सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

पाणीटंचाई निवारण्याच्या प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी त्वरीत करावी - पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर

 








पाणीटंचाई निवारण्याच्या प्रभावी उपाययोजनांची

 अंमलबजावणी त्वरीत करावी

-         पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर

Ø  पाणी टंचाई आढावा बैठकीत दिले निर्देश    

अमरावती दि.28: येत्या काही दिवसात उन्हाळ्याची तीव्रता झपाट्याने वाढेल अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना संभाव्य पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागू नये यासाठी प्रशासनाने पाणी टंचाई  निवारण्याच्या प्रभावी उपाययोजनांची त्वरीत अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले. मोर्शी येथील तहसील कार्यालयातील सभागृहात मोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या 33 गावांच्या पाणी टंचाई निवारणार्थ घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता ढोमणे, अनिल उनराखे, मोर्शी पंचायत समिती सभापती विना बोबडे, उपसभापती सोनाली नवले, सदस्य रुपाली पुड, जया कळसकर, माया वानखेडे, सुनिल कडु, भाऊ छापाने, शंकर उईके, मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसिलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी रविंद्र पवार, आदी उपस्थित होते.

एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता असलेल्या

     गावात उपाय योजना सुरु कराव्या

लेहगाव, वाघोली, सावरखेड, शिरखेड, आखतवाडा, बेलापुर, अडगाव, पातुर, शिरुर, शिरलस, राजुरवाडी, निपाणी, तळेगाव, कवठा, भांबोरा, तुळजापुर, मंगरूळ, बोरगव्हाण व धामणगाव याठिकाणी पाण्याची समस्या नसल्याबाबतची माहिती संबंधित गावाच्या सरपंचांनी दिली. परंतु तीव्र उन्ह्याळयात संभाव्य पाणी टंचाईची समस्या नाकारता येत नाही. या गावांमध्ये त्यावर उपाययोजना करण्यात याव्या. लेहगाव येथे हातपंपाची दुरुस्ती, सावरखेड व शिरखेड येथे नवीन टाकीसाठी प्रस्ताव, अडगाव व तळेगाव येथे पाईपलाईनचे काम, शिरलस येथे येत्या एप्रिल-मे महिन्यात विहिरी अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया, धामणगाव येथे हातपंपसाठी प्रस्ताव सादर करण्यात यावे असे निर्देश श्रीमती ठाकुर यांनी संबंधीतांना दिले. गोराळा, विष्णोरा, शिरलस, कमळापुर येथे येत्या काळात विहिरी अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया पुर्ण करावी.

                  टंचाईग्रस्त गावात तातडीने सुविधा निर्माण कराव्या

मोर्शी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावातील पाणीटंचाईबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावे. गोराळा, काटपुर, पुसदा, घोडगव्हाण, काटसुर, नया वाठोडा, लिहीदा, रोहनखेड, विचोरी, शिरजगाव, अडगाव, नेरपिंगळाई येथे तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये नळ दुरुस्ती, गावातील विहिरींची दुरुस्ती, गाळ काढणे, यासारख्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. असे निर्देश श्रीमती ठाकुर यांनी दिले. शिरजगाव  येथील  अंतर्गत पाईप जोडणीचे काम, रोहणखेड येथे बोअर करण्यात यावे. नेरपिंगळाई, पुसदा येथिल टंचाई बाबतचे प्रस्ताव प्राधान्याने पुर्ण करण्याच्या सुचना श्रीमती ठाकुर यांनी केल्या.

 

जलजीवन मिशन अंतर्गत जास्तीत जास्त कामे पूर्ण करावी

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी टंचाई वर जास्तीत जास्त उपाययोजना करता येणे शक्य आहे. सर्व ग्रामपंचायतींनी टंचाईबाबतच्या प्रस्तावित कामाबाबत ठराव तात्काळ मंजूर करून प्रशासनास सादर करावा. आवश्यकता असेल त्या गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी साठवण्याच्या नवीन टाकीची निर्मिती, जुन्या पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे काम पुर्ण करण्यात यावे. अशा सूचना श्रीमती ठाकूर यांनी  संबंधिताना दिल्या.

0000000

 

 

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

राज्यमंत्र्याकडून स्वत: झाडू हाती धरुन गावात स्वच्छता संत गाडगेबाबांनी शिकवलेली जीवनमुल्ये आत्मसात करुया - राज्यमंत्री बच्चू कडू

 




राज्यमंत्र्याकडून स्वत: झाडू हाती धरुन गावात स्वच्छता

संत गाडगेबाबांनी शिकवलेली जीवनमुल्ये आत्मसात करुया

-         राज्यमंत्री बच्चू कडू

Ø नागरवाडी येथे भक्त निवासाचे राज्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

       अमरावती, दि. 24 : संत गाडगेबाबा यांना समाजाला मानवतेच्या मुल्यांची शिकवण दिली. तळागाळातील सर्वांपर्यत त्यांनी किर्तनाच्या माध्यमातुन ज्ञानदान केले. लोकांशी संवाद साधुन त्यांनी समाजात स्वच्छता, आरोग्य, अंधश्रद्धा, शिक्षण, मुर्तिपुजा याबाबत जनजागृती करण्याची किमया साधली. माणसांमध्ये देव पाहणाऱ्या गाडगेबाबांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी व स्फुर्तिदायी आहे. गाडगेबाबांच्या कार्याचा आदर्श आपण डोळयासमोर ठेवुन शिकवलेली जीवनमुल्ये आत्मसात करुया असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगीतले.

                     5 कोटी निधीतुन श्रीक्षेत्र नागरवाडी विविध कामे

गाडगे बाबा जयंती महोत्सव चांदुर बाजार येथील नागरवाडी येथे साजरा करण्यात आला. नागरवाडीतील भक्तनिवासचे भूमिपूजन (दि.23) राज्यमंत्री श्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले. तिर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेअंतर्गत अंदाजे पाच कोटी रुपयांच्या निधीतुन निर्माण करण्यात येणाऱ्या भक्तनिवासमुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे. येथे भक्तनिवासाच्या इमारतीची निर्मिती व नागरी सुविधांसोबतच येथील परिसराचे सौंदर्यीकरण व बळकटीकरण करण्यात येणार आहे. गोशाळा, सभागृहाची निर्मितीसह आदी प्रस्तावीत कामे देखील नागरवाडी येथे करण्यात येणार आहे.

   नागरी सुविधांच्या निर्मितीमुळे विकासप्रक्रिया गतीमान होत असते. त्यामुळे नागरी सुविधांची कामे प्राधान्याने व तातडीने पूर्ण करण्यात येतील असे श्री कडू यांनी यावेळी सांगितले. तहसिलदार धीरज स्थूल, मंगेश देशमुख, गाडगेबाबा मिशनचे संचालक, सदस्य व नागरिक उपस्थित होते.

निसर्ग पर्यटनातून रोजगाराची संधी

निसर्ग पर्यटनाच्या क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी दडलेल्या आहेत. आपल्या परिसरातील नैसर्गिक बाबींनी समृद्ध पर्यटन क्षेत्राची देखभाल करणे आपले कर्तव्य आहे. निसर्ग पर्यटन विकास योजनेअंतर्गत पर्यटन स्थळ विकसीत करण्यात येत आहेत त्यामुळे या क्षेत्रात अनेक रोजगार उपलब्ध होण्यास वाव आहे. निसर्ग पर्यटन विकास योजनेअंतर्गत चांदुर बाजार येथिल नागरवाडी पर्यटन केंद्र विकसीत करण्यात येत आहे. या पर्यटन केंद्रात 82 लक्ष रुपयांच्या प्राप्त निधीतुन चेनलिंक फेन्सिंग (साखळी कुंपण) करण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन श्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पंचायत समिती सदस्य वनमाला गणेशकर, मंगेश देशमुख यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

राज्यमंत्र्यांनी केली गावात स्वच्छता

        संत गाडगेमहाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यमंत्री श्री कडू यांनी तालुका अचलपूर व चांदुर बाजार येथे स्वच्छता अभियान राबविले. राज्यमंत्र्यांनी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबविले. श्री कडू यांनी स्वत: सर्व परिसर स्वच्छ केला.

चौक, पुतळे, सार्वजनिक जागा आदी ठिकाणे स्वच्छता कायम राहिली पाहीजे. संत गाडगेबाबा यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश लक्षात घेऊन अचलपूर, परतवाडा, चांदुर बाजार येथे फवारणी, आवश्यक रंगरगोटी, झुडूपे व कचरा हटवणे आदी स्वच्छता राबविण्यात येणार आहे. स्वच्छतेची सवय प्रत्येकाने आपल्या अंगी बाणवून घ्यायला हवी असा संदेश श्री कडू यांनी यावेळी सर्वांना दिला. यावेळी संदीपकुमार अपार अधिकारी उपस्थित होते.

000000

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

संत गाडगेबाबा यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 

संत गाडगेबाबा यांना

विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

अमरावती, दि. 23 : थोर संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आज अभिवादन कार्यक्रम झाला. याप्रसंगी विभागीय आयुक्त पियुषसिंह यांनी व कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

000000


मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२

शेतकरी व मजुर बांधवाच्या हितासाठी उपयुक्त तंत्रज्ञान विकसीत करावे - राज्यमंत्री बच्चू कडू

 

                               शेतकरी व मजुर बांधवाच्या हितासाठी

उपयुक्त तंत्रज्ञान विकसीत करावे

                                                                  - राज्यमंत्री बच्चू कडू

 








अमरावती दि 22: शेतकरी व मजुर बांधवाच्या हितासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन कामगार व शालेय शिक्षण मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केले. अमरावती येथील शासकीय तंत्रनिकेतनला ( दि.18) त्यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. विजय मानकर, सहसंचालक एम. पी. वाडेकर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, सहा. संचालक (तांत्रिक) एम.एम. अंधारे, पी. एम. भुयार, विभाग प्रमुख व अधिव्याख्याता उपस्थित होते.

पुढे बोलतांना श्री. कडू म्हणाले, शिक्षित व तंत्रकुशल वर्गाने आपल्या ज्ञानाचा वापर तळागाळातील समाजासाठी करावा. शेतकरी, मजुर बांधवाच्या हिताचे संशोधन व उपक्रम वेळोवेळी राबवावे. संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री. कडू यांनी यावेळी केले.

यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील शैक्षणिक बाबींचा आढावा घेतला असता श्री. कडू यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या वेळापत्रक व परीक्षा पद्धतीची माहीती घेतली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका त्यांना वेळेत उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधितांना सुचना केल्या. गरजु विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधांचा लाभ द्यावा. विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक बाबींमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधितांना सुचना केल्या.

सुत्रसंचालन स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे डॉ. नरेद्र सिनकर यांनी केले. आभार उपयोजित यंत्रशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रशांत उत्तरवार यांनी मानले. विविध विषयाचे अधिव्याख्याता व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

 

                                           00000000000

 

इयत्ता दहावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध/दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत

 

इयत्ता दहावीच्या परीक्षेची प्रवेशपत्र

 संकेतस्थळावर उपलब्ध

अमरावती, दि. 21 (विमाका) :  इयत्ता दहावीच्या शैक्षणिक वर्ष मार्च-एप्रिल २०२२ मध्ये होणाऱ्या परिक्षांचे ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

सर्व माध्यमिक शाळांना मार्च - एप्रिल २०२२ च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शुक्रवार, दिनांक 18 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 1.00 वाजल्यापासून school login मध्ये download करण्याकरिता उपलब्ध होतील.

मार्च-एप्रिल 2022 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळांनी दहावी परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्र प्रिंट करुन विद्यार्थ्यांना द्यावीत. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्याव्या. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा असे अमरावती विभागीय मंडळाचे सचिव उल्हास नरड यांनी कळविले आहे.

                                                            0000000

वृत्त क्र. 73                                                            दिनांक: 22 फेब्रुवारी 2022

दहावी व बारावीच्या

परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत

अमरावती, दि. 21 (विमाका) :  शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी व इयत्ता दहावीची परीक्षा या नियमित परीक्षांकरिता तसेच पुरवणी परीक्षांकरिता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबतची अट सन 2022 या वर्षापुरतीच खासबाब म्हणून क्षमापित करुन विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार ही बाब विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त शाळा व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी असे अमरावती विभागीय मंडळाचे सचिव उल्हास नरड यांनी कळविले आहे.

0000

 

सोमवार, २१ फेब्रुवारी, २०२२

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२१ साठी प्रवेशिका 28 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

 

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२१ साठी

प्रवेशिका 28 फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

         अमरावती, दि. 21 (विमाका) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता,उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा,उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात येत आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2021 ते 31 डिसेंबर, 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून  दिनांक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत ही मुदत वाढविण्यात आली आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी त्यांच्या प्रवेशिका कार्यालयात सादर कराव्या.

           उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2021 चे माहितीपत्रक/अर्जाचे नमुने शासनाच्या www.maharashtra.gov.in आणि महासंचालनालयाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांना, तसेच दिल्ली येथील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32 येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेता येईल. 

           राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारामध्ये 11 राज्यस्तरीय तर, 8 विभागीय स्तरावरील पुरस्कार असे एकूण 19 पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहेत

पुरस्कारांची माहिती

अ.क्र पुरस्काराचे नाव पारितोषिक

1. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार (मराठी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

2. अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार (इंग्रजी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

3. बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

4. मौलाना अबुल कलाम आझाद पुरस्कार(उर्दू) (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

5. यशवंतराव चव्हाण पुरस्कार शासकीय गट (मराठी) (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) 51 हजार रुपये

     (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

6. पु.ल.देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार(राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

7. तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

8. केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार शासकीय गट (माहिती व जनसंपर्क) (राज्यस्तर) 51 हजार रुपये

     (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

9. समाज माध्यम पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

10. स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

11. पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार (राज्यस्तर) 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

विभागीय पुरस्कार

 12. दादासाहेब पोतनीस पुरस्कार, नाशिक विभाग 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र,

       या व्यतिरिक्त रुपये 10 हजार दै.गावकरीने पुरस्कृत केले आहेत.)

13. अनंतराव भालेराव पुरस्कार, औरंगाबाद आणि लातूर विभाग 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

14. आचार्य अत्रे पुरस्कार, मुंबई विभाग 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

15. नानासाहेब परूळेकर पुरस्कार, पुणे विभाग 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

16. शि.म.परांजपे पुरस्कार, कोकण विभाग 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

17. ग.गो.जाधव पुरस्कार, कोल्हापूर विभाग 51 हजाररुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

18. लोकनायक बापूजी अणे पुरस्कार, अमरावती विभाग 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

19. ग.त्र्यं.माडखोलकर पुरस्कार, नागपूर विभाग 51 हजार रुपये (मानचिन्ह व प्रशस्तीपत्र)

 या पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठविण्यासाठीच्या नियम व अटी खालीलप्रमाणे आहेत

 नियम व अटी

राज्य / विभागीय पुरस्कार

            पुरस्कारांसाठी पत्रकारांची मागील पाच वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिद्धीसाठी, जनतेमधील विकासविषयक जाणिवांच्या जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि पुरस्कार देण्यात येणाऱ्या वर्षातील त्यांची कामगिरी याचा विचार केला जाईल. मराठी, इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेतील राज्य/विभागीय पुरस्कारांसाठी पत्रकारांची निवड याच पद्धतीने केली जाईल. या स्पर्धेत फक्त मराठी भाषेसाठी व राज्य व विभागीयस्तर आहेत. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषेतील पुरस्कार तसेच समाज माध्यम पुरस्कार आणि स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार हे केवळ राज्यस्तरीय आहेत. पुरस्कारासाठी निवड झाल्यास पुरस्कार स्वीकारण्याची तयारी असल्याचे संबंधित पत्रकाराचे संमती पत्र प्रवेशिके सोबत जोडणे आवश्यक आहे.

            उत्कृष्ट लेखन पुरस्कारासाठी पाठवावयाच्या प्रवेशिकेसोबत मूळ लेखनाचे कात्रण त्याच्या दोन प्रतीसह पाठवावे. मूळ लेखनाच्या वृत्तपत्रीय कात्रणांसोबत त्याच्या दोन प्रती नसल्यास प्रवेशिका रद्द होईल. मूळ लेखनावर लेखकाचे नाव नसल्यास ज्या नियतकालिकात हा लेख प्रसिद्ध झाला असेल त्या नियतकालिकाच्या संपादकांचा दाखला जोडलेल्या प्रवेशिकांचाच विचार केला जाईल.

            पत्रकारांच्या तसेच वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या गटात भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी शासन अथवा शासकीय महामंडळाच्या सेवेत नसल्याचे प्रतिज्ञापत्र प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.

            अर्जदाराने राज्य व विभागीय पातळीवरील प्रवेशिका नागपूर आणि औरंगाबाद येथील संचालक (माहिती), अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, कोकण विभाग येथील विभागीय उपसंचालक (माहिती) किंवा जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे थेट पाठवाव्यात. प्रवेशिकेसोबत जिल्हा माहिती अधिकारी किंवा पत्रकार संघटनांच्या शिफारसपत्राची आवश्यकता नाही.

           मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या चारही भाषेतील राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी तसेच राज्यपातळीवरील शासकीय गट व विभागीय पातळीवरील मराठी भाषेतील पुरस्कार पात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी माहिती व जनंसपर्क महासंचालनालयातर्फे परीक्षकांची समिती नियुक्त करण्यात येईल. समितीची रचना, स्पर्धा व स्पर्धेतील पुरस्कारासंबंधी शासनाचे निर्णय अंतिम राहतील.

           ज्या नियतकालिकांचा खप व जनमानसावरील प्रभाव चांगला आहे, अशाच नियतकालिकांतील मजकूर स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी पात्र ठरेल.जे पत्रकार बृहन्मुंबई, नवी मुंबई(कोकण), कोल्हापूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे आणि औरंगाबाद या विभागात वास्तव्य करीत असतील, त्यांना त्या विभागासाठी असलेल्या विभागीय स्पर्धेतच भाग घेता येईल. मात्र त्यांचे लेखण अन्य कोणत्याही विभागातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले असेल तरी ते ग्राह्य मानण्यात येतील.

गोवा व बेळगाव येथील पत्रकारांना कोल्हापूर विभागीय स्पर्धेत (सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यांसह) सहभाग घेता येईल. दिल्ली येथील पत्रकारांनी आपल्या प्रवेशिका थेट किंवा महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत मुख्यालयात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, मंत्रालय मुंबई-32 येथे पाठवाव्यात.

             शासकीय गटातील स्पर्धेसाठी एकच प्रवेशिका पाठविण्याची मुभा राहील. प्रवेशिका संबंधी विभागाच्या संचालक किंवा उपसंचालकांना व बृहन्मुंबईच्या प्रवेशिका माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वेगवेगळ्या पाठवाव्या लागतील.

            2021 या वर्षात दैनिक वृत्तपत्रात, नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या लेखांची कात्रणे प्रवेशिकेसोबत जोडणे आवश्यक आहे.

प्रवेशिका राज्यस्तर किंवा विभागीयस्तरासाठी आहे. तसेच, कोणत्या भाषेकरिता आहे याबाबतचा स्पष्ट उल्लेख असावा. स्पर्धेसाठी पाठविलेली प्रवेशिका, त्यासोबत जोडलेली लेखांची कात्रणे निटनेटकी असणे अत्यावश्यक आहे. अस्ताव्यस्त, खाडाखोड असणारी किंवा वाचता येणार नाहीत, अशी प्रवेशिका रद्द करण्यात येईल. एकाच पत्रकाराला सलग दोन वर्ष पुरस्कार प्राप्त झाला असल्यास तिसऱ्या वर्षी त्याची प्रवेशिका विचारात घेतली जाणार नाही.

             प्रत्येक गट व भाषेसाठी संबंधित पत्रकारांनी एकच प्रवेशिका पाठवावी. एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठविल्यास त्याचा विचार केला जाणार नाही.

विकास योजना संदर्भातील समाज माध्यम (सोशल मीडिया) पुरस्कार

            ही स्पर्धा वृत्तविषयक/चालू घडामोडीविषयक संकेतस्थळे व ब्लॉग या समाज माध्यमात प्रसारित मराठी भाषेतील वृत्तविषयक विशेषत: शासकीय मजकुरासाठी आहे. या दोन माध्यमांचा प्रभावी वापर करणाऱ्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील व्यक्तींना या पुरस्कारासाठी सहभाग घेता येईल. समाज माध्यमातील पत्रकारिता ही स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावी. हे लेखन किमान एक वर्षापासून सुरु असावे. या माध्यमाचा वापर करताना केंद्र शासनाने विहीत केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब केलेला असावा. प्रवेशिका पाठविताना अर्जदाराने व त्यांचे नामनिर्देशन ज्या व्यक्ती/संस्था/संघटना करतील त्यांनी संकेतस्थळ व ब्लॉग या समाज माध्यमांद्वारे करण्यात आलेल्या प्रसिद्धींची उदाहरणे व ती कोणत्या तारखेस प्रसारित झाली त्यांच्या मुद्रीत प्रती (प्रिंट आऊट) सादर कराव्यात. विविध पुरस्कारासाठी असलेल्या अटी या गटासाठी लागू राहतील.

स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार

             केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान आणि राज्य शासनाचे स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. आपल्या लेखनातून लोकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करणाऱ्या पत्रकारांसाठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रांमध्ये लेखन करणाऱ्या पत्रकारांना तसेच ईलेक्ट्रॉनिक्स माध्यमांमधील पत्रकारांना सहभागी होता येईल.

             स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र स्वच्छता अभियान (नागरी), संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, हगणदारीमुक्त गाव योजना, घन कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचऱ्यामधून बायोगॅस तसेच वीज निर्मिती इत्यादी बाबत लेखण केलेले असावे.शासनस्तरावरुन राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता विषयक योजनांची प्रसिद्धी, स्वच्छता अभियान लोकसहभाग वाढविण्यासाठी लेखनाद्वारे करण्यात आलेले प्रयत्न, स्वच्छतेचे महत्व पटविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीपर लेखन यांचा या स्पर्धेत अंतर्भाव होईल. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी स्पर्धा

             इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसाठी पु.ल.देशापांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार देण्यात येतो. ही स्पर्धा मराठी भाषेतील वृत्तकथेसाठी असून दूरदर्शन, खाजगी चित्रवाहिन्या, स्थानिक केबल न्यूज व शासकीय उपक्रम यांना यामध्ये सहभाग घेता येईल. वृत्तकथाचित्रे ही स्पर्धेच्या संबंधित वर्षात तयार केलेली व प्रसारित झालेली असावीत. वृत्तकथा किमान 3 मिनिटे असावी. प्रवेशिका पाठवितांना संबंधित प्रतिनिधीची माहिती तसेच वृत्तकथा कोणत्या तारखेस प्रसारित झाली, याबाबतचे संबंधित संस्था प्रमुख/संपादक यांचे प्रमाणपत्र जोडलेले असावे. स्थानिक केबलच्या बाबतीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे नोंदणीपत्र सादर करणे आवश्यक आहे.

प्रवेशिकेसोबत संबंधित वृत्तकथेची सीडी/कॅसेट थेट त्या त्या विभागातील उपसंचालक /जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे तर मुंबईकरिता उपसंचालक (वृत्त), यांच्या नावाने मुंबई येथील मुख्यालयातील पत्त्यावर पाठवावे.

छायाचित्रकार पुरस्कार

             तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार स्पर्धा, ही मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू भाषेतील वृत्तपत्रातील पूर्णवेळ छायाचित्रकारांसाठी आहे. यात सामाजिक संदेश देणारी छायाचित्रे, समाजातील प्रश्न मांडणारी छायाचित्रे, शासकीय योजनांचा प्रचार आणि प्रसारासाठी पुरक ठरतील अशी छायाचित्रे यांच्यासह प्रवेशिका सादर करता येईल.

            महाराष्ट्र शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवरील छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईल. मात्र हे छायाचित्र मूळ स्वरुपातील असावे. फोटो प्रत नसावी. स्पर्धेसाठी असणाऱ्या सर्व अटी या गटासाठी लागू राहतील.

                केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, शासकीय गट (मावज)

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये छायाचित्रकार म्हणून काम करणारे कर्मचारी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.

पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार

              विविध विकास कामांची दखल, आपल्या अग्रलेखांद्वारे घेणाऱ्या पत्रकार/संपादकांना, पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार देण्यात येईल.

              या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील संपादकांना सहभाग घेता येईल. या स्पर्धेसाठी लिहिलेले अग्रलेख हे स्पर्धेच्या संबंधित वर्षातील असावे.

             प्रवेशिका पाठविताना अर्जकर्त्याने वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या किमान 25 अग्रलेखांची कात्रणे त्याच्या प्रसिद्धीच्या तारखेच्या माहितीसह सादर करावे.

इतर पुरस्कारांसाठी असलेले इतर सर्व नियम व अटी या पुरस्कारासाठीही लागू असतील.

0000000

शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२

23 फेब्रुवारी ते 14 एप्रिल पर्यंत महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी अभियान - राज्यमंत्री बच्चू कडू

 







23 फेब्रुवारी ते 14 एप्रिल पर्यंत

महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी अभियान

                                                                                                                 - राज्यमंत्री बच्चू कडू

Ø  महिला व बालविकास विभाग व जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा आढावा

 

अमरावती दि 18: महिला व बालविकास  विभागाकडून बालसंगोपन योजना व अनाथ बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ सर्वदूर पोहोचवण्यासाठी येत्या 23 फेब्रुवारी ते 14 एप्रिल या कालावधीत अचलपूर व चांदुर बाजार येथे नोंदणी अभियान राबविण्यात यावे, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बैठकित दिले. महिला व बालविकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सखोल आढावा शासकिय विश्रामगृहात आज त्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते.

महिला व बालविकासचे विभागीय उपायुक्त सुनिल शिंगणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उमेश टेकाळे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अतुल भडांगे, राजश्री कोलखेडे, राजेश वानखेडे, मंगल पांचाळ, रेखा चारथळ आदी उपस्थित होते.     

बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ देता येईल अशा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात यावे. त्यांना तात्काळ लाभ देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी हे नोंदणी अभियान राबविण्यात यावे असे त्यांनी सांगितले. या नोंदणी अभियानात अचलपूर व चांदुर बाजार तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा समावेश करण्यात यावा. विहित अर्जाचा नमुना तयार करून अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून बालसंगोपन योजनेचा  लाभ घेणारे व अनाथांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत विधवा, बालके, कोविडकाळात  अनाथ झालेली बालके, एक पालक असलेले बालक यांच्या संपूर्ण माहितीची नोंद घेण्यात यावी. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे अशा सुचना श्री. कडू यांनी महिला व बालविकास विभागाच्या संबंधीत सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.

योजनेअंतर्गत घेण्यात येणारी माहिती  तातडीने परिपूर्ण व अद्ययावत करावी

बालसंगोपन योजना व अनाथांसाठीच्या योजना राबवित असतांना  2013 पासून म्हणजे योजना अंमलात आली तेव्हापासून ते आज पर्यंत प्राप्त अर्जांची संख्या, पात्र अर्ज, अर्जातील त्रुटी,  योजनेअंतर्गत करण्यात आलेला निधीवाटप, नवीन लाभार्थी, याबाबत सर्व माहिती तात्काळ अद्ययावत करून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश श्री कडू यांनी दिले.

सर्व पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ द्यावा

योजनांची अंमलबजावणी करतांना लाभार्थी निवडीची प्रक्रिया गंभीरपणे पार पाडावी. प्राप्त अर्जाची छाननी योग्य प्रमाणे व तातडीने करावी. जिल्ह्यातील अनाथ बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी मोहिम स्वरुपात काम करावे. कोणतेही अनाथ बालक यातुन वगळला जाणार नाही यासाठी प्रयत्न करावे. एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश श्री कडू यांनी दिले.

           व्यसनाधीन कुटूंबासाठी विशेष कार्यक्रम राबविणार

कुटूंबातील व्यसनाधीन व्यक्तिचे समुपदेशन करुन त्या महिलांना आर्थिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योजनेचा प्रारुप आराखडा तयार करण्यात यावा. परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या महिलांना बळ देण्यासाठी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभुमीवर करता येणाऱ्या नाविन्यपुर्ण कामांबाबत श्री कडू यांनी चर्चा केली.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या राबविण्यात येणाऱ्या योजना

मानव विकास योजने अंतर्गत धारणी चिखलदरा या दोन ठिकाणी  तेजश्री फायनान्स सर्विसेसच्या माध्यमातून महिलांना  रोजगारासाठी अनुदान  वितरित करण्यात येत असून सध्या 965 महिला या योजनेचा लाभ घेऊन रोजगार करीत आहेत. अचलपूर येथे अपंगांचे 42 बचत गट निर्माण केले असून  याव्यतिरिक्त अचलपूर येथे 400 व चांदुर बाजार येथे 200 बचत गट निर्माण करण्यात आले आहेत. अल्पसंख्याक महिलांच्या बचतगटाची निर्मिती करण्यावर भर देत असल्याच्या  माहितीचे सादरीकरण माविम चे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी  यावेळी केले.

अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी करावी

अंगणवाडी मध्ये प्रवेश घेतलेली सहा वर्षे आतील अशी बालके ज्यांना ऐकण्यात व बोलण्यात  अडचण येत आहे, अश्या बालकांची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. या तपासणीसाठी डॉक्टरांची एक चमू तयार करावी. तपासणीअंती अडचण असलेल्या बालकांची नावे व संपूर्ण माहिती आरोग्य विभागाला देऊन या बालकांवर तात्काळ वैद्यकीय उपचार सुरू करावे. कोरोनाकाळात  बालकांना आरोग्यविषयक निर्माण झालेल्या समस्यांवर देखील उपचार करण्याचे निर्देश श्री कडू यांनी दिले. अंगणवाडी बांधकाम, माझी कन्या भाग्यश्री योजनेचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

तिर्थक्षेत्र विकास योजनेला गती द्यावी

तिर्थक्षेत्र स्थळाचा विकास करत असतांना शासन निर्णयातील तरतुदीची पूर्तता करावी. तिर्थक्षेत्र ठिकाणी योग्य त्या सुविधांसाठी निधी खर्च करण्यात यावा. तिर्थक्षेत्राचा विकास करतांना सर्वप्रथम ग्रामपंचायतकडून प्रस्ताव घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. घाटलाडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निविदा प्रक्रिया व बांधकामासंबंधी माहीती त्यांनी यावेळी घेतली. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या नादुरुस्त इमारतींच्या ठिकाणी नवीन इमारती बांधतांना शासन निर्णयात दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन करण्याच्या स्पष्ट सुचना श्री. कडू यांनी संबंधितांना दिल्या. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे, प्रविण सिनारे, अतिरीक्त मुख्य कार्यकारीह अधिकारी श्रीराम कुळकर्णी, कार्यकारी अभियंता विजय वाठ, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुरुषोत्तम सोळंके,अचलपुरच्या उपअभियंता नीला वंजारी आदी उपस्थित होते.

000000

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

संत श्री.रविदास महाराज यांना अभिवादन

 


संत श्री.रविदास महाराज यांना अभिवादन

अमरावती,दि.१6समाजाला मानवता आणि समानतेची शिकवण देत सामाजिक एकतेचा संदेश देणारे संत शिरोमणी श्री.रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज १6 फेब्रुवारी रोजी विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी संत श्री. रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. यावेळी संजय पवार उपायुक्त (सा.प्र.), श्यामकांत म्हस्के सहा.आयुक्त (भूसुधार), विवेकांनद काळकर सहाय्यक आयुक्त (मागासवर्ग), तहसिलदार वैशाली पाथरे आदी उपस्थित होते.उपस्थितांनी सुध्दा संत श्री.रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२

धनगर समाजातील महिला नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजना

 

धनगर समाजातील महिला नवउद्योजकांसाठी मार्जिन मनी योजना

                पात्र लाभार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

-         प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे

अमरावती दि. 14 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत स्टँडअप इंडिया योजनेत धनगर समाजातील महिलांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आली आहे. विभागातील पाचही जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रादेशिक समाजकल्याण उपायुक्त सुनील वारे यांनी केले आहे.

धनगर समाजातील नवउद्योजक महिला लाभार्थ्यांना सहाय्य करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया या योजनेत लाभ घेण्यास पात्र ठरलेल्या महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या नवउद्योजकांना प्रकल्प किमतीच्या 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करुन दिला जातो. त्याच धर्तीवर भटक्या जमाती-क या प्रवर्गातील नवउद्योजकांना आर्थिक सहाय्य केले जाते.

                        अशी आहे तरतूद

 या योजनेत प्रकल्प किमतीच्या 75 टक्के निधी बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या कर्जाद्वारे उभा करावा लागतो. लाभार्थ्यांने भरावयाच्या 25 टक्के निधीपैकी केवळ 10 टक्के निधी लाभार्थ्याला द्यावा लागतो. उर्वरित 15 टक्के निधी मार्जिन मनी म्हणून शासनाद्वारे उपलब्ध करुन दिला जातो. या योजनेचा लाभ  केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेसाठी पात्र ठरलेल्या भटक्या जमाती- क यश प्रवर्गातील नवउद्योजकांना अनुज्ञेय राहील.

इच्छूक व पात्र लाभार्थ्यांनी या विकासात्मक योजनेचा लाभ घ्यावा. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयांशी पात्र व्यक्तींनी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त श्री. वारे यांनी केले आहे.

00000