शुक्रवार, १ मार्च, २०१९

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना


अमरावती विभागातील 82 टक्के
पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती पोर्टलवर


            अमरावती, दि. 01 :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शुभारंभानंतर लाभ वितरणाच्या कार्यवाहीने गती घेतली असून, अमरावती महसूल विभागातील पाचही जिल्ह्यातील 7 हजार 97 गावांच्या एकूण 7 लाख 74 हजार 791 शेतकरी कुटुंबाची माहिती राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. आजमितीस (दि.1 मार्च) माहिती अपलोड करण्याची टक्केवारी 82 टक्के आहे.  
            विभागातील 7 हजार 312 गावांत 16 लाख 98 हजार 397 खातेदार शेतकरी आहेत. योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी महसूल, कृषी व विविध विभाग पात्र शेतकरी कुटुबांची माहिती संकलीत करण्याची कार्यवाही करीत आहे. या गतिमान कार्यवाहीनुसार विभागातील 7 हजार 298 गावातील 9 लाख 42 हजार 961 पात्र शेतकरी कुटुंब संख्येपैकी 7 हजार 97 गावातील 7 लाख 74 हजार 791 शेतकरी कुटुंबाची माहिती राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून याची 82 टक्केवारी आहे.
पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली जिल्हानिहाय संख्या
पात्र लाभार्थी कुटुंबांची पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली संख्या अमरावती जिल्ह्यातील 1 लाख 95 हजार 494, अकोल्यातील 1 लाख 15 हजार 762, यवतमाळमधील 1 लाख 55 हजार 399, बुलडाणा जिल्ह्यातील 1 लाख 99 हजार 123 आणि वाशिम जिल्ह्यातील 1 लाख 9 हजार 13 अशी आहे. 

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा