मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयाने विधानभवन येथे पत्रकारांसाठी विशेष आरोग्य तपासणी, उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध तपासणी आणि उपचार शिबीराला भेट देऊन पत्रकारांच्या आरोग्याची आस्थेने विचारपूस केली. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, आमदार योगेश सागर, आमदार अभिमन्यू पवार आदींसह विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.
सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना अनियमित कामाच्या वेळांमुळे, तासनतास रस्त्यावर आणि घटनास्थळी राहून काम करावे लागल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणी आणि उपचार शिबीर महत्वाचे ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
पत्रकारांचे काम हे २४ तास सुरू असते. अनेकदा नियमित आरोग्य तपासण्या होत नसल्यामुळे एखादा आजार बळावल्यानंतर त्याचे निदान होते. त्याऐवजी अशा आरोग्य तपासणी शिबिरांच्या माध्यमातून प्राथमिक लक्षणे वेळीच ओळखून त्यावर तातडीने उपचार करता येतील. या शिबिरामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर, नामांकित संस्था आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पत्रकारांसोबतच तासनतास उभे राहून काम करणाऱ्या कॅमेरामनसाठीही आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. व्हेरिकोज व्हेन्ससारख्या समस्यांसाठी स्टॉकिंगची व्यवस्था तसेच आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी ठरणाऱ्या विविध सुविधांचा समावेश करण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा