गुरुवार, २९ मे, २०२५

कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) आवश्यक फार्मर आयडी काढण्याचे शेतकरी बांधवांना आवाहन ; 31 मे अंतीम तारीख

अमरावती, दि. 29 : केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) आता बंधनकारक करण्यात आला आहे. अमरावती विभागातील अनेक शेतकऱ्यांनी हा आयडी काढला असून ज्या शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत फार्मर आयडी काढला नाही, त्यांनी तात्काळ आपला फार्मर आयडी काढून घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. या फार्मर आयडी प्रणालीमुळे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, नमो शेतकरी महासन्मान निधी, पीक कर्ज योजना, पीक विमा योजना आणि किमान आधारभूत किंमत खरेदी योजना यांचा लाभ मिळवणे अधिक सुलभ होणार आहे. याशिवाय, आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत नुकसान भरपाई व डिजिटल पीक कर्ज देखील सहज उपलब्ध होईल. काय आहे 'फार्मर आयडी' ? फार्मर आयडी हे शेतकऱ्यांसाठी एक विशेष डिजिटल ओळखपत्र आहे, जे आधार कार्ड प्रमाणेच एक अद्वितीय क्रमांक असलेले असेल. या आयडी मध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती त्यांच्या शेत जमिनीचा तपशील आणि शेतीशी संबंधित महत्त्वाची माहिती समाविष्ट असेल. शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी अॅग्री स्टॅक पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. यानुषंगाने अमरावती विभागातील 13 लाख 36 हजार 298 शेतकऱ्यांनी अग्रीस्टक मध्ये नोंदणी केलेली आहे. फार्मर आयडी मुळे विविध कृषी योजनांचा लाभ खऱ्या शेतकऱ्यांनाच होईल. ज्यांनी खोटे कागदपत्र सादर करुन शेतकरी दाखवून योजनांचा लाभ घेतला आहे किंवा घेत आहेत. अशावर अनुदान लाटण्यासाठी आळा बसेल. ज्या शेतक-यांकडे फार्मर आयडी असेल त्यांना विविध कृषी योजनांचा लाभ मिळवणे अधिक सुलभ व सोईचे होणार आहे. ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करुन फार्मर आयडी मिळविलेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घेता येईल. पीएम कीसान, नमो सन्मान या योजनांबरोबरच कृषि विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी 31 मे ही अंतीम तारीख फार्मर आयडी काढण्यासाठी निश्चित केलेली आहे. त्यामुळे हा आयडी काढला नसल्यास शासनाच्या विविध योजनांपासुन वंचित रहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अमरावती विभागातील सर्व शेतक-यांनी फार्मर आयडी हा तातडीने काढुन घ्यावा, असे आवाहन अमरावती विभागाचे कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा