गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

राज्यमंत्र्याकडून स्वत: झाडू हाती धरुन गावात स्वच्छता संत गाडगेबाबांनी शिकवलेली जीवनमुल्ये आत्मसात करुया - राज्यमंत्री बच्चू कडू

 




राज्यमंत्र्याकडून स्वत: झाडू हाती धरुन गावात स्वच्छता

संत गाडगेबाबांनी शिकवलेली जीवनमुल्ये आत्मसात करुया

-         राज्यमंत्री बच्चू कडू

Ø नागरवाडी येथे भक्त निवासाचे राज्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

       अमरावती, दि. 24 : संत गाडगेबाबा यांना समाजाला मानवतेच्या मुल्यांची शिकवण दिली. तळागाळातील सर्वांपर्यत त्यांनी किर्तनाच्या माध्यमातुन ज्ञानदान केले. लोकांशी संवाद साधुन त्यांनी समाजात स्वच्छता, आरोग्य, अंधश्रद्धा, शिक्षण, मुर्तिपुजा याबाबत जनजागृती करण्याची किमया साधली. माणसांमध्ये देव पाहणाऱ्या गाडगेबाबांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी व स्फुर्तिदायी आहे. गाडगेबाबांच्या कार्याचा आदर्श आपण डोळयासमोर ठेवुन शिकवलेली जीवनमुल्ये आत्मसात करुया असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगीतले.

                     5 कोटी निधीतुन श्रीक्षेत्र नागरवाडी विविध कामे

गाडगे बाबा जयंती महोत्सव चांदुर बाजार येथील नागरवाडी येथे साजरा करण्यात आला. नागरवाडीतील भक्तनिवासचे भूमिपूजन (दि.23) राज्यमंत्री श्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले. तिर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेअंतर्गत अंदाजे पाच कोटी रुपयांच्या निधीतुन निर्माण करण्यात येणाऱ्या भक्तनिवासमुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे. येथे भक्तनिवासाच्या इमारतीची निर्मिती व नागरी सुविधांसोबतच येथील परिसराचे सौंदर्यीकरण व बळकटीकरण करण्यात येणार आहे. गोशाळा, सभागृहाची निर्मितीसह आदी प्रस्तावीत कामे देखील नागरवाडी येथे करण्यात येणार आहे.

   नागरी सुविधांच्या निर्मितीमुळे विकासप्रक्रिया गतीमान होत असते. त्यामुळे नागरी सुविधांची कामे प्राधान्याने व तातडीने पूर्ण करण्यात येतील असे श्री कडू यांनी यावेळी सांगितले. तहसिलदार धीरज स्थूल, मंगेश देशमुख, गाडगेबाबा मिशनचे संचालक, सदस्य व नागरिक उपस्थित होते.

निसर्ग पर्यटनातून रोजगाराची संधी

निसर्ग पर्यटनाच्या क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी दडलेल्या आहेत. आपल्या परिसरातील नैसर्गिक बाबींनी समृद्ध पर्यटन क्षेत्राची देखभाल करणे आपले कर्तव्य आहे. निसर्ग पर्यटन विकास योजनेअंतर्गत पर्यटन स्थळ विकसीत करण्यात येत आहेत त्यामुळे या क्षेत्रात अनेक रोजगार उपलब्ध होण्यास वाव आहे. निसर्ग पर्यटन विकास योजनेअंतर्गत चांदुर बाजार येथिल नागरवाडी पर्यटन केंद्र विकसीत करण्यात येत आहे. या पर्यटन केंद्रात 82 लक्ष रुपयांच्या प्राप्त निधीतुन चेनलिंक फेन्सिंग (साखळी कुंपण) करण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन श्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पंचायत समिती सदस्य वनमाला गणेशकर, मंगेश देशमुख यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

राज्यमंत्र्यांनी केली गावात स्वच्छता

        संत गाडगेमहाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यमंत्री श्री कडू यांनी तालुका अचलपूर व चांदुर बाजार येथे स्वच्छता अभियान राबविले. राज्यमंत्र्यांनी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबविले. श्री कडू यांनी स्वत: सर्व परिसर स्वच्छ केला.

चौक, पुतळे, सार्वजनिक जागा आदी ठिकाणे स्वच्छता कायम राहिली पाहीजे. संत गाडगेबाबा यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश लक्षात घेऊन अचलपूर, परतवाडा, चांदुर बाजार येथे फवारणी, आवश्यक रंगरगोटी, झुडूपे व कचरा हटवणे आदी स्वच्छता राबविण्यात येणार आहे. स्वच्छतेची सवय प्रत्येकाने आपल्या अंगी बाणवून घ्यायला हवी असा संदेश श्री कडू यांनी यावेळी सर्वांना दिला. यावेळी संदीपकुमार अपार अधिकारी उपस्थित होते.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा