श्री गुरु तेग बहादुर यांचा संकल्प ढळला नाही. अखेरच्या श्वासापर्यंत ते धर्म व मानवतेच्या रक्षणासाठी लढत होते. अखिल मानवजातीला चारित्र्य, सत्य, संयम, करुणेचा संदेश देत ते दिव्य ज्योतीत विलीन झाले. त्यांच्या आदर्शांचे स्मरण करीत आपण आपले आयुष्य घडवावे हाच आपला निर्धार असावा. भारतीय परंपरेतील अशा महान तेजस्वी ताऱ्याची शिकवण आणि बलिदानाचे महत्त्व बालक, तरुण व प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

श्री गुरु तेग बहादुर हे जगभर प्रभाव टाकणारे महान गुरु मानले जातात. यानिमित्ताने त्यांच्या शहिदी समागमाचा इतिहास सर्वदूर पोहोचावा यासाठी महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्यांक विभाग व श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० शहीदी समागम राज्यस्तरीय समितीतर्फे राज्यभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हा शहीदी समागमाचा उपक्रम केवळ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांना श्रद्धांजली नसून गुरु साहिबांची शिकवण, आदर्श आणि त्यांच्या बलिदानाच्या तेजस्वी परंपरेची ज्योत भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा एक सामूहिक प्रयत्न आहे.

श्री गुरु तेग बहादुर साहिब यांचे जीवन निर्भयता, धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी केलेल्या त्यागाचे प्रतीक असून त्यांच्या बलिदानाचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त नागपूर येथे ७ डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मानवता, सत्य आणि धर्म रक्षणाचा मार्ग दाखवणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा गौरवशाली इतिहास समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावा यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनीही या सर्व कार्यक्रमांना अभूतपूर्व प्रतिसाद दिला. येत्या २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात श्री गुरु तेग बहादूर साहेबजींच्या शौर्यावर आधारित गीतांचे गायन, अखंड जप तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री गुरु तेग बहादूर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी विविध धार्मिक व सामाजिक संघटनांसह सर्वजण अनेक सामाजिक, प्रबोधनात्मक व जागृतीपर कार्यक्रम आयोजित करत आहेत. यात मॅरेथॉन, रॅली, भक्तीगीत, स्मरणिका प्रकाशन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

धर्माचे संरक्षक निर्माण करणे हा श्री गुरु तेग बहादूर यांच्या जीवनकार्याचा उद्देश होता. ग्रंथाला गुरु मानावे ही त्यांची शिकवण ! येणाऱ्या पिढ्यांनी त्यांच्या शौर्य व बलिदानाचे स्मरण करून आयुष्य समृद्ध करावे, असे जणू इतिहास आपणा सर्वांना सांगत आहे. त्यांचे तत्त्वज्ञान व त्यांच्या शिकवणीचे पालन करणे हेच खरे धर्म कर्तव्य होय.

श्रीमती पल्लवी अ. धारव सहायक संचालक माहिती व जनसंपर्क नागपूर

00000