#विकसितमहाराष्ट्र२०४७ अंतर्गत राज्याला जागतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी १०० पर्यटन सबसर्किट तयार करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा आराखडा अंतिम करण्यापूर्वी पर्यटन क्षेत्रातील भागधारकांच्या सूचना व शिफारसी जाणून घेण्यासाठी #पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीत पर्यटन व्यावसायिक, विविध संस्था आणि प्रतिनिधींनी प्रत्यक्ष व ऑनलाइन सहभाग घेतला. यावेळी पर्यटनस्थळांची निवड व वर्गीकरण, पर्यटनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी, स्थानिक पर्यटन संधी आणि पर्यटनस्थळांचा परस्पर विकास याबाबत चर्चा करण्यात आली. प्राप्त सूचनांच्या आधारे पर्यटन सबसर्किटचा आराखडा अधिक सर्वसमावेशक, व्यवहार्य आणि पर्यटकाभिमुख करण्यावर भर देण्यात आला.
महाराष्ट्रातील भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक आणि साहसी पर्यटनाची विविधता लक्षात घेऊन १०० पर्यटन सबसर्किट विकसित करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून पर्यटनस्थळांचा नियोजनबद्ध व शाश्वत विकास, पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि पर्यटकांचा अनुभव समृद्ध करण्यासोबतच स्थानिकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. बैठकीत प्राप्त झालेल्या सूचना व शिफारसींचे परीक्षण करून अंतिम आराखड्यात त्यांचा विचार करण्यात येणार असल्याचे विकास पानसरे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा