सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी किशोर तिवारींचा मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा

 

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी

किशोर तिवारींचा मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा

अमरावती, दि. 2 : शेतकऱ्यांच्या समस्या, नुकसान भरपाई, सिंचन, वीज पंप यासारखे महत्त्वाचे विषय सोडविण्यासाठी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानामध्ये विदर्भातील अकरापैकी फक्त एका जिल्ह्यात नुकसान झाल्याचा निष्कर्ष काहींनी काढल्यामुळे शेतकरी अडचणी सापडला आहे. राज्य शासनाच्या १६ ऑक्टोबर २०२० च्या शासन निर्णयात यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या शेती आणि इतर घरे, कपडे, भांडी इत्यादींच्या नुकसानी संदर्भात तरतुदी दिल्या आहेत. या शासन निर्णयात अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात आणि नागपूर विभागातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या पाच जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले नसल्याचे नमूद केले आहे.

याच शासन निर्णयात विदर्भातील ११ पैकी भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. भंडारा जिल्ह्यात शेतीचे २ कोटी ११ लाख ४३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. या जिल्ह्यात घरे, कपडे, भांड्याचे नुकसान १९ लाख ८५ हजार रुपयांचे, मृत जनावरांचे ५ लाख ८२ हजार तर मोठ्या प्रमाणातील पडझडीचे नुकसान २ कोटी ८६ लाख ५६ हजार रुपयांचे झाले असल्याचे नमूद केले आहे. अमरावती विभागात घरे, कपडे, भांडी यांचे नुकसान सर्व जिल्ह्यांत झाल्याचे दर्शविले आहे. हे पाच जिल्ह्यांचे मिळून नुकसान १ कोटी ९४ लाख ५२ हजार रुपये आहे. यातील अमरावती आणि अकोला या दोनच जिल्ह्यांमध्ये ४ लाख ८२ हजार रुपयांचे नुकसान झालेले नमूद आहे. नागपूर विभागात पाच आणि अमरावती विभागात तीन अशा विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये जनावरांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे शासनाचे सर्वेक्षण आहे.

या आकडेवारीनुसार संपूर्ण विदर्भा अतिवृष्टीमुळे शेती, घरे, झोपड्या गोठे, जनावरे अशा विविध प्रकारांमध्ये सर्व मिळून ७ कोटी २२ लक्ष ९० हजार नुकसान झाले आहे. त्यामुळे १० हजार कोटींपैकी ९ हजार ९९८ कोटी रुपये विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात दिल्या जाणार आहे. अकोला जिल्ह्याला मिळणाऱ्या २६ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईत फक्त १० लाख रुपयांची वाढ केली आहे. उर्वरित महाराष्ट्राला जिरायतीसाठी हेक्टरी १ हजार तर फळ पिकांसाठी २५ हजार रुपये मिळणार आहेत. मात्र शासन निर्णयाप्रमाणे विदर्भाला जिरायत ६ हजार ८००, तर फळ पिकांसाठी १८ हजार रुपये याप्रमाणे मदत मिळणार आहे. पावसाने झालेल्या पडझडीने अमरावती जिल्ह्यात ५७.८१ आणि  बुलढाणा जिल्ह्यात ५२.७१ लाख रुपयांची नुकसान भरपाई देऊ केली आहे. या दोन जिल्ह्यामध्ये शेतीचे नुकसान झालेले नसल्याचे म्हटले असल्याने, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे, असे श्री. तिवारी यांनी सांगितले.

0000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा