शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२६

 

#जैन समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक विकासासाठी स्वतंत्र जैन #अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.


महामंडळाच्या योजनांच्या पहिल्या टप्प्यात युवकांना उच्च शिक्षण व व्यवसायासाठी सुमारे ५१ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात येणार असून, महिलांना स्वयंरोजगारासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ‘चंदनबाला महिला स्वयंरोजगार कर्ज योजना’ सुरू करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत कुटीरोद्योग व घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना एक लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात २०० महिलांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे कर्ज वितरित केले जाणार आहे.

युवकांना उच्च शिक्षणासाठी दहा लाख, तर व्यापार व उद्योगासाठी वीस लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या माध्यमातून सुमारे ३५० युवकांना ५१ कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे नियोजन आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शहरांमध्ये निवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोल्हापूरसह आठ जिल्ह्यांमध्ये १६ वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. तसेच जैन समाजाचा धार्मिक व ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी प्राचीन तीर्थक्षेत्रे, मंदिरे, लेणी आणि हस्तलिखितांचे संरक्षण, संवर्धन व डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. जैन साधू-संतांच्या विहारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने राज्यातील ३२५ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

या योजनांचा प्रारंभ घाटकोपर पूर्व येथील आराध्य भक्ती पार्क, हॉकी मैदान येथे आयोजित कार्यक्रमात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आमदार पराग शाह हे कार्यक्रमाचे मुख्य संयोजक असून, राष्ट्रसंत नम्रमुनी यांच्या चातुर्मासानिमित्त त्यांच्या सान्निध्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा