गुरुवार, १५ मे, २०२५
आदिवासींसाठी महाअभियान ठरले लाभदायक *धरती आबा, प्रधानमंत्री महाअभियान गावांसाठी संजिवनी
अमरावती, दि. 15 :आदिवासी समुदायाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी केंद्र शासनाने 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' आणि 'प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान' सुरू केले आहे. हे अभियान जिल्ह्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लाभदायक ठरत आहेत.
या अभियानांतर्गत आदिवासी बहुल भागातील पक्की घरे, रस्ते, पाणी, वीज, सौरऊर्जा, मोबाईल नेटवर्क, गॅस जोडणी, वसतिगृह, पोषण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांवर विशेष मोहिमेद्वारे लक्ष केंद्रित केले जात आहे. सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी कुटुंबांना याचा लाभ मिळत आहे.
प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियानात धामणगाव रेल्वे तालुक्यातील तीन गावाचा समावेश आहे. यात 334 आदिम जमातीची लोकसंख्या आहे. या अभियानातून उसळगव्हाण येथील 17 आणि बोरगाव धांडे येथील चार अशा 21 लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी झाले. यातील 20 घरकुलांचे काम पुर्ण झाले आहे. सन 2025-26 या वर्षात नायगाव ता. धामणगाव रेल्वे येथील 20 लाभार्थ्यांना घरकुल मंजुर करण्यात येणार आहे. या गावामध्ये आदिम जमार्तीचे आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, राशन कार्ड, किसान सन्मान निधी व इतर आवश्यक कागदपत्रांची कार्यवाही अभियानातून करण्यात आली आहे.
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानात अमरावती, अचलपूर, भातकुली, चांदुरबाजार, चिखलदरा, दर्यापुर, धारणी, मोर्शी, वरुड या 9 तालुक्यामधीत 321 आदिवासी बहुल गावाचा समावेश आहे. अभियानातून धारणी प्रकल्पांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेत दोन मुलांचे आणि चार मुलींचे असे सहा वसतिगृह मंजूर झाली आहे. तसेच या अभियानातून आदिवासींना लाभ देण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रांची पुर्तता करून लाभ देण्यात येत आहे. तसेच मेळघाटमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी लाभार्थ्यांना विविध लाभ देऊन बाजारपेठेचा विकास करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या अभियानांमुळे अमरावती जिल्ह्यातील आदिवासी समाजात सकारात्मक बदल दिसून येत असून त्यांच्या जीवनात सुधारणा होत आहे.
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी, प्रशासनातर्फे अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. धरती आबा आणि प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियानाच्या माध्यमातून आदिवासी भागात शाश्वत विकासाची पायाभरणी होत आहे. यातून मुलभूत सुविधा गावापर्यंत पोहोचत आहे. यातून आदिवासींच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असल्याचे सांगितले.
धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्यात येत आहे. स्थानिक गरजा आणि भौतिक सुविधांमधील कमतरता ओळखून योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यातून आदिवासींच्या सर्वांगीण विकासाला गती मिळत असल्याचे सांगितले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा