बुधवार, १३ ऑगस्ट, २०२५
अमरावती विभागात ‘हर घर तिरंगा’ अभियान प्रभावीपणे राबवावा- विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल
अमरावती, दि. 13: देशभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, राज्यस्तरापासून गावपातळीपर्यंत तिरंगामय वातावरण व्हावे, या उद्देशाने 15 ऑगस्टपर्यंत राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान अमरावती विभागात अधिक उत्साहपूर्ण वातावरणात प्रभावीपणे राबविण्यात यावे असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे ‘हर घर तिरंगा’ अभियान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये राबविला जाणार आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त, सर्व विभागीय कार्यालयाचे प्रमुख आदि अधिकारी उपस्थित होते.
राज्यात मागील तीन वर्षापासून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षीचे अभियान तीन टप्प्यात राबविण्यात येत असल्याचे सांगून आयुक्त डॉ. सिंघल म्हणाले की, पहिला टप्पा 2 ते 8 ऑगस्ट 2025, दुसरा टप्पा 9 ते 12 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविला गेला. तर तिसरा टप्पा 13 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहे.
‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून तिरंगामय वातावरण निर्मिती व्हावे, यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी दृश्य माध्यमांचा वापर करण्यात यावा. आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाची माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वयंसेवकांना शाळेच्या भिंतीवर तिरंगाचे चित्र काढणे, तिरंगाविषयक बाबींचे प्रदर्शन भरवणे, रांगोळी स्पर्धा आयोजित करणे, सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करणे, तिरंगा तयार करण्याची स्पर्धा आयोजित करणे असे विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात यावेत. त्याचबरोबर सर्व शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याकडून स्वत:चे घर, आजुबाजूचा परिसर, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविणे, तिरंगाची रोषणाई आणि लाईटिंग करणे, प्रभातफेरीचे आयोजन करणे असे विविध उपक्रम या कालावधीत राबविण्यात यावे असे विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी सांगितले.
सर्वांना सहज आणि सुलभरित्या तिरंगा उपलब्ध व्हावा, यासाठी महिला बचत गटाकडे तिरंगा निर्मिती व विक्रीचे काम देण्यात यावे. जिल्हा व गाव पातळीवर तिरंगा बाईक रॅली किंवा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात यावे. त्याचबरोबर या कालावधीत प्रत्येकांच्या हातात तिरंगा देऊन तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात यावे. जलसंपदा विभागाने त्याच्या सर्व प्रकल्पावर तिरंगा फडकवावा. या मोहिमेत प्रत्येक विद्यार्थी, तरूण-तरूणी आणि नागरिक यांचा सहभाग वाढवून मनुष्यसाखळी तयार करावी तसेच मोठ्या प्रमाणावर देशभक्तीपर गीते लावण्यात यावी, असेही डॉ. सिंघल यांनी यावेळी सांगितले.
तिसरा टप्प्या 13 ऑगस्टपासून सुरू होत असून यात प्रत्येक घर, कार्यालय, वाहने यावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढावा यासाठी ध्वजारोहणाच्या सेल्फी काढून केंद्र शासनाच्या www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याबाबत आवाहन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी दिल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा