सोमवार, १० जून, २०२४
अमरावतीत ‘नमो महारोजगार मेळाव्या’चे होणार भव्य-दिव्य आयोजन, रोजगार मेळाव्याच्या यशस्वीततेसाठी प्रभावी नियोजन करा -उपायुक्त संजय पवार
अमरावती, दि. 10 : विभागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी अमरावतीत आगामी महिन्यात ‘नमो महारोजगार मेळाव्या’चे भव्य-दिव्य आयोजन करण्यात येणार आहे. महारोजगार मेळाव्याच्या यशस्वीततेसाठी सर्व विभागांनी प्रभावी नियोजन करुन सक्रीय सहभाग नोंदवावा, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय पवार यांनी आज दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपायुक्त श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार मेळाव्याच्या आयोजनासंबंधी पूर्व नियोजनाबाबतची बैठक सपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे उपायुक्त दत्ता ठाकरे, सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर, एमआयडीसी असोशिएशनचे किरन पातुरकरयांच्यासह अन्य विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले की, विभागातील सुशिक्षित बेराजगारांना रोजगाराच्या संधी तसेच नवीन उद्योग-व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्यांसाठी विविध क्षेत्रातील स्वयंरोजगाराच्या संधी याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन या मेळाव्यात करण्यात येणार आहे. उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती तरुणांना, आयटीआय, अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थींना या मेळाव्यात स्टॉल्सच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. रोजगार मेळाव्याची तारीख निश्चित करण्यासाठी शासनाकडे पत्र पाठविण्यात आले असून आगामी महिन्यात मेळाव्याची निश्चित तारीख व स्थळ जाहीर केल्या जाईल. रोजगार मेळाव्याच्या आयोजनाच्या अनुषंगाने सहभागधारक असणाऱ्या विभागांना कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या 6 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार त्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहेत. त्यानुसार प्रत्येक विभागांनी मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी आताच प्रभावी नियोजन करावे, असेही श्री. पवार यांनी सांगितले.
नमो महारोजगार मेळाव्याच्या आयोजना मागची भूमिका उपायुक्त श्री. ठाकरे यांनी विशद केली. ते म्हणाले की, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच स्टार्टअप म्हणजे नवीन उद्योग व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांतून आर्थिक सहाय्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन राज्यातील सहाही महसूली विभागात करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रति मेळावा 5 कोटी रुपयांचा निधी विभागाला उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या मेळाव्यातून राज्यातील किमान 2 लाख उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत मुलाखत पूर्व व करिअर मार्गदर्शन करणे, रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सहाय्य करणे, उमेदवारांना कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता संबंधित विविध योजनांची माहिती देणे व मार्गदर्शन करणे, अल्प कालावधीच्या प्राथमिक प्रशिक्षण अभ्यासक्रमांबाबत मार्गदर्शन करणे आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.
श्रीमती बारस्कर म्हणाल्या की, या रोगार मेळाव्यात बँकिंग, लॉजीस्टिक, सेल्स मार्केटिंग, इन्सुरन्स, मॅन्युफॅक्चरिंग, हॉस्पिटॅलिटी, कम्युनिकेशन, अपारंपारिक उर्जा, आरोग्यसेवा आदी विविध क्षेत्रातील नामांकित कंपनी/ नियोक्ते, उद्योजक, व कारखानदार सहभागी होणार आहेत. मेळाव्याच्या अनुषंगाने शासकीय विभागांनी सुध्दा त्यांच्या आस्थापनेवरील रिक्त /अधिसुचित पदांची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाला सादर करावी. अंशकालीन उमेदवारांना बाह्यस्त्रोताव्दारे नियुक्तीही मेळाव्याच्या माध्यमातून देता येणार आहे. रोजगार मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्येक शासकीय विभागाचे काम महत्वपूर्ण आहे. मेळाव्याचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रत्येक विभागांनी समन्वय व नियोजनासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी. नमो महारोजगार मेळाव्याचा अमरावती विभागातील जास्तीत जास्त युवक-युवतींना लाभ मिळावा, यासाठी मेळाव्याबाबत व्यापक प्रचार प्रसिध्दी करावी, अशा सूचना सहाय्यक आयुक्त श्रीमती बारस्कर यांनी यावेळी दिल्या. मेळाव्याच्या आयोजनाबाबत निश्चित तारीख व वेळ यानंतरच्या बैठकीत जाहीर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
0000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा