गुरुवार, २ जुलै, २०२६

 





देशात सर्वात जास्त वस्तू व सेवा कर संकलन करण्यामध्ये #महाराष्ट्र हे देशामध्ये अव्वल आहे. वस्तू व सेवा कर संकलनाच्या मोबदल्यात केंद्र शासनाकडून सर्वाधिक लाभ मिळविणारे राज्यही महाराष्ट्र आहे. त्यामुळे #जीएसटी व्यवस्थेमध्ये महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे, असे गौरवद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ व्या वस्तू व सेवा कर दिवस समारंभात काढले. तसेच देशामध्ये कर चोरी रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा उभारणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महापौर रितू तावडे, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे मुख्य आयुक्त प्राची स्वरूप, पुणे विभागाचे मुख्य आयुक्त नीरज कंसल, राज्य सेवा व वस्तू कर आयुक्त आशिष शर्मा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, वित्तीय सुधारणा अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी उपस्थित होते.

'एक देश, एक कर आणि एक बाजार' अशी व्यवस्था निर्माण करणारा जीएसटी कर ही ऐतिहासिक सुधारणा असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जीएसटीमुळे भारत ही प्रामाणिकपणे अप्रत्यक्ष कर भरणाऱ्या करदात्यांची सोसायटी बनली आहे. जीएसटी हा जगामध्ये सर्वात मोठ्या वित्तीय सुधारणांपैकी एक आहे. देशातील बरेच अप्रत्यक्ष कर एकत्र करून जीएसटी लागू करण्यात आला. देशामध्ये अनेक दिवस जीएसटीवर राज्यांची सहमती घेण्याचे कार्य सुरू होते. याबाबत केवळ चर्चाच सुरू होत्या. अनेक अप्रत्यक्ष करांचा भरणा, या करांची चोरी रोखण्यासाठी प्रशासन व व्यापारी दोन्ही दबावात असायचे. अशा परिस्थितीत देशामध्ये व्यापार आणि उद्योगांची वाढ होत नव्हती. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वात जीएसटी लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र हे देशातील 'सर्व्हिसेस लीडर' असल्यामुळे जीएसटीच्या करपद्धतीत सर्व्हिसेस आल्यानंतर राज्याला मोठा लाभ झाला आहे. राज्याला मागील वर्षी १ लाख ८७ हजार कोटी रुपयांचा जीएसटी परतावा मिळालेला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा