संदर्भ सेवा रूग्णालयाचा दुसरा टप्पा तातडीने सुरू करावा
-विभागीय आयुक्त पियूष सिंह
अमरावती, दि. 4 : विभागीय संदर्भ सेवा रूग्णालयात रूग्णांची संख्या मोठी आहे. रूग्णांच्या सोयीसाठी दुसरा टप्पा बांधून पूर्ण झाला आहे. याठिकाणी आवश्यक असलेल्या सोयी उपलब्ध करून रूग्णालयाचा दुसरा टप्पा तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी दिले.
रूग्ण कल्याण नियामक समितीची बैठक रूग्णालयातील सभागृहात आज घेण्यात आली. यावेळी रूग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य डॉ. सुनिल देशमुख उपस्थित होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी रूग्ण कल्याण नियामक समितीच्या नियोजित कामांची माहिती दिली.
श्री. सिंह यांनी नव्याने बांधलेल्या विभागीय संदर्भ सेवा रूग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्याची माहिती जाणून घेतली. इमारत बांधून तयार आहे, मात्र या ठिकाणी आवश्यक असलेल्या ऑक्सीजन पुरवठा व्यवस्था नसल्याने ही इमारत उपयोगात आणता येत नसल्याची माहिती देण्यात आली. तसेच ऑक्सीजन व्यवस्थेसाठी शासनाने पाच कोटींचा निधी जानेवारीमध्ये मंजूर केला आहे, हा निधी प्राप्त होताच कामे करून इमारत उपयोगात आणली जाणार असल्याचे डॉ. निकम यांनी सांगितले. ऑक्सीजन व्यवस्थेचा मंजूर निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. हा निधी प्राप्त करून रूग्णालयाचा दुसरा टप्पा तातडीने सुरू करावा, असे निर्देश श्री. सिंह यांनी दिले.
रूग्ण कल्याण नियामक समितीला यावर्षी प्राप्त होणाऱ्या पाच लाख रूपयांचा अनुदानाचे नियोजन करण्यात आले. यातून रूग्णांना आवश्यक असणारी औषधे, शस्त्रक्रियेचे साहित्य, उपकरणे, गरजू रूग्णांच्या बाहेर कराव्या लागणाऱ्या चाचण्या आदी बाबींवर खर्च करण्यात येणार आहे.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा