रविवार, १ फेब्रुवारी, २०२६
हिंद-दी-चादर' शहीदी समागम वर्षानिमित्त ‘जय महाराष्ट्र’मध्ये उपजिल्हाधिकारी जयराम पवार यांची विशेष मुलाखत
मुंबई, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दूरदर्शनच्या सह्याद्री
वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मंगळवारी 3 फेब्रुवारी,
2026 रोजी रात्री 8.00 वाजता 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या
350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत
“हिंद-दी-चादर” शहीदी समागम समितीचे सदस्य तथा उपजिल्हाधिकारी जयराम पवार या
कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली आहे. 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादुर
साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त 18 व 19 फेब्रुवारी 2026 रोजी
खारघर, नवी मुंबई येथे भव्य राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या
कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक राज्य तसेच देशातून उपस्थित राहणार आहेत. श्री
गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे विचार, त्याग आणि मानवतावादी मूल्ये पुढील
पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनामार्फत विविध जनजागृतीपर तसेच शैक्षणिक उपक्रम
राबविण्यात येणार असल्याची माहितीही श्री. पवार यांनी 'जय महाराष्ट्र'
कार्यक्रमातून दिली आहे.या कार्यक्रमानिमित्त शीख, शिकलकर, बंजारा, लबाना, सिंधी,
मोहियाल, वाल्मिकी, उदासीन तसेच वारकरी संप्रदाय समुदाय एकत्र सहभागी होत आहेत. या
समाजाचा इतिहास, संस्कृती त्यांचे गुरु नानक आणि गुरु तेग बहादुर यांच्याशी कसा
संबंध आहे, याबद्दल अधिक माहिती दिली आहे. श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या
350 व्या शहीदी समागम वर्षाचे ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट
करताना, समाजात सलोखा, एकात्मता आणि परंपरेचे संवर्धन करण्यासाठी अशा उपक्रमांची
आवश्यकता असल्याचे उपजिल्हाधिकारी पवार यांनी सांगितले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा