गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९

सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन राष्ट्रीय एकता दिनानिमित्त दिली शपथ


सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त दिली शपथ

           अमरावती, दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख यांनी आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. राष्ट्रीय एकता दिनानिमित्त उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्री. देशमुख यांनी  राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.

         यावेळी सहायक आयुक्त विवेकानंद काळकर तसेच अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंती दिन हा देशभर राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
000000

विभागातील पाचही जिल्ह्यात आज ‘रन फॉर युनिटी’ *सहभागी होण्याचे प्रशासनाचे आवाहन


विभागातील पाचही जिल्ह्यात आज ‘रन फॉर युनिटी’
*सहभागी होण्याचे प्रशासनाचे आवाहन
अमरावती, दि. 30 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात ‘रन फॉर युनिटी’ आयोजित करण्यात आली आहे. यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
वाशिम : राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी 'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात येते. गुरूवार, दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता ही दौड सुरु होणार असून यावर्षी ही दौड जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरु होणार असून नविन शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, राजस्थान आर्य महाविद्यालय, सामान्य रुग्णालय मार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर या दौडचा समारोप होईल. यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी सात वाजेपर्यत वाशिम जिल्हा क्रीडा संकुल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच एकता दौडमध्ये वाशिम शहर आणि जिल्ह्यातील युवक-युवती, खेळाडू, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
अकोला : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दौडमध्ये अकोला शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. यावर्षी ही दौड जिल्हा क्रीडा संकुल, वसंत देसाई स्टेडियम येथून सकाळी आठ वाजता सुरु होईल. यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी सात वाजेपर्यंत वसंत देसाई स्टेडियम, अकोला  येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
बुलडाणा : राष्ट्रीय एकात्मतेसाठी ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात आले आहे. या एकता दौडमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यावर्षी ही दौड जिल्हा पोलिस मैदान येथून सुरु होणार असून शहरातील मुख्य चौकांमधून पुन्हा जिल्हा पोलिस मैदान येथे आल्यानंतर दौडचा समारोप होईल. ही दौड दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता सुरु होईल. यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी सातवाजेपर्यत  जिल्हा पो‍लिस मैदान येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अमरावती : ‘रन फॉर युनिटी’ अर्थात राष्ट्रीय एकता दौडमध्ये अमरावती शहर आणि जिल्ह्यातील युवक-युवती, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यावर्षी ही दौड विभागीय क्रीडा संकुल येथून सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी सकाळी सातवाजेपर्यंत विभागीय क्रीडा संकुल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
यवतमाळ : येथील पोस्टल ग्राउंड (समता मैदान) येथून एकता दौड सुरू होईल. सकाळी साडेसात वाजता शहरातील एलआयसी चौक, बस स्टँड चौक, मुख्य बाजारपेठ मार्गाने जाणाऱ्या या दौड मध्ये प्रशासकीय अधिकारी, खेळाडू आणि विविध क्रीडा संघटनाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, असे क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी सांगितले. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या दौड मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
00000




जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू


जिल्‍ह्यात कलम 37 (1)  व (3) लागू

अमरावती, दि. 30  : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी, डॉ. नितिन व्यवहारे यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 29 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर 2019 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणाऱ्या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर  जिल्हा दंडाधिकारी  यांनी कळविले आहे.
000000


कापूस पिकावरील नवीन लष्करी अळी व्यवस्थापन केंद्र शासनाने सुचवलेली एकात्मिक किड व्यवस्थापन पध्दती


कापूस पिकावरील नवीन लष्करी अळी व्यवस्थापन
केंद्र शासनाने सुचवलेली एकात्मिक किड व्यवस्थापन पध्दती

अमरावती, दि.30 : विभागातील कापूस पिकावर नवीन लष्करी अळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. याबाबत केंद्र शासनासने सुचविलेली एकात्मिक किड व्यवस्थापन पद्धतीचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आला आहे.
शेतामध्ये नियमितपणे निरीक्षणे आणि देखरेख करुन एकात्मिक कीड व रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा. कपाशीची प्रादूर्भावग्रस्त फुले व हिरवी बोंडे त्वरीत वेचून अळ्यासहित नष्ट करावीत. जेणेकरुन, अळीचा होणारा प्रसार रोखण्यास मदत होईल. किडीचे वेळेवर व्यवस्थापनासाठी अंडीपुंज असलेली पाने तसेच सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्या हाताने गोळा करुन नष्ट कराव्यात.
अडी अवस्थेतील किड नियंत्रणासाठी ट्रायकोग्रामा या परोपजीवी किटकांचे शेतात प्रसारण करावे अथवा कापूस पिकांच्या पानांस ट्रायकोकार्ड लावावे. नवीन लष्करी अळी वरील परोपजीवी व परभक्षी किटकांचे संरक्षण आणि संवर्धनसाठी किडीच्या सुरुवातीच्या अवस्थेत कडुलिंबावर आधारित किटकनाशकांचा वापर करावा. प्रादूर्भावीत पिकांचे अवशेष नष्ट करावेत. प्रौढ नर पतंग नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. मुख्य शेत तणविरहीत ठेवणे, तसेच आजुबाजूचे क्षेत्र स्वच्छ ठेवावे.
किटकनाशक नोंदणी समीतीने मंजुर केलेल्या शिफारशीप्रमाणे नोंदणीकृत किटकनाशकांचा वापर करावा. कापूस एकात्मिक किड व्यवस्थापन पध्दती http://ppqs.gov.in/sites/default/files/cotton.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात. केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांनी शिफारस केल्याप्रमाणे कापूस पिकांवर मेटाऱ्हायझियम ॲनिसोप्लि किंवा नोमेरिया रिलाई या किडरोगजनक बुरशीचा 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांनी शिफारस केल्याप्रमाणे प्रादूर्भावीत कापूस पिकांचे पुढील नुकसान टाळण्याच्या दृष्टीने त्यावर स्पिनेटोरम 11.7 टक्के एस.सी., 08 मिली किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 टक्के एस.सी., 0.3 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोक्टीन 5 टक्के एसजी 0.4 ग्रॅम किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 1.9 टक्के ईसी 1.16 मिली या किटकनाशकांची प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
नवीन लष्करी अळी (फॉल आर्मीवर्म) या किडीचे मका हे मुख्य खाद्य असले तरीही ते पिक शेतातून काढुन टाकल्यास किंवा ते पिक वाढीच्या शेवटच्या टप्प्यात असल्यास त्यांची पसंती कमी होऊन या किडीचा कपाशी, बाजरी व इतर पर्यायी पिकांवर प्रादूर्भाव होण्याचा धोका आहे. ही किड सुमारे 80 पिकांवर उपजिविका करत असल्याने खरीपातील मका पिक काढल्यानंतर ती आजूबाजूच्या इतर पिकांवर स्थलांतरीत होऊ शकते. यावर्षी झालेले पर्जन्यमान विचारात घेता मका व इतर रब्बी पिकांखालील क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी सतर्क राहून या किडीच्या वेळीच व्यवस्थापन करावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी केले आहे.
00000

इयत्ता बारावीच्या परीक्षेत खासगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी व आवेदन अर्जाबाबत सूचना


इयत्ता बारावीच्या परीक्षेत खासगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या
विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी व आवेदन अर्जाबाबत सूचना

अमरावती,दि.30: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्ययमिक प्रमाणपत्र  इ. 12 वी परीक्षेसाठी खाजगीरित्या (private candidate) प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी प्रमाणपत्रासाठी (Enroiment certificate) नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज दिनांक 30 सप्टेंबर 2019 पर्यंत सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्या अनुषंगाने जे विद्यार्थी नांव नोंदणी प्रमाणपत्र मिळण्यास पात्र ठरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना त्याची नाव नोंदणी प्रमाणपत्रे (Enroiment certificate) दिनांक 30 ऑक्टोंबर 2019 पासून विद्यार्थ्यांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर व ईमेलवर संदेश उपलब्ध होतील. अशा विद्यार्थ्यांनी आपले स्वत:चे नावनोंदणी प्रमाणपत्र htt://form17.mh-hsc.ac.in या संकेत स्थळावर दिनांक 30 ऑक्टोंबर 2019 पासून उपलब्ध करुन घ्यावीत.
तसेच सदर नांव  नोंदणी  प्रमाणपत्र  प्राप्त झालेले  खासगी  विद्यार्थ्यांची फेब्रुवारी - मार्च 2020 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.maharashtra.gov.in  किंवा   www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे नियमित शुल्कासह शुक्रवार दि 1 नोव्हेंबर 2019 ते शुक्रवार दि. 15 नोव्हेंबर 2019 व विलंब शुल्कासह शनिवार दि. 16 नोव्हेंबर 2019 ते सोमवार दि. 25 नोव्हेंबर 2019, खाजगी विद्यार्थी परीक्षा आवेदनपत्राचे शुल्क  उच्च माध्यमिक शाळा - कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे भरावयाच्या तारखा शुक्रवार दि. 1 नोव्हेंबर 2019 ते मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर 2019 अशी आहे.
उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्यास चलनासह याद्या जमा करावयाच्या तारीख गुरुवार दिनांक 28 नोव्हेंबर 2019. आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी Pre-list करुन विद्यार्थ्यांमार्फत आवेदनपत्रातील सर्व माहिती अचूक खात्री करावी व विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्यानंतर सदर Pre-list  चलनासोबत विभागीय मंडळात जमा करावी. परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी, सर्व विभागीय मंडळातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रचलित शुल्क मंडळाने निश्चित केलेल्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करुन चलनाची प्रत व विद्यार्थ्यांच्या याद्या दिलेल्या मुदतीतच संबंधित विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात. खासगी विद्यार्थ्यांचे नियमित शुल्कासह तसेच विलंब शुल्कासह आवेदनपत्र सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्क दोन स्वतंत्र चलनाद्वारे भरण्यात यावे, असे डॉ. अशोक भोसले, सचिन,राज्यमंडळ पुणे यांनी कळविले आहे.
00000

ग्रामिण युवक-यूवतींसाठी रोजगारभिमूख प्रशिक्षण


ग्रामिण युवक-यूवतींसाठी  रोजगारभिमूख प्रशिक्षण

अमरावती, दि. 23 : ग्रामिण अल्पशिक्षित युवक व युवतींना स्वयंरोजगार मिळावा यासाठी तांत्रिक कौशल्यावर आधारीत रेफ्रिजरेशन व एअरकंडिशनर दुरुस्ती करण्याबाबत सहा महिने कालावधींचे निशुल्क प्रशिक्षण शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे. कौशल्य विकास व उद्योजकता विकास मंत्रालय, केंद्रिय प्रशिक्षण संचलनालय, अंतर्गत कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पॉलिटेक्निक या योजनेअंतर्गत हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणासाठी अर्ज योजनेच्या कार्यालयामध्ये उपलब्ध असून मुलाखत पध्दतीने प्रशिक्षणार्थ्यांची निवड करण्यात येईल. प्रशिक्षणाबाबत माहितीसाठी कम्युनिटी डेव्हलपमेंट थ्रु पालीटेक्निक योजना कार्यालय, मुलींचे वसतीगृह समोर,शासकीय तंत्रनिकेतन परीसर गाडगे नगर, अमरावती येथे संपर्क साधावा असे, संस्थेचे प्राचार्य डॉ. आर.पी. मोगरे व योजनेचे समन्वयक प्रा.एस..जे. गायकवाड यांनी कळविले आहे.

****

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१९

अमरावती विभागात 42 लाख 72 हजार 331 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क


अमरावती विभागात 42 लाख 72 हजार 331
मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
Ø  यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक 66.20 टक्के मतदान
Ø  वणी मतदारसंघात सर्वाधिक 73.04 टक्के मतदान
अमरावती, दि. 22 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यात 64.99, अकोला जिल्ह्यात 57.80, वाशिम जिल्ह्यात 61.99, अमरावती जिल्ह्यात 60.57 तर यवतमाळ जिल्ह्यात 66.20 टक्के मतदान झाले.  
मतदानाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. विधानसभा मतदारसंघातील तपशिलासमोर कंसात नमूद केलेली आकडेवारी त्या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी दर्शविते.
बुलडाणा जिल्ह्यातील एकूण 20 लाख 41 हजार 712 मतदारांपैकी 13 लाख 26 हजार 908 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मलकापूर मतदारसंघातील 2 लाख 68 हजार 338 मतदारांपैकी एक लाख 84 हजार 898 मतदारांनी मतदान केले. (68.90)
बुलडाणा मतदारसंघातील 3 लाख 5 हजार 174 मतदारांपैकी एक लाख 76 हजार 279 मतदारांनी मतदान केले. (57.76)
चिखली मतदारसंघातील 2 लाख 94 हजार 280 मतदारांपैकी एक लाख 92 हजार 728 मतदारांनी मतदान केले. (65.49)
सिंदखेड राजा मतदारसंघातील 3 लाख 11 हजार 551 मतदारांपैकी एक लाख 99 हजार 594 मतदारांनी मतदान केले. (64.06)
मेहकर मतदारसंघातील 2 लाख 92 हजार 914 मतदारांपैकी एक लाख 73 हजार 491 मतदारांनी मतदान केले. (59.23)
खामगाव मतदारसंघातील 2 लाख 80 हजार 59 मतदारांपैकी एक लाख 97 हजार 120 मतदारांनी मतदान केले. (70.39)
जळगाव जामोद मतदारसंघातील 2 लाख 89 हजार 396 मतदारांपैकी दोन लाख 2 हजार 798 मतदारांनी मतदान केले. (70.08)

अकोला जिल्ह्यातील एकूण 15 लाख 77 हजार 476 मतदारांपैकी 9 लाख 11 हजार 815 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
अकोट मतदारसंघातील 2 लाख 85 हजार 150 मतदारांपैकी एक लाख 81 हजार 998 मतदारांनी मतदान केले. (63.83)
बाळापूर मतदारसंघातील 2 लाख 94 हजार 950 मतदारांपैकी एक लाख 94 हजार 345 मतदारांनी मतदान केले. (65.89)
अकोला पश्चिम मतदारसंघातील 3 लाख 31 हजार 925 मतदारांपैकी एक लाख 68 हजार 678 मतदारांनी मतदान केले. (50.82)
अकोला पूर्व मतदारसंघातील 3 लाख 44 हजार 260 मतदारांपैकी एक लाख 91 हजार 995 मतदारांनी मतदान केले. (55.77)
मुर्तिजापूर मतदारसंघातील 3 लाख 21 हजार 191 मतदारांपैकी एक लाख 74 हजार 799 मतदारांनी मतदान केले. (54.42)

वाशिम जिल्ह्यातील एकूण 9 लाख 58 हजार 551 मतदारांपैकी 5 लाख 94 हजार 248 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
रिसोड मतदारसंघातील 3 लाख 8 हजार 378 मतदारांपैकी दोन लाख 3 हजार 925 मतदारांनी मतदान केले. (66.13)
वाशिम मतदारसंघातील 3 लाख 48 हजार 749 मतदारांपैकी दोन लाख 5 हजार 205 मतदारांनी मतदान केले. (58.84)
कारंजा मतदारसंघातील 3 लाख 1 हजार 424 मतदारांपैकी एक लाख 85 हजार 118 मतदारांनी मतदान केले. (61.41)
अमरावती जिल्ह्यातील 24 लाख 49 हजार 61 मतदारांपैकी 14 लाख 83 हजार 320 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. (60.57)
धामणगाव रेल्वे मतदारसंघात 3 लाख 14 हजार 465 मतदारांपैकी 2 लाख 8 हजार 941 मतदारांनी मतदान केले. (66.44)
बडनेरा मतदारसंघातील 3 लाख 55 हजार 622 मतदारांपैकी 1 लाख 85 हजार 181 मतदारांनी मतदान केले. (52.07)
         अमरावती मतदारसंघातील 3 लाख 45 हजार 465 मतदारांपैकी 1 लाख 70 हजार 758 मतदारांनी मतदान केले. (49.43)
तिवसा मतदारसंघात 2 लाख 95 हजार 574 मतदारांपैकी 1 लाख 72 हजार 927 मतदारांनी मतदान केले. (58.51)
दर्यापूर मतदारसंघातील 2 लाख 96 हजार 651 मतदारांपैकी 1 लाख 88 हजार 895 मतदारांनी मतदान केले. (63.68)
मेळघाट मतदारासंघात 2 लाख 77 हजार 209 मतदारांपैकी 1 लाख 81 हजार 325 मतदारांनी मतदान केले. (65.41)
अचलपूर मतदारसंघात 2 लाख 74 हजार 799 मतदारांपैकी 1 लाख 84 हजार 200 मतदारांनी मतदान केले. (67.03)
मोर्शी मतदारासंघातील 2 लाख 89 हजार 276 मतदारांपैकी 1 लाख 91 हजार 93 मतदारांनी मतदान केले. (66.06).
यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 21 लाख 74 हजार 287 मतदारांपैकी 14 लाख 39 हजार 360 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सात विधानसभा मतदारसंघात 66.20 टक्के मतदान झाले.
वणी मतदारसंघातील 2 लाख 84 हजार 584 मतदारांपैकी दोन लाख 7 हजार 863 मतदारांनी मतदान केले. (73.04)
राळेगाव मतदारसंघातील 2 लाख 83 हजार 368 मतदारांपैकी एक लाख 97 हजार 325 मतदारांनी मतदान केले. ( 69.64)
यवतमाळ मतदारसंघातील 3 लाख 84 हजार 772 मतदारांपैकी 2 लाख 13 हजार 952 मतदारांनी मतदान केले. (55.60)
दिग्रस मतदारसंघातील 3 लाख 22 हजार 785 मतदारांपैकी 2 लाख 24 हजार 835 मतदारांनी मतदान केले. (69.65)
आर्णी मतदारसंघातील 3 लाख 12 हजार 127 मतदारांपैकी 2 लाख 10 हजार 386 मतदारांनी मतदान केले. (67.40)
पुसद मतदारसंघातील 2 लाख 93 हजार 421 मतदारांपैकी 1 लाख 89 हजार 174 मतदारांनी मतदान केले. (64.47)
उमरखेड मतदारसंघातील 2 लाख 93 हजार 230 मतदारांपैकी 1 लाख 95 हजार 825 मतदारांनी मतदान केले. (66.78)

                      दृष्टीक्षेपात मतदान                 
जिल्हा
एकूण
मतदान
टक्केवारी
अमरावती
2449061
1483320
60.57
अकोला
1577476
911815
57.8
बुलडाणा
2041712
1326908
64.99
वाशिम
958551
594248
61.99
यवतमाळ
2174287
1439360
66.2
एकूण
6752026
4272331
----


               विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी
अ.क्र
मतदारसंघाचे नाव
टक्केवारी
1
मलकापूर
68.50
2
बुलढाणा
57.76
3
चिखली
65.49
4
सिंदखेडराजा
64.06
5
मेहकर
59.23
6
खामगाव
70.39
7
जळगाव जामोद
70.08
8
अकोट
63.83
9
बाळापूर
65.89
10
अकोला पश्चिम
50.82
11
अकोला पूर्व
55.77
12
मूर्तिजापूर
54.42
13
रिसोड
66.13
14
वाशिम
58.84
15
कारंजा
61.41
16
धामणगाव रेल्वे
66.44
17
बडनेरा
52.07
18
अमरावती
49.43
19
तिवसा
63.68
20
दर्यापूर
63.08
21
मेळघाट
65.41
22
अचलपूर
67.03
23
मोर्शी
66.06
24
वणी
73.04
25
राळेगाव
69.64
26
यवतमाळ
55.60
27
दिग्रस
69.65
28
आर्णी
67.40
29
पुसद
64.47
30
उमरखेड
66.78
                                                                    000000

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

अमरावती विभागातील निवडणूक यंत्रणा मतदानासाठी सज्ज


अमरावती विभागातील निवडणूक यंत्रणा
मतदानासाठी सज्ज
अमरावती, दि. : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवार (दि. 21 ऑक्टोंबर) रोजी होणाऱ्या मतदानासाठी अमरावती विभागातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
या निवडणूकीत विभागातील पाच जिल्ह्यातील 91 लाख 98 हजार 695 मतदार त्याचा मतदानाचा हक्क बजावू शकतील. विभागातील 30 मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या 367 उमेदवारांचे भवितव्य  हे मतदार निश्चित करतील. मतदानासाठी 10 हजार 145 मतदान केंद्र कार्यान्वित केले जाणार असून त्यावर सुमारे 51 हजार अधिकारी- कर्मचारी कार्यरत असणार आहेत.
 विभागातील जिल्हानिहाय तपशिल पुढील प्रमाणे आहे.
बुलढाणा जिल्ह्यात 7 मतदारसंघ असून मलकापूर मतदारसंघातून 11,बुलडाणा 7, चिखली 10, मेहकर 5, सिंदखेडराजा 10, खामगांव 12, आणि जळगांव जामोद मतदारसंघातून 4 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. जिल्ह्यात 10 लाख 68 हजार 407 पुरुष, 9 लाख 71 हजार 19 महिला आणि 9 इतर असे 20 लाख 39 हजार 435 मतदार आहेत. जिल्ह्यातील मतदानकेंद्रांची संख्या 2 हजार 263 इतकी असून त्यावर 12 हजार 617 अधिकारी -कर्मचारी  कार्यरत असतील.
 अकोला जिल्ह्यात  5 मतदारसंघ असून आकोट मतदारसंघातून 17, बाळापूर 15, अकोला पश्चिम 9, अकोला पूर्व 13, आणि मूर्तीजापूर मधून 14 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. जिल्ह्यात 8 लाख 13 हजार 745 पुरुष, 7 लाख 63 हजार 663 महिला तर 50 इतर असे एकूण 15 लाख 80 हजार 556 मतदार आहेत. जिल्ह्यातील मतदानकेंद्रांची संख्या 1 हजार 703 एवढी आहे. या केंद्रांवर 9 हजार 461 अधिकारी-कर्मचारी कार्यरत असतील.
वाशिम जिल्ह्यात 3 मतदारसंघ आहेत. रिसोड मतदारसंघातून 16, वाशिम 13 तर कारंजा मतदारसंघातून 15 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. जिल्ह्यात 5 लाख 451 पुरुष, 4 लाख 58 हजार 90 महिला, तर 10 इतर असे एकूण 9 लाख 58 हजार 551 मतदार आहेत. जिल्ह्यात 1 हजार 52 मतदानकेंद्र  असून त्यावर 4 हजार 636 अधिकारी- कर्मचारी काम पाहतील.
 अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघ आहेत. धामणगाव रेल्वे मतदारसंघात 20, बडनेरा 18, अमरावती 20, तिवसा 10, दर्यापूर 11, मेळघाट 8, अचलपूर 11, आणि मोर्शी मतदारसंघातून 11 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. जिल्ह्यात 12 लाख 58 हजार 99 पुरुष, 11 लाख 87 हजार 625 महिला, आणि 42 इतर असे एकूण 24 लाख 45 हजार 766 मतदार आहेत. जिल्ह्यातील मतदारकेंद्राची संख्या 2 हजार 628 एवढी आहे. तेथे 11 हजार 314 अधिकारी- कर्मचारी काम पाहतील.
यवतमाळ जिल्ह्यात सात मतदारसंघ आहेत. वणी मतदारसंघात 19, राळेगाव 13, यवतमाळ 13, दिग्रस 10, आर्णि 11, पुसद 11,आणि उमरखेड मतदारसंघात 10 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. जिल्ह्यात 11 लाख 25 हजार 956 पुरुष आणि 10 लाख 48 हजार 301  महिला, 30 इतर असे 21 लाख 74 हजार 287 मतदार आहेत. जिल्ह्यातील मतदान केंद्राची संख्या 2 हजार 499 इतकी असून त्यावर 12 हजार 995 अधिकारी-कर्मचारी कार्यरत असतील.
मतदानासाठी कार्यरत असणाऱ्या अधिकारी -कर्मचाऱ्याच्या वाहतुकीसाठी विभागात 2 हजार 590 वाहने उपयोगात आणली जातील.
****

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९

ऑक्टोंबर महिन्यात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही


ऑक्टोंबर महिन्यात विभागीय लोकशाही दिनाचे
आयोजन करण्यात येणार नाही

अमरावती, दि. 4  :  विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची आदर्श आचारसंहिता अमलात असल्यामुळे 14 ऑक्टोंबर रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन होणार नसून आचारसंहिता कालावधी संपुष्टात येईपर्यंत विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नाही. असे विभागीय आयुक्त पियुषसिंह यांनी कळविले आहे.
****