रविवार, ३ ऑगस्ट, २०२५
सक्षम मानव संसाधनातून विकसित भारताचे स्वप्न साकारणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे ; जिल्हा कोषागार कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहाचे उद्घाटन
सक्षम मानव संसाधनातून विकसित भारताचे स्वप्न साकारणार
-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
• महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संघटनेचा मेळावा संपन्न
• गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
• विधवा, परितक्त्या महिलांना शिलाई मशीनचे वितरण
• जिल्हा कोषागार कार्यालयाच्या जिजाऊ सभागृहाचे उद्घाटन
अमरावती, दि. 03 : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित मानव संसाधनाची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी असून याव्दारे विकसित भारत-2047 स्वप्न साकारले जाणार असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संघटनेव्दारे मातोश्री विमलाताई देशमुख समागृह येथे समाज मेळावा, समाजभूषण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच महिलांना शिलाई मशीनचे वितरण आज करण्यात आले. यावेळी आमदार प्रताप अडसड, रामदास तडस, नवनीत राणा, संजय हिंगासपूरे, शंकरकाका हिंगासपूरे, भुषण कर्डीले, संध्या सव्वालाखे, डॉ. मोनीका मांडवे, शिक्षण उपसंचालक निलीमा टाके तसेच तैलिक समाज संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, रोजगार निर्मिती प्रक्रियेला प्रोत्साहन देणे, उत्कृष्ट काम केलेल्यांचा गौरव करणे तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे अशा कार्यक्रमामुळे समाजात चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळते. अशा स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करून समाज बांधवांना प्रोत्साहन द्यावे. संघटीत समाज हा देशाच्या ऐक्याचा पाया रचतो. त्यामुळे समाजाने संघटीत होऊन समाजाच्या सर्वांगिण उध्दारासाठी प्रयत्न करावे. जगातील जवळपास 110 देशातील नागरिकांचे आयुर्मान हे 40 ते 45 या वयोगटातील असून ते देश आज वृद्धत्वाकडे झुकलेले आहेत. अन्य देशांकडे काम करण्यासाठी पुरेशी सक्षम युवा पिढी नाही. त्यांना सर्वच क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या मानवसंसाधनाची आवश्यकता आहे. त्यांची ही गरज पूर्ण करण्याची क्षमता आपल्या देशातील युवा पिढीकडे आहे. यामुळे आपल्याकडील युवा पिढीला जगातील सर्वच क्षेत्रात रोजगाराची अनेक नवीन दालने खुली आहेत. यासाठी नवतंत्रज्ञानाचे शिक्षण घेतलेला उच्चशिक्षा विभूषित व संस्कारी युवावर्ग जगाला पुरवण्याची जबाबदारी भारत देश पूर्ण करु शकतो. सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी आहे. आजची युवा पिढी व्यसनापासून दूर राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'विकसित भारत 2047' घडविण्यासाठी आतापासून नियोजन सुरू केले आहे. विकसित भारताचा संकल्प हा समाजाच्या विकासाचा संकल्प आहे. विकसित भारताला लागणारे उच्च विभूषित मानवसंसाधन निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षीत समाजाची निर्मिती करण्याची गरज आहे. शिक्षणानेच समाज संस्कारक्षम होऊन सर्व क्षेत्रात प्रगती साध्य करु शकतो. युवा पिढी सर्वगुण संपन्न होण्यासाठी राज्यात आयआयएम, आयआयटी, एनआयटी यासारख्या नामांकीत संस्था निर्माण करण्यात आल्या आहेत. समाजातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनींनी याठिकाणी प्रवेश मिळविण्यासाठी परिश्रम घ्यावे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहचणे आणि या विकासगंगेत सर्वांचा समावेश असणे हे विकसित भारताचे ध्येय आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करणे गरजेचे असल्याचे पालकमंत्री श्री. बावनकुळे यावेळी म्हणाले.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते तैलिक समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावी, बारावीत गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थींनींचा शालेय साहित्य वितरण करुन गौरव करण्यात आला. एमसीए अभ्यासक्रमात सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या समिक्षा साखरकर यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील विधवा, परितक्त्या महिलांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले.
जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना निधी उपलब्ध करुन देणार- पालकमंत्री
जिल्ह्यातील विकास प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. जिल्हा कोषागार कार्यालयाच्या परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या सर्व सुविधायुक्त ‘जिजाऊ सभागृहा’चे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते आज करण्यात आले.
जिल्हा नियोजन योजनेतून 68 लाख खर्च करुन जिजाऊ सभागृह बांधण्यात आले आहे. या सभागृहात लेखा व कोषागार विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या नवीन प्रणालीचे प्रशिक्षण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी त्रैमासिक सभा, आरोग्य शिबीर, योग- प्राणायम शिबीरे घेण्यात येतील.
यावेळी आमदार संजय खोडके, आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, लेखा व कोषागारे सह संचालक प्रिया तेलकुंटे, वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार, सहाय्यक संचालक (निवृत्ती वेतन) अमोल ईखे यांच्यासह लेखा व कोषागारे विभागाचे अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.
00000
शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस * मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन
शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
* मोर्शी येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन
अमरावती, दि. 3 : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे शासनाने मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे. हा दर्जा बहाल केल्यामुळे मत्स्य शेती करणाऱ्यांना कर्ज, किसान क्रेडिट आणि अनुषंगिक बाबी प्राधान्याने मिळण्यास मदत झाली आहे. यामुळे मत्स्य व्यवसाय आज प्राधान्याचे क्षेत्र झाले आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
मोर्शी येथे आज महाराष्ट्रातील चौथे आणि पश्चिम विदर्भातील पहिल्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मत्स्यव्यवसाय तथा बंदरे मंत्री नितेश राणे, खासदार अनिल बोंडे, आमदार प्रताप अडसड, केवलराम काळे, उमेश यावलकर, राजेश वानखेडे, प्रवीण तायडे, चैनसुख संचेती, रामदास तडस, नवनीत राणा, पशुसंवर्धन दुग्ध व मत्स्यव्यवसाय विकास विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, कार्यकारणी सदस्य अनुराधा चव्हाण आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यात मत्स्य व्यवसायाला चालना मिळावी यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. समुद्रातील मासेमारी व्यवसायावर लक्ष केंद्रित असले तरी आज 40 टक्के मत्स्य व्यवसाय गोड्या पाण्यावरील व्यवसायामधून होतो. यात वाढ करण्यासाठी या क्षेत्राला सर्वतोपरी मदत केली जाईल. शासनाच्या मदतीने शेतकऱ्यांनी शेततळ्यांमध्ये शेतीच्या सिंचनासह मत्स्य व्यवसाय सुरू केल्याने त्यांना अडचणीच्या काळात मदत झाली आहे. तसेच रोजगाराची संधीही निर्माण झाली आहेत. शेतकऱ्याचे जीवनमान उंचावे यासाठी आपदग्रस्त परिस्थितीमध्ये मदत करण्याचे धोरण ठरवले आहे. शेतीसाठी प्रामुख्याने सिंचन व्यवस्था उभारण्यासाठी प्रकल्प मार्गी लावण्यात येत आहे. विदर्भाची भाग्यरेखा ठरणाऱ्या वैनगंगा - नळगंगा या साडेपाचशे किलोमीटरच्या योजनेमुळे गोसेखुर्दचे पाणी बुलढाणापर्यंत जाणार आहे. यात 31 धरणे भरणार असून एक लाख कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पावर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मदतीसोबतच शेतीमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक वर्षात पाच हजार कोटी याप्रमाणे पाच वर्षात २५ हजार कोटीची गुंतवणूक केली जाईल. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी महत्त्वाची असली तरी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या शिफारशीनुसार उपाययोजना करण्यात येणार आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून देण्यात येणार आहे. शासनाच्या या विविध प्रयत्नांनी शेतीमध्ये परिवर्तन व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज उपलब्ध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा प्रायोगिक प्रकल्प मोर्शीमध्येच राबविण्यात आला आहे. शासनाने केलेल्या आश्वासनानुसार पुढील पाच वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे. वीज क्षेत्रात करण्यात आलेल्या सुधारणांमुळे पहिल्यांदाच विजेचे दर कमी झाले आहे. येत्या पाच वर्षात 100 युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्यांचे वीज देयक आजच्या पेक्षा 26 टक्क्याने कमी होणार आहे. प्रत्येकाला स्वतःचे घर
मिळावे, यासाठी केंद्र शासनाच्या मदतीने 30 लाख घरे मंजूर झाली आहे. येत्या काळात सर्वेक्षणातून सुटलेल्या नागरिकांनाही त्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळवून देऊन बेघर मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यात येणार आहे. त्यासोबतच 50 हजार रुपयांची मदत करून पाच लाख घरांवर सोलर यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यातून गरजू नागरिकांची वीज बिलातून मुक्तता होणार आहे. तसेच अतिरिक्त वीज निर्माण झाल्यास शासन ती खरेदी करणार आहे. शेतकऱ्यांना सर्व बाजूंनी मदत करून त्यांचे जीवन सुकर करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी मत्स्य विज्ञान महाविद्यालय मोर्शी येथे होणे हा अभिमानाचा क्षण आहे. मुख्यमंत्र्यांनी विकसित महाराष्ट्राचे धोरण ठरविले असून या दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर अशा सर्वच घटकांना न्याय देण्याचे धोरण आखले आहे. दिव्यांगांना अडीच हजार रुपये महिना मदत देण्यात येत आहे, तर कर्जमुक्तीची गरज असलेल्यांना मदत करण्यासाठी समिती स्थापन करून विविध निर्णय घेण्यात येणार आहे. प्रत्येक शेतीमध्ये जाण्यासाठी पानंद रस्ता तयार करण्यात येऊन शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाजारपेठेत पोहोचावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच येत्या काळात चिखलदरा परिसराला पर्यटनाचा केंद्रबिंदू ठरवून विकास करण्यात येणार आहे. त्यासोबतच मोर्शी परिसरातील संत्र्यावरील प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात येणार आहे.
मंत्री श्री. राणे म्हणाले, मत्स्य विज्ञान महाविद्यालयाची इमारत येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. या महाविद्यालयामुळे मच्छीमारांना चांगले दिवस येऊन आर्थिक सक्षम होण्याबरोबर समृद्धी येईल. मत्स्यला कृषीचा दर्जा दिल्याने अनेक सवलतींचा लाभ होणार आहे. येत्या काळात गोड्या पाण्यातील मच्छीमारांनाही महत्त्व दिले जाणार आहे. यासोबतच मत्स्य व्यवसायात क्रांतिकारी बदल घडवून येण्यासाठी मार्वल कंपनीसोबत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी करार करण्यात आला आहे. यामुळे मच्छीमारांच्या जीवनात बदल घडून येतील. मोर्शी येथील महाविद्यालयात चांगल्या शिक्षणासोबत उत्कृष्ट दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कायम प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.
खासदार अनिल बोंडे यांनी प्रास्ताविकातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन करून कोनशिलेचे अनावरण केले. यावेळी भोई समाजातर्फे मुख्यमंत्र्यांचा पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील पाच रस्ते विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले. कुलगुरु डॉ. पाटील यांनी आभार मानले.
*****
--

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)