गुरुवार, २८ मार्च, २०२४

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अमरावती विभागात तीन नामनिर्देशनपत्र दाखल

 


                                       लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

अमरावती विभागात तीन नामनिर्देशनपत्र दाखल

अमरावती, दि. 28 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक अधिसूचना जारी झाली असून नामनिर्देशपत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये एक व बुलडाणा लोकसभा मतदारसंघामध्ये दोन असे एकूण तीन नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.

         अमरावती लोकसभा मतदारसंघातून व्यंकटेश्वरा महा स्वामीजी उर्फ दीपक यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीने एक नामनिर्देशनपत्र दाखल केले. तसेच बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून संजय रामभाऊ गायकवाड यांनी शिवसेना पक्षाच्या वतीने एक व अपक्ष म्हणून एक अशी दोन नामनिर्देशन पत्र दाखल केलीत.

    विभागातील अकोला आणि यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नाही.

      विभागातील चारही लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार, दि. 28 मार्च रोजी अधिसूचना जारी झाली आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. आदर्श आचारसंहिता 6 जूनपर्यंत लागू राहणार आहे.

0000

दुष्काळसदृश भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी

 दुष्काळसदृश भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी

 

अमरावती, दि. 27 : राज्यातील सन 2023-24 मध्ये जाहीर झालेल्या दुष्काळसदृश्य भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती योजना लागू करण्यात आली आहे. त्यानुषंगाने इयत्ता दहावी व बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीचे प्रस्ताव संबंधित शाळा, महाविद्यालयामार्फत शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयाला तसेच अधिकृत संकेतस्थळावर सादर करावे, असे आवाहन राज्यमंडळ, पुणे च्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.

 परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजने अंतर्गत परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी पात्रतेच्या आवश्यक माहिती तसेच स्वत:च्या किंवा पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याची माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा.

या संदर्भात तपशीलवार माहिती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ http://mahahsscboard.in माध्यमिक शाळांसाठी http://feerefund.mh-ssc.ac.in व उच्च माध्यमिक शाळांसाठी http://feerefund.mh-hsc.ac.in यावर उपलब्ध करुन देण्यात आली असून विद्यार्थ्यांनी उपरोक्त संकेतस्थळांना भेट द्यावी, असेही आवाहन शिक्षण मंडळाव्दारे करण्यात आले आहे.

 

0000

रविवार, १७ मार्च, २०२४

निवडणूक आचारसंहिता (Model Code of Conduct) - लेख

 



निवडणूक आचारसंहिता (Model Code of Conduct)

‘भारत निवडणूक आयोग’ ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. भारतीय संविधानाच्या कलम 324 अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. निवडणुक आयोगाला भारतीय संविधानाच्या चार स्तंभांपैकी एक मानले जाते. भारतातील निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे. निवडणूक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त यांच्यासह एक निवडणूक आयोग बनतो. ऑक्टोबर इ.स. 1993 पासून दोन निवडणूक आयुक्त नेमण्याची प्रथा पडली (1989 मध्ये-दोन अन्य निवडणूक आयुक्त नेमले होते). तसेच एका अद्यादेशाद्वारे त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त सारखाच दर्जा व स्थान देण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्तांना पार पाडण्याचे कर्तव्य लक्षात घेऊन सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीची नेमणूक राष्ट्रपती या पदावर करतात. राजीव कुमार हे 25 वे व सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त आहेत.

निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

सार्वत्रिक निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात, त्यात काही जातीय दंगेधोपे अथवा कोणत्याही स्वरूपाचे गैरव्यवहार होऊ नयेत या उद्देशाने निवडणूक आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. ही आचारसंहिता नीटपणे पाळल्या जाते कि नाही यावर संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांची देखरेख असते.

            निवडणुकीची घोषणा झाल्याच्या तारखेपासून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याच्या तारखेपर्यंत उमेदवारांनी व राजकीय पक्षांनी ‘काय करावे’ व ‘काय करु नये’ याबाबत निवडणूक आयोगाने वानगीदाखल तयार केलेली सुची पुढीलप्रमाणे आहे.

काय करावे : अनुपालन करण्याविषयी मार्गदर्शक तत्वे

1) निवडणुका घोषित होण्यापूर्वी क्षेत्रात प्रत्यक्षपणे सुरु करण्यात आलेले कार्यक्रम पुढे चालू ठेवता येतील.

2) ज्याविषयी शंका निर्माण होईल अशा बाबींच्या संबंधात, भारत निवडणूक आयोग/राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण/मान्यता प्राप्त करण्यात यावे.
3) पूर, अवर्षण, रोगाची घातक साथ किंवा इतर नैसर्गिक आपत्ती यामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांतील जनतेसाठी पीडा निवारण आणि पुनर्वसन कार्य सुरु करता व चालु ठेवता येऊ शकेल.
4) मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना उचित मान्यतेने रोख रक्कम किंवा वैद्यकीय सुविधा देण्याचे समुचित मान्यतेने पुढे चालू ठेवता येईल.
5) मैदानासारखी सार्वजनिक ठिकाणे निवडणूक सभा घेण्यासाठी सर्व पक्षांना/ निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निपक्ष:पातीपणे उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे हेलिपॅडचा वापरही सर्व पक्षांना/ निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निपक्ष:पातीपणे उपलब्ध करुन दिला पाहिजे.
6) इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टिका, त्यांची धोरणे, कार्यक्रम पूर्वीची कामगिरी आणि कार्य या बाबींशी संबंधित असावी.
7) शांततामय आणि उपद्रवरहित गृहस्थजीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तीच्या अधिकाराचे पूर्णपणे जतन करण्यात यावे.
8) स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी. प्रस्तावित सभेच्या जागी कोणतेही निर्बंधात्मक किंवा प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्याचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक असल्यास त्याबाबत सूट मिळण्याकरिता अर्ज केले पाहिजेत आणि अशी सूट वेळीच मिळवावी. प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धकांचा वापर करण्याची आणि अशा इतर कोणत्याही सुविधांसाठी परवानगी मिळवली पाहिजे.
9) सभांमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी.
10) मिरवणूक सुरु होण्याची वेळ आणि जागा, ती जेथून जाणार असेल तो मार्ग आणि ती जेथे संपणार असेल ती वेळ आणि जागा अगोदर निश्चित करण्यात येईल आणि पोलीस प्राधिकाऱ्यांकडून त्यासाठी आगाऊ परवानगी घेण्यात यावी. मिरवणूक जेथून जाणार असेल त्या भागांमध्ये कोणताही निर्बंधक आदेश जारी असल्यास, त्याबाबत खात्री करुन घेऊन, त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहतूक विनियम आणि इतर निर्बंध यांचेही अनुपालन करण्यात यावे. मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा होऊ देऊ नये, मतदान शांततापूर्ण आणि सुनियोजितरितीने पार पडावे यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना नेहमीच सहकार्य करावे, सर्व कार्यकर्त्यांनी बिल्ले व ओळखपत्र ठळकपणे लावावीत.
11) मतदारांना पुरविण्यात आलेल्या अनौपचारिक ओळखचिठ्ठ्या साध्या (पांढऱ्या) कागदावर असाव्यात आणि त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव असू नये. प्रचाराच्या कालावधीमध्ये व मतदानाच्या दिवशी वाहने चालविण्यावरील निर्बंधाचे पूर्णत: पालन करण्यात यावे.
12) निवडणूक आयोगाकडून वैध प्राधिकारपत्र मिळविलेल्या व्यक्तींनाच फक्त मतदार, उमेदवार व त्यांचे निवडणूक/ मतदार प्रतिनिधी यांव्यतिरिक्त कोणत्याही मतदान कक्षात प्रवेश करता येईल. इतर व्यक्ती कितीही उच्चपदस्थ असली तरी (उदा. मुख्यमंत्री, मंत्री, खासदार किंवा आमदार इत्यादी) तिला अटीतून सूट मिळणार नाही.
13) निवडणुका घेण्याविषयीची कोणतीही तक्रार किंवा समस्या, आयोग/ निवडणूक निर्णय अधिकारी/ क्षेत्र/ प्रक्षेत्र दंडाधिकारी/ भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात याव्यात. निवडणूक आयोग/ निवडणूक निर्णय अधिकारी/ जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निवडणुकीच्या विविध पैलूंशी संबंधित असलेल्या सर्व बाबींविषयीचे निर्देश/ आदेश/ सूचना यांचे पालन करण्यात यावे.

काय करु नये :

1) शासकीय वाहने किंवा कर्मचारी वर्ग किंवा यंत्रणा याचा निवडणूक प्रचार विषयक कामासाठी वापर करण्यात येऊ नये.

2) सत्ताधारी पक्ष/शासन यांनी केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात व सर्व जाहिराती काढण्यास प्रतिबंध आहे. कोणताही मंत्री तो किंवा ती उमेदवार असल्याशिवाय किंवा फक्त मतदानासाठी मतदार म्हणून आला असेल त्याशिवाय मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाही.

3) कोणत्याही वित्तीय अनुदानाची घोषणा करणे, कोनशिला बसविणे, नवीन रस्ते इ. बांधण्याचे वचन देणे इत्यादी गोष्टी करु नयेत. शासन/सार्वजनिक उपक्रम यांच्या सेवेत कोणत्याही तदर्थ नियुक्त्या करु नयेत.
4) शासकीय कामाची निवडणूक मोहीम, निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिसळ करु नये.
5) मतदाराला, पैशाचे किंवा अन्य कशाचेही  प्रलोभन दाखवू नये.  मतदारांच्या जातीय समूह भावनांना आवाहन करु नये. वेगवेगळ्या जाती समूह किंवा धार्मिक किंवा भाषिक गट यांच्यामधील विद्यमान मतभेद वाढतील किंवा परस्पर द्वेष किंवा तणाव निर्माण करतील असे कोणतेही काम करण्याचा प्रयत्न करु नये.
6) इतर पक्षांचे नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक जीवनाशी संबंधित नसलेल्या खाजगी आयुष्याच्या कोणत्याही पैलूंवर टीका करण्याची परवानगी दिली जाणार नाही. इतर पक्ष किंवा त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर, आंधळेपणाने केलेले आरोप आणि विपर्यस्त माहिती यांच्या आधारावर टिकाटिप्पणी करु नये.
7)मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वार किंवा इतर कोणतेही प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, भित्तीपत्रके, संगीत यांच्यासह निवडणूक प्रचाराची जागा म्हणून केला जाणार नाही.
8)मतदारांना लाच देणे, मतदारांवर गैरवाजवी दडपण, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, तोतयागिरी, मतदार केंद्रापासून 100 मीटर्सच्या आत निवडणूक प्रचार करणे, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या 48 तासात सार्वजनिक सभा घेणे आणि मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यासारख्या भ्रष्ट प्रथा किंवा निवडणूक अपराध समजल्या जाणाऱ्या गोष्टींना मनाई आहे.
9) लोकांच्या मतांचा किंवा त्यांच्या कामांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने करणे किंवा धरणे यांचा कोणत्याही परिस्थितीत अवलंब केला जाणार नाही.
10) स्थानिक कायद्यांच्या अधीन राहून कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवार भिंत, वाहने इत्यादींच्या मालकाच्या विशिष्ट परवानगीशिवाय (जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला दाखविण्यासाठी व त्यांच्याकडे जमा करण्याकरिता) ध्वजदंड उभारण्यासाठी, निशाण्या लावण्यासाठी, सूचना चिकटविण्यासाठी, घोषणा लिहिण्यासाठी कोणीही वापर करणार नाही.
11)इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक सभा किंवा मिरवणुका यांच्यामध्ये कोणताही अडथळा निर्माण करु नये.
12) ज्या ठिकाणी इतर पक्षांच्या सभा घेतल्या जात असतील अशा ठिकाणांहून मिरवणूक नेऊ नये. मिरवणुकीतील लोक, क्षेपणास्त्र किंवा शस्त्र म्हणून ज्याचा दुरुपयोग केला जाऊ शकतो अशा कोणत्याही वस्तू जवळ बाळगण्यात येऊ नयेत.
13)इतर पक्षांनी व उमेदवारांनी लावलेली प्रचारपत्रके, भिंतीपत्रके काढून टाकू नयेत अथवा विद्रुप करु नयेत.
14) मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठ्या वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाच्या जवळ भित्तीपत्रके, ध्वज, चिन्हे आणि इतर प्रचार साहित्य यांचे प्रदर्शन करु नये.
15) ध्वनीवर्धकांचा मग ते एका जागी लावलेले असोत किंवा चालत्या वाहनावर बसविलेले असोत, त्यांचा सकाळी 6 पूर्वी किंवा रात्री 10 नंतर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय वापर करण्यात येऊ नये.
16)संबंधित प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय, सार्वजनिक सभा आणि मिरवणुका यांच्यामध्येही ध्वनीवर्धकाचा वापर करण्यात येऊ नये. सर्वसाधारणपणे अशा सभा/ मिरवणुका रात्री 10 नंतर चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येऊ नये आणि त्याशिवाय त्याचा वापर स्थानिक कायदे, त्या जागेच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रत्यक्ष ज्ञान आणि हवामानाची स्थिती, सणासुदीचा मोसम, परीक्षेचे दिवस इ. सारख्या परिस्थितीच्या अधीन असेल.
17) निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारे मद्याचे वाटप करण्यात येऊ नये.

18)ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून तिला सरकारी सुरक्षा पुरविण्यात आली आहे अशी कोणतीही व्यक्ती मतदानाच्या दिवशी, त्याच्या सुरक्षा कर्मचारीवर्गासह मतदान केंद्र असलेल्या जागेच्या परिसरात (100 मीटर्सच्या आत) प्रवेश करणार नाही. तसेच, अशी कोणतीही व्यक्ती, मतदानाच्या दिवशी, त्याच्या सुरक्षा कर्मचारीवर्गासह मतदारसंघामध्ये फिरणार नाही. जर सरकारी सुरक्षा पुरविलेली व्यक्ती मतदार असेल तर, केवळ मतदान करण्यासाठी सोबत असलेल्या सुरक्षा कर्मचारीवर्गासह त्याच्या/ तिच्या ये-जा करण्यावर निर्बंध घालील.
19) ज्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका असल्याबाबत खात्री पटली आहे आणि म्हणून तिला सरकारी सुरक्षा पुरविली आहे किंवा त्या व्यक्तीकडे खाजगी सुरक्षा रक्षक आहेत अशा कोणत्याही व्यक्तीची निवडणूक प्रतिनिधी किंवा मतदान प्रतिनिधी किंवा मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात येऊ नये.


सदर सूची ही केवळ वानगीदाखल असून ती सर्वसमावेशक नाही. याबाबत कोणतीही शंका असल्यास भारत निवडणूक आयोग किंवा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून मान्यता घेण्यात यावी.

 

-विजय राऊत,

 सहायक संचालक (माहिती)

 विभागीय माहिती कार्यालय, अमरावती

 

0000

 

गुरुवार, १४ मार्च, २०२४

19 मार्चला विभागीय रोजगार मेळावा; अतांत्रिक पदांसाठी ‘टीसीएस’मध्ये भरती

 

19 मार्चला विभागीय रोजगार मेळावा;

अतांत्रिक पदांसाठी ‘टीसीएस’मध्ये भरती

 

          अमरावती, दि. 14 (विमाका) : कौशल्य, विकास रोजगार व उद्योजकता विभाग व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार दि. 19 मार्च रोजी डॉ. के. जी देशमुख सभागृह, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांसाठी टाटा कन्सलटन्सी सव्हिसेस या नामाकिंत कंपनीत अतांत्रिक पदांसाठी भरती होत असून या संधीचा इच्छुक व पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालयाचे उपायुक्त द. ल ठाकरे यांनी केले आहे. 

       ‘टीसीएस’मधील अतांत्रिक पदांसाठी बीए, बीकॉम, बीसीए, बीएएफ, बीबीआय, बीबीएम, बी. एस्सी. (कृषी शाखेतील पदवी वगळता) आदी शैक्षणिक पात्रता असणा-यांना अर्ज करता येईल. 2022,2023 आणि 2024 या वर्षात पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार सहभाग घेण्यास पात्र आहेत.  सहभाग नोंदविण्यासाठी आँनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी https://forms.gle/3zvnHwm8TRU9uB1N9  या लिंकचा वापर करावा.

      पात्र उमेदवारांनी नियोजित वेळेत प्रत्यक्ष उपस्थित राहावे. सोबत मूळ प्रमाणपत्रे व झेरॉक्स प्रती असाव्यात. टीसीएसच्या ऑनलाईन अर्जाची प्रत, पासपोर्ट फोटो, ओळखपत्र (आधार कार्ड,पॅनकार्ड, वाहन परवाना, पारपत्र, मतदान ओळखपत्र यापैकी), 10 वी आणि 12 वी चे गुणपत्रिका व प्रमाणपत्र, पदवीच्या वर्ष व सत्रनिहाय गुणपत्रिका व प्रमाणपत्र, तात्पुरते पदवी प्रमाणपत्र,अभ्यासक्रम संकलन प्रमाणपत्र असावे. निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येईल.

       रोजगार मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी उमेदवारांनी 8983419799, 7218331735, 8605654025, 8668256500, 7020758701 व 7972632828 या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र, अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधावा.

00000

 

बुधवार, १३ मार्च, २०२४

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करा समाज कल्याण विभागाचे आवाहन ; 31 मार्च अंतीम मुदत

 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करा

 

समाज कल्याण विभागाचे आवाहन ; 31 मार्च अंतीम मुदत

 

अमरावती, दि.13 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सैनिकी शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, इयत्ता नववी व दहावी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, साफ सफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता 5 वी ते 10 वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क या विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.

उपरोक्त नमूद केलेल्या सर्व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांची महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज

नोंदणी करणेकरीता पुढीलप्रमाणे कार्यप्रणाली अवलंबविण्याच्या सूचना विभागाव्दारे देण्यात आल्या आहेत. महाडीबीटी प्रणालीची वेब लिंक https://prematric.mahait.org/Login/Login याप्रमाणे असून महाडीबीटी पोर्टलवर प्री-मॅट्रिक योजनांसाठी अर्जाच्या नोंदणीसाठी मुख्याध्यापकांनी प्रथम लॉगीन तयार करावे, त्यानंतर  शाळेच्या मुख्याध्यापकांनी युजर आयडीमध्ये Pre_SE२७XXXXXXXX_Principal आणि Pass@१२३ टाइप करून लॉगीन करावे. शाळेची, मुख्याध्यापकांची व लिपिकाची माहिती अद्ययावत करणे यासाठी शाळेचे प्रोफाईल अद्ययावत करावे. त्यानंतर विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती अंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. संबंधित विद्यार्थी ज्या योजनेसाठी पात्र आहे त्या योजनेकरीता अर्ज नोंदणी करावे.

            वरील पद्धतीचा अवलंब करून सर्व शासन मान्यता प्राप्त शाळांची नोंदणी महाडीबीटी पोर्टलवर करावी. तसेच वरील मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीमध्ये तात्काळ नोंदणी करणेकरीता विभागातील सर्व शासन मान्यता प्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रादेशिक कार्यालयामार्फत यापूर्वीच जाहीर आवाहन करण्यात आले होते. परंतू, दि.०५ मार्च, २०२४ रोजीचे महाडीबीटी डॅशबोर्डचे अवलोकन केले असता महाडीबीटी पोर्टलवर विभागातील एकूण १०२० शाळांनीच नोंदणी केली असल्याचे दिसून आले आहे. सर्व योजने अंतर्गत एकूण 924 विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अर्जाची नोंदणी झाली आहे.

तेव्हा विभागातील सर्व शासन मान्यता प्राप्त शाळांना कळविण्यात येते की, सर्व शाळांनी 31 मार्च, 2024 पर्यंत शाळांची नोंदणी महाडीबीटी पोर्टलवर करण्यात यावी. तसेच ऑनलाईन करण्यात आलेल्या सर्व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर भरण्यात यावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.  

00000

कृषी विभागाच्या ‘कृषि सेवक’ पदाचा निकाल जाहीर

 कृषी विभागाच्या ‘कृषि सेवक’ पदाचा निकाल जाहीर

निकालपत्रक www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध

अमरावती, दि. 12 :  कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग अमरावती यांच्या आस्थापनेवरील भुतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील कृषी सेवक गट क या पदाचा निकाल जाहीर करण्यात आला असून निकालपत्रक www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. याबाबत संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे यांनी केले आहे.

गट क संवर्गातील कृषी सेवक या पदांसाठी सरळसेवेने पद भरतीसाठी जाहीरात दि. 12 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. सदर जाहीरातीस अनुसरुन दि. 16 व 19 जानेवारी 2024 या दिवशी इंस्टीटयुट ऑफ बँकिंग पर्सेनल सिलेक्शन (आय.बी.पी.एस.) संस्थेमार्फत विविध परिक्षा केंद्रावर परिक्षा घेण्यात आली होती. इंस्टीटयुट ऑफ बँकिंग पर्सेनल सिलेक्शन (आय.बी.पी.एस.) संस्थेकडुन सदर परिक्षेचे निकालपत्रक नुकतेच विभागाला प्राप्त झालेले आहे. सदर निकालपत्रक कृषी विभागाच्या   www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. 12 मार्च 2024 पासुन प्रसिध्द करण्यात आले आहे. यथावकाश अंतीम निवडसुची प्रसिध्द करण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे विभागीय कृषी सहसंचालक श्री. मुळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांच्याकडून जखमींची विचारपूस

 विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांच्याकडून जखमींची विचारपूस

अमरावती, दि.12 : विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशव्दाराजवळ सोमवारी (ता.11 मार्च) पांढरी खानमपूर येथील ग्रामस्थांच्या ठिय्या आंदोलनात जखमी झालेल्यांची विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज रेडियंट हॉस्पीटलला भेट देवून आस्थेने विचारपूस केली. जखमींना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना त्यांनी रुग्णालयाला दिल्या.

यावेळी त्यांच्यासोबत पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी व आरोग्य अधिकारी उपस्थित होते. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील प्रवेशव्दाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील ग्रामस्थांचे गत तीन दिवसापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरु होते. काल सोमवारी (ता.12 मार्च) सायंकाळी  आंदोलनाला हिंसक वळण लागले. जिल्हा प्रशासनाचा संयुक्त बैठकीचा प्रस्ताव आंदोलकांनी अमान्य करुन जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. आंदोलकांनी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या गेटचे नुकसान केले. पोलीस वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे जमावाला पांगविण्यासाठी पोलीसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचा मारा केला. दरम्यान, नऊ पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे दोन जवान व पाच आंदोलक असे सोळाजण जखमी झाल्याची माहिती आहे. त्या जखमींची आज विभागीय आयुक्तांनी भेट घेऊन प्रकृतीविषयी आस्थेने विचारपूस केली.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहरात व विभागीय आयुक्त परिसरात पोलीस जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सद्यस्थितीत परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात आहे. तसेच उक्त प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून तीन दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी समितीला दिले आहे.

0000


शनिवार, ९ मार्च, २०२४

महिलांनी स्वकतृत्वाने आपले भविष्य घडवावे -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील तीन दिवसीय जागतिक महिला दिन महोत्सवाचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप

 












महिलांनी स्वकतृत्वाने आपले भविष्य घडवावे

                 -पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

 

तीन दिवसीय जागतिक महिला दिन महोत्सवाचा

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप

 अमरावती, दि.9 : महिलांना संधी दिल्यास त्या आपल्या कतृत्वाचा मेहनतीने ठसा उमटवितात. काही तरी नवीन करण्याचा आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण झाल्याने त्या सर्वच क्षेत्रात अग्रेसर होत आहेत. महिलांनीही स्वत:ला कमजोर न समजता, दिलेल्या सर्व संधीच स्वकतृत्वाने सोनं केलं पाहिजे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी उपस्थित तमाम महिला भगिनींना केले.

जिल्हा परिषद प्रशासन, उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्सकोर मैदान येथे स्वयंसहाय्यता बचत गटांचे ‘वैदर्भी जिल्हा प्रदर्शनी’ व जागर स्त्री शक्ती कार्यक्रम आणि अमृत महाआवास अभियान (ग्रामीण) अंतर्गत तीन दिवसीय कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत विजेता ठरलेल्या महिला बचतगट, ग्राम पंचायतींना पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, आमदार रवी राणा, निवेदीता दिघडे, जयंत डेहनकर, माजी महापौर चेतन गावंडे, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा, डिआडीएच्या प्रकल्प संचालक प्रिती देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश घोडके, मआविमचे व्यवस्थापक सुनील सोसे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, महिला बचत गटाव्दारे निर्माण करण्यात विविध उत्पादनांना बाजारात चांगला भाव मिळत आहे. त्यांच्याव्दारे निर्माण करण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या विपनणासाठी जिल्हा परिषदेने व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे. महिला महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनीच्या माध्यमातून बचतगटांच्या उत्पादनांची विक्री व माहिती सर्वदूर होत आहे. जिल्हा परिषदेचा हा स्तुत्य उपक्रम असून अमरावती शहरात उभारण्यात आलेल्या धारणीच्या महिला बचतगटांच्या उत्पादनांच्या ‘मेळघाट हाट’ च्या धर्तीवर बचतगटांच्या उत्पादन विक्रीसाठी आणखी विक्री केंद्र स्थापित करण्यात यावेत, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. महिलांनी आता उद्योग-व्यवसायात पुढाकार घ्यावा, त्यासाठी राज्य शासनाव्दारे विविध योजनांच्या माध्यमातून कर्ज मिळवून दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मोहपात्रा यांनी महिला महोत्सवाच्या आयोजना मागील भूमिका विशद केली. जिल्ह्यातील महिला बचत गटांना अर्थसहाय्य व प्रगतीबाबत तसेच जिल्हा परिषदेकडून राबविण्यात आलेल्या विविध योजनांतून ग्रामीण भागात झालेले विकासकामे याविषयी पालकमंत्री महोदयांना प्रास्ताविकातून माहिती दिली.

पालकमंत्र्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनीत सर्वात जासत उत्पादन विक्री झालेल्या प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या खाद्य पदार्थांच्या स्टॉल्सधारकांना पालकमंत्र्यांचे हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. सुर्यकांतादेवी पोटे-पाटील प्रित्यर्थ सर्वात जास्त बचतगटांच्या उत्पादन विक्री करणाऱ्या स्टाल्सधारकांनाही प्रथम, व्दितीय क्रमांकाचे पारितोषिकांचे वितरण, आर.आर. पाटील सुंदर गाव पुरस्कारांचे वितरण, तसेच अमृत महाआवास अभियान (ग्रामीण) अंतर्गत विजेत्या ठरलेल्या ग्राम पंचायतींना पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रथम, व्दितीय व तृतीय पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले.

0000

 

 

विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी महापालिकेने अधिकाधिक लक्ष केंद्रीत करावे -पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते महापालिकेच्या 14 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण

 











विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी

महापालिकेने अधिकाधिक लक्ष केंद्रीत करावे

-पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

 

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते

महापालिकेच्या 14 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण

 

अमरावती, दि. 9 : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी व नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा नियोजन योजनेतून भरीव निधी उपलब्ध करुन दिला जातो. ज्याप्रमाणे स्वत:चे घर उभारण्यासाठी आपण जातीने लक्ष घालतो, त्याप्रमाणे जिल्ह्याची पायाभूत विकासकामे पूर्णत्वास नेताना ती गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्यासाठी जाणीवपूर्वक लक्ष केंद्रीत करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

          अमरावती महापालिकेच्या अखत्यारितीतील सुमारे साडे चौदा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भुमिपूजन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने महापालिकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, प्रताप अडसळ, रवी राणा, माजी महापौर चेतन गावंडे, संजय नरवने, महापालिका आयुक्त देविदास पवार, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, महिला व बालकल्याण अधिकारी नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, श्रीमती वासनकर यांच्यासह  मनपा प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

          पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी जिल्हा नियोजन योजनेतून निधी संबंधित विभागांना उपलब्ध करुन दिल्या जाते. जिल्ह्यातील रचनात्मक व पायाभूत विकास कामे करताना ती गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची असते. त्यानुसार प्रत्येक कार्यान्वयन यंत्रणांनी आपापली जबाबदारी उत्कृष्ठरित्या पार पाडावी. राज्य शासनाकडून विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला भरीव निधी दिला जात आहे. शहरात भटक्या श्वानांकडून चावा घेतल्याने जखमी झालेल्यांची संख्या अधिक आहे. कुत्र्यांना मारता येत नाही. तसेच त्यांना दूर नेवून टाकणे हाही उपाय नाही. त्यावर उपाय म्हणून भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी महापालिकेने विशेष अभियान राबवावे. तसेच प्राण्यांची आक्रमकता कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. समाजातील गोर गरीब व होतकरु विद्यार्थ्यांचे युपीएससी व एमपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांत उत्तीर्ण होण्याचा टक्का वाढण्यासाठी चांगल्या सोयी-सुविधा असलेल्या अभ्यासिकेंची निर्मिती करण्यात यावी, असे ते म्हणाले. नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महापालिकेला निधीची कमतरता भासू देणार नाही, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

          महापालिकेव्दारे राबविण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांची व प्रस्तावित असलेल्या  विविध विकासकामांची माहिती आयुक्त श्री. पवार यांनी पालकमंत्र्यांना यावेळी दिली. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेची निर्मिती, डी पी रस्त्यांची कामे, फाउंटन निर्मिती, टॉऊन हॉलचे नुतणीकरण, ई-बसेस प्रकल्प आदी प्रकल्पांना राज्य शासनाकडून निधी मिळण्याबाबतची मागणी त्यांनी पालकमंत्र्यांसमोर यावेळी मांडली.

          लोकार्पण व भुमिपूजन करण्यात आलेली विकासकामे

          जिल्हा नियोजन योजनेतून प्राप्त झालेल्या सुमारे साडे चौदा कोटी रुपयांच्या निधीतून  महापालिकेची विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे बांधकाम, ई-टपाल सेवा, घनकचरा सी ॲन्ड डी वेस्ट व्यवस्थापन प्रकल्प, जिल्हा नियोजन समिती नाविन्यपूर्ण घटक, मोठया प्राण्यासाठी शवदाहिनी उभारणे, रहाटगाव व कोंडेश्वर येथे प्राणी निवारा केंद्र तथा पशु उपचार केंद्राची उभारणी, कॅम्प स्थित संत गाडगेबाबा अभ्यासिका, 15 वा वित्त आयोग अंतर्गत उत्तम नगर येथे आरोग्य मंदीराचे बांधकाम आदी कामांचा समावेश असून पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने लोकार्पण व भुमिपूजन आज करण्यात आले.

         

0000