हॉटेल ताजमहाल, मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम २०२६’ (GIF) च्या दुसऱ्या पर्वाचे उद्घाटन झाले. जगातील विविध देशांच्या संस्कृती, परंपरा, विचारसरणी आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या, तरी मानवतेला जोडणारी काही सार्वत्रिक मूल्ये समान आहेत. या मूल्यांचा शोध घेत केवळ आर्थिक सहकार्यच नव्हे तर सांस्कृतिक देवाणघेवाण, परस्पर सन्मान आणि संवादाची व्याप्ती वाढविणे आजची गरज आहे, ज्यातून अधिक समतोल, शांततामय आणि समृद्ध जगाची निर्मिती शक्य आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत भगवान श्रीकृष्णांच्या सर्वसमावेशकता, धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाच्या संदेशाचा उल्लेख केला.
अनेक स्तरांवर विखुरलेल्या सध्याच्या जगात जागतिक व्यवस्था विविध अर्थांनी असंतुलित झाली असून, अशा परिस्थितीत विविध देशांनी एकत्र येण्यासाठी उपलब्ध संधींचा शोध घेण्याची हीच योग्य वेळ आहे. विविध देशांतील नागरिक, राजकीय नेते, राजनैतिक प्रतिनिधी, विचारवंत तसेच उद्योग व व्यावसायिक क्षेत्रातील नेतृत्वाने अशा व्यासपीठांवर एकत्र येऊन विचारांचे आदान-प्रदान करणे महत्त्वाचे आहे. भारतीय संस्कृतीच्या मूलभूत विचारांचा पाया ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेत आहे. भारताने केवळ वस्तू आणि व्यापाराच्या प्रसाराबरोबर विचार, ज्ञान आणि जीवनमूल्येही जगभर पोहोचवली आहेत. भारताचा जागतिक व्यापारातील ऐतिहासिक सहभाग महत्त्वपूर्ण राहिला असून व्यापाराबरोबरच भारतीय विचारांचा आणि जीवनमूल्यांचा विविध देशांवर प्रभाव पडला आहे. बौद्ध धर्म हे याचे महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. हा विचारांचा प्रसार युद्ध, संघर्ष किंवा हिंसेच्या माध्यमातून नव्हे, तर विचार आणि मूल्यांच्या प्रभावातून झाला आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यावेळी संचालक जान्हवी पवार यांनी ग्लोबल इम्पॅक्ट फोरमच्या व्यापक उद्दिष्टांची माहिती दिली.
यावेळी मुंबईतील ब्राझीलचे महावाणिज्यदूत जोसे मौरो फोनेस्का कोस्टा कौटो, रशियाचे महावाणिज्यदूत इव्हान फेतिसोव्ह, चीनचे महावाणिज्यदूत किन ती, दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत गेडियन लाबाने यांच्यासह भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशातील राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा