बुधवार, १२ जून, २०२४
बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करतांना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके खरेदी करतांना
शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
अमरावती, दि. 12 : खरीप हंगामाची सुरूवात झालेली असून बी-बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके इत्यादी निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकरी बाजारात गर्दी करू लागले आहेत. शेतकरी बांधवांना गुणवत्तापूर्ण बी बियाणे, रासायनिक खते व निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी विभागातील सर्व कृषि निविष्ठा विक्री केंद्राबाहेर दर्शनिय ठिकाणी विक्री केंद्रामध्ये उपलब्ध असलेल्या बियाणे, खते, किटकनाशकांचा साठा व दरफलक अद्यावत ठेवणेबाबत सक्ती करण्यात आली आहे. तसेच उपरोक्त साहित्यांची तपासणी वरीष्ठ अधिकाऱ्यांमार्फत हंगामाध्ये वेळोवळी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दर्जेदार व योग्य भावात निविष्ठा खरेदी करताना शेतकरी बांधवांनी पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडून कृषि निविष्ठांची खरेदी करावी, बनावट/भेसळयुक्त बियाणे, खते, किटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पावतीसह निविष्ठा खरेदी करावी, खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेष्टन/पिशवी, टॅग, खरेदीची पावती बियाणे कापणी होईपर्यत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्यांची पाकीटे सिलबंद/मोहरबंद असल्याची खात्री करा. शेतक-यांनी कृषि निविष्ठा खरेदी करतेवेळी अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करून रितसर पावतीव्दारे कृषि निविष्ठांची अंतीम मुदत तपासुनच खरेदी करावी, शेतकऱ्यांनी संकरीत कापूस बियाण्याच्या बी जी २ विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये. सर्वच बी जी - २ कापूस वाणाची उत्पादन क्षमता सारखीच आहे. त्यासाठी योग्य मशागत पध्दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. कमी वजनाच्या तसेच छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने निविष्ठा विक्री होत असल्यास तक्रारीसाठी कृषि विभागाचा टोल फ्रि क्रमांक १८००-२३३-४००० व ९८२२४४६६५५ या व्हॉटस्अॅप नंबरवर तसेच तालुका कृषि अधिकारी, कृषि अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे तसेच विभाग, जिल्हा व तालुकास्तरीय कृषि निविष्ठा तक्रार निवारण कक्ष यांच्याशी संपर्क साधावा.
शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी करीता आपले स्वतःचे घरच्या बियाण्याची घरच्या घरी उगवण शक्ती तपासून व बिज प्रक्रिया करूना पेरणी करीता घरचे बियाणे वापरावे, जेणेकरून बियाणे खरेदीवर होणारा खर्च कमी होईल. शेतकऱ्यांनी १०० मी.मी. पाऊस झाल्याशिवाय तसेच जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय पेरणी करू नये. शेतकऱ्यांनी गाव पातळीवर कुठल्याही अनधिकृत व्यक्तीकडून कोणत्याही कृषि निविष्ठा खरेदी करू नये व त्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नये. याव्दारे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. असा प्रकार आढळून आल्यास तात्काळ कृषि विभागाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांना गरजेचे व आवश्यक असणाऱ्या कृषि निविष्ठांसोबत इतर अनावश्यक कृषि निविष्ठांची लिंकींगव्दारे खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्यास तात्काळ कृषि विभागाशी संपर्क साधावा. बाजारात राऊंड अप बीटी/एचटीबीटी/बीजी ३ बीटी अशा प्रकारच्या कापूस बियाणेची खाजगी व्यक्तींमार्फत गावपातळीवर घरपोच विक्री होत असल्याचे विभागामध्ये प्रतीबंधीत कापूस बियाणे विक्री संदर्भात करण्यात आलेल्या कारवाई वरून निदर्शनास आले आहे. सदर बियाणे पाकीटावर उत्पादकाचे नाव, लेबल नसुन बिगर पावतीने शेतकऱ्यांना विक्री होत असल्याने बियाण्यात फसवणुक झाल्यास नुकसानीबाबत रितसर न्याय मागता येत नाही. त्यामुळे शेतकरी बाधवांनी अशा प्रकारे विक्री होणाऱ्या प्रतिबंधित कापूस बियाणे खरेदी करून स्वतःची फसवणुक करून घेऊ नये.
कृषि निविष्ठाच्या आपल्या तक्रारीची माहीती प्रत्यक्ष / दूरध्वनी / इ - मेल / एस. एम. एस. / टोल फ्री क्रमांक १८०० - ४००० व व्हॉटस्अॅप नंबर ९८२२४४६६५५ तसेच आपले जिल्ह्यातील कृषि निविष्ठांच्या तक्रार निवारणासाठीचा भ्रमणध्वनी क्रमांक व जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा व तालुकास्तरीय भरारी पथकातील सदस्यांचे भ्रमणध्वनी क्रमांकावर नोंदवीण्यात याव्यात. जेणेकरून प्राप्त तक्रारींची वेळेत दखल घेऊन कार्यवाही करणे शक्य होईल, असे आवाहन अमरावती विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे यांनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी जिल्हानिहाय संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहे :
अमरावती विभागासाठी संजय पाटील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक, अमरावती ९४२३१३२६२६.
बुलडाणा जिल्ह्यासाठी अरुण इंगळे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, बुलडाणा ८१०४७९२०६३.
अकोल्यासाठी सतीश दांडगे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, अकोला ९७६६२७३५०७.
वाशिम साठी आकाश इंगोले जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, वाशिम ९४२०३५३३०९
अमरावती जिल्ह्यासाठी सागर डोंगरे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, अमरावती ८७८८८२१७८०.
यवतमाळसाठी कल्याण पाटील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक, यवतमाळ ९४२३४४३९०८
याप्रमाणे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आले आहे. बि-बियाणे, खते व कृषि निविष्ठा संदर्भात काही तक्रार असल्यास उपरोक्त संपर्क क्रमांकावर शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे.
0000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा