सोमवार, २ नोव्हेंबर, २०२६

 

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा

१६ वा पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न

४३० विद्यार्थ्यांना पदवी, तर २४ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रदान


अमरावती, दि. २ : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेचा १६ वा पदवीदान सोहळा ३१ ऑक्टोबर रोजी शेगाव नाका येथील अभयंता भवन (आयई) सभागृहात उत्साहात पार पडला. या सोहळ्यात ४३० विद्यार्थ्यांना पदवी, तर २४ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली.

या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून व्हीएनआयटी, नागपूरचे संचालक प्रा. डॉ. प्रेम लाल पटेल उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आशिष एम. महल्ले यांनी अध्यक्षपद भूषवले, तर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.

पदवीधारक अभियंत्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. प्रेम लाल पटेल यांनी विद्यार्थ्यांना 'विकसित भारत २०४७' चे शिलेदार बनण्याचे आवाहन केले. 'अर्थशास्त्र, नैतिकता आणि कार्यक्षमता' हे आपल्या व्यावसायिक जीवनाचे ब्रीदवाक्य बनवण्यास त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम मिशन आणि सेमीकंडक्टर क्षेत्रातील आगामी तंत्रज्ञानाचा स्वीकार करतानाच जल, ऊर्जा आणि अन्न यांसारख्या नैसर्गिक संपत्तीचे रक्षण करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, कचऱ्यापासून सर्वोत्तम निर्मिती करत वर्तुळाकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यावर भर दिला.

प्राचार्य प्रा. डॉ. आशिष एम. महल्ले यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर करताना संस्थेच्या ६० वर्षांच्या गौरवशाली वारशाचा उल्लेख केला. विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयाची स्वायत्तता २०२९-२०३० पर्यंत वाढवली असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करत महाविद्यालयाने १५ मायनर प्रोग्राम्स आणि ७ ऑनर्स कोर्सेस सुरू केले आहेत. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात १५० हून अधिक कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सहभाग घेतला असून, २४४ विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. एनव्हीडिया ग्राफिक्स कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना सर्वोच्च २६.५ लाख रुपयांचे पॅकेज मिळाले आहे.

कार्यक्रमात पदवी (बी. टेक.) व पदव्युत्तर पदवी (एम. टेक.) अभ्यासक्रमात शाखावार सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सुवर्णपदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पदवी अभ्यासक्रमात मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेत शुभम छगन पाटील (९.६८ सीजीपीए), माहिती तंत्रज्ञान शाखेत प्रेम प्रमोद सातपैसे (९.४६ सीजीपीए), सिव्हिल अभियांत्रिकी शाखेत शिवम ज्ञानेश्वर यवतकर (९.४३ सीजीपीए), संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेत प्रणाली अरुणराव गुल्हाने (९.२८ सीजीपीए), इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी शाखेत मानसी मोहन लासणे (८.७५ सीजीपीए), तर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी शाखेत श्रीहरी प्रकाश उमप (८.३१ सीजीपीए) यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेत ऐश्वर्या बाळभाऊ बुंदेले (९.२६ सीजीपीए), इलेक्ट्रॉनिक सिस्टीम आणि कम्युनिकेशन शाखेत सायली अनिल सांबरे (९.०१ सीजीपीए), तर पर्यावरण अभियांत्रिकी शाखेत शबनम निजामुद्दीन शेख (८.४३ सीजीपीए) यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

महाविद्यालयातून सर्व सात पदवी अभ्यासक्रमांमध्ये सर्वाधिक ९.६८ सीजीपीए गुण प्राप्त केल्याबद्दल मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाचा विद्यार्थी शुभम छगन पाटील याला विशेष सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. तसेच, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाची विद्यार्थिनी प्रणाली अरुणराव गुल्हाने हिने सर्व महिला विद्यार्थिनींमध्ये सर्वोच्च गुण मिळवल्याबद्दल तिला ५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. एम. एस. मोरे यांनी काम पाहिले, तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून डॉ. के. एस. वासनकर यांनी कार्य पार पाडले. डॉ. पी. पी. बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. के. एन. तायडे यांनी मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी प्रतिनिधी, पालक आणि वृत्तपत्र प्रतिनिधींचे आभार मानले.

 

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा