मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि न्यू साउथ वेल्सचे प्रमुख क्रिस मिन्स यांच्या उपस्थितीत वित्तीय सेवा, स्वच्छ ऊर्जा, प्रगत उत्पादन, महत्त्वपूर्ण खनिजे, कृषी तंत्रज्ञान, आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, तंत्रज्ञान, संस्कृती आणि क्रीडा या क्षेत्रांमधील सामंजस्य करार वर्षा या शासकीय निवासस्थानी करण्यात आला. ही क्षेत्रे २०४७ पर्यंत महाराष्ट्राला विकसित आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक राज्य बनविण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स यांच्यात २०१२ पासून असलेली भागीदारी अधिक व्यापक, महत्वाकांक्षी आणि परिणामाभिमुख करण्यात येईल, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबई आणि सिडनी ही अनुक्रमे भारत आणि ऑस्ट्रेलियाची वित्तीय व व्यावसायिक प्रवेशद्वारे आहेत. त्यामुळे न्यू साउथ वेल्समधील वित्तीय संस्था, व्यावसायिक सेवा कंपन्या, पायाभूत सुविधा गुंतवणूकदार आणि सुपरॲन्युएशन फंडांनी महाराष्ट्राला भारतातील गुंतवणुकीचे प्रमुख प्रवेशद्वार म्हणून पाहावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
तंत्रज्ञान, उत्पादन आणि ऊर्जा संक्रमण या क्षेत्रातही मोठ्या सहकार्याची क्षमता आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहने, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात सक्षम परिसंस्था उभारत आहे. न्यू साउथ वेल्सकडील खाण तंत्रज्ञान, महत्त्वपूर्ण खनिजे, स्वच्छ ऊर्जा आणि नवोन्मेषातील अनुभवाच्या माध्यमातून बॅटरी उत्पादन, हरित हायड्रोजन, अक्षय ऊर्जा व ऊर्जा साठवणूक क्षेत्रात संयुक्त प्रकल्प विकसित करता येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स राज्यांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी खाणकाम, तंत्रज्ञान, पर्यटन आणि शिक्षण या क्षेत्रांसह प्रगत उत्पादन, सर्क्युलर इकॉनॉमी, आरोग्यसेवा आणि खाण तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात येईल. महाराष्ट्र आणि न्यू साऊथ वेल्स यांच्यातील सामंजस्य करारामुळे दोन्ही राज्यांमधील आर्थिक संबंधांना नवी दिशा मिळाली आहे, असे न्यू साऊथ वेल्सचे प्रमुख क्रिस मिन्स यांनी सांगितले.
यावेळी राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा