बुधवार, ३० जून, २०२१

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या रोजगार मेळाव्यात 31 युवकांची निवड

 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या

रोजगार मेळाव्यात 31 युवकांची निवड  

           अमरावती, दि. 30 : जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, शास. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तथा मुलभुत प्रशिक्षण व अनुषंगिक सुचना केंद्राच्या वतीने दि.25 जून रोजी सुझुकी मोटर्स गुजरात प्रा. लि. यांच्या तर्फे रोजगार भरती मेळावा आयोजित करण्यांत आला होता. या भरती मेळाव्यात 31 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना रोजगार प्राप्ती झाली आहे. या भरती मेळाव्यात जिल्ह्यातून आयटीआय उत्तीर्ण 56 विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी 46 विद्यार्थी मुलाखतीत पात्र ठरले. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी के. एस. विसाळे, प्रादेशिक कार्यालय अमरावतीचे सहाय्यक संचालक एन. पी. येते, तसेच संस्थेच्या प्राचार्या श्रीमती एम. डी. देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आयटीआय महाविद्यालयाचे प्राचार्य, सहाय्यक प्रशि. सल्लागार श्रीमती एम. आर. गुढे, प्रशि. अधिकारी सदानंद गावंडे, श्रीमती पाटील संस्थेचे निदेशक आदी उपस्थित होते. निवड झालेल्या उमेदवारांना रोजगारस्थळी घेऊन जाण्यासाठी सुझुकी कंपनी तर्फे मोफत बसेसची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती संस्थेच्या प्राचार्य एम. डी. देशमुख यांनी दिली.

00000

 

सोमवार, २८ जून, २०२१

अमरावती विभागात खरीपाची साठ टक्के पेरणी पूर्ण

 

अमरावती विभागात खरीपाची साठ टक्के पेरणी पूर्ण

Ø  तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, कापूस पेरणीला वेग

Ø 75 ते 100 मिलीमिटर पावसानंतर पेरणीची शिफारस

           अमरावती, दि. 28 : अमरावती विभागात यावर्षीच्या खरीप हंगामात 60 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. विभागात सर्वाधिक पेरणी 87 टक्के वाशिम जिल्ह्यात झाली आहे. गेल्यावर्षी याचदरम्यान 73 टक्के पेरणी झाली होती. यावर्षी तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, कापूस पेरणीला वेग आला आहे.

खरीप हंगामासाठी शेतीकामांची लगबग सुरू झाली आहे. पेरणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. सर्वसाधारण खरीपाची पेरणी 75 ते 100 मिलीमिटर पावसाची नोंद झाल्यावर करण्याबाबत कृषी विद्यापीठांनी शिफारस केली आहे. अमरावती विभागात आतापर्यंत 184.4 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात बुलडाणा 136.7, अकोला 79.1, वाशिम 211.9, अमरावती 189.4 आणि यवतमाळात 257.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

अमरावती विभागातील 56 तालुक्यांत 388 महसूल मंडळ समाविष्ट आहेत. यात 11 महसूल मंडळात 0 ते 25 मिमी, 25 मंडळात 25 ते 50 मिमी, 41 मंडळात 50 ते 75 मिमी, 38 मंडळात 75 ते 100 मिमी, तर 273 मंडळात 100 मिमीच्या वर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

अमरावती विभागात सरासरी 60 टक्के पेरणी झाली आहे. यावर्षीच्या 32 लाख 28 हजार 581 हेक्टरपैकी 19 लाख 53 हजार 845 हेक्टर क्षेत्रावर आजअखेर पेरणी झाली आहे. यात सोयाबीन 9.39 लाख, कापूस 6.87 लाख, तूर 2.56 लाख, मूग 20 हजार, उडीद 17 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक पेरणी वाशिम जिल्ह्यात 87.1 टक्के, यवतमाळ 72.4, अमरावती 59, बुलडाणा 56.4, अकोला जिल्ह्यात 24 टक्के पेरणी झाली आहे. मागील वर्षी आजदरम्यान 23 लाख 41 हजार 569 हेक्टरपैकी 73 टक्के हेक्टरवर पेरणी झाली होती.

विभागात सर्वाधिक म्हणजे 76 टक्के कडधान्याची पेरणी वाशिम जिल्ह्यात झाली आहे. यात 516 हेक्टरवर तूर, 33 हेक्टरवर मुग, 12 हेक्टरवर उडीद आणि 8 हेक्टरवर इतर कडधान्याची पेरणी करण्यात आली आहे. 2 हजार 772 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरण्यात आले आहे.

            अमरावती जिल्ह्यात 36 टक्के तृणधान्याची पेरणी करण्यात आली असून यात 30 हेक्टरवर भात, 45 हेक्टरवर ज्वारी, 65 हेक्टरवर मका या पिकांची पेरणी करण्यात आली आहे. 739 हेक्टर क्षेत्रावर तूरीची लागवड करण्यात आली असून या पिकाची टक्केवारी 66 टक्के आहे.

            तेलबियाच्या पेरणीमध्ये वाशिम जिल्ह्यात सरासरी 92 टक्के क्षेत्र व्यापले आहे. 2 हजार 773 हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात 2315 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरण्यात आली आहे. पेरणीचा हा वाटा एकूण टक्केवारीच्या 56 आहे. यवतमाळ जिल्ह्यात 2033 हेक्टरवर सोयाबीन पेरण्यात आले आहे. आतापर्यंत 73 टक्के सोयाबीन पेरणी करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात 595 हेक्टरवर 27 टक्के सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. अमरावती येथे 1 हजार 669 हेक्टरवर 56 टक्के सोयाबीन पेरणी करण्यात आली आहे. विभागात एकूण 9 हजार 395 हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी करण्यात आली आहे. विभागात सोयाबीन पिकाच्या पेरणीचा एकूण वाटा 62 टक्के एवढा आहे.

            कापूस आणि ऊसाची सर्वाधिक पेरणी वाशिम जिल्ह्यात झाली आहे. कापूस व ऊसाची पेरणी अनुक्रमे 92 व 34 टक्के झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 3 हजार 687 हे वर कापूस पिकाने 83 टक्के क्षेत्र व्यापले असून 19 टक्के ऊसाची लागवड करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात 1184 हेक्टरवर 70 टक्के क्षेत्र कापूस तर 18 टक्के ऊसाचे लागवड क्षेत्र आहे. विभागात 6 हजार 873 हेक्टरवर कापूस पेरण्यात आला असून पेरणीची एकूण टक्केवारी 60 एवढी असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक शंकर तोटावार यांनी कळविले आहे.

00000

 

शुक्रवार, २५ जून, २०२१

कोरोनाकाळात स्वास्थ सुरक्षिततेसाठी खबरदारी, आहारविषयक उपाययोजना

 


कोरोनाकाळात स्वास्थ सुरक्षिततेसाठी

खबरदारी, आहारविषयक उपाययोजना

Ø  अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविकांना मार्गदर्शन

अमरावती, दि. 25 : घातखेड कृषि विज्ञान केंद्र आणि महिला व बालविकास प्रकल्पातर्फे अमरावती आणि चांदुरबाजार येथील अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविकांना आहारविषयक उपाययोजनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले

कृषि विज्ञान केंद्रातील गृहविज्ञान विभागाच्या विशेषज्ञ डॉ. प्रणिता कडू यांनी सद्याच्या कोरोना परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी कोरोनाकाळात स्वास्थ सुरक्षिततेसाठी खबरदारी आणि आहारविषयक उपाययोजना’ याबाबत मार्गदर्शन केले.

कोरोनाची प्राथमिक लक्षणे, खबरदारी, उपाययोजनासोबतच आहारातील पोषणासंबंधी गरजा सांगून माहिती दिली. प्रशिक्षणात श्रीमती कडू यांनी घरीच सुरक्षित आणि स्वस्त सॅनिटायझर तयार करण्याची विधी सांगितली. कोरोनाकाळात प्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त असणारी फळे, भाज्या व पौष्टिक आहारबाबत माहिती देऊन बाहेरील वस्तू निर्जंतूक करण्यासाठी घरगुती साहित्याचे महत्व सांगितले,

लसीबाबत असलेले गैरसमज तसेच लसीकरणाचे महत्व व आवश्यकता याची माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाला कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अतुल कळसकर यांच्यासह 50 अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होत्या. प्रशिक्षणासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. दुर्गे यांनी पुढाकार घेतला. याचविषयीचे प्रशिक्षण धारणी आणि भातकुली तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आले. बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिल चव्हाण आणि श्रीमती भस्मे यांनी यासाठी परिश्रम घेतले.

0000

 

सेंद्रीय पोषण परसबाग निर्मिती, व्यवस्थापनाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण

 


सेंद्रीय पोषण परसबाग निर्मिती, व्यवस्थापनाबाबत

ऑनलाईन प्रशिक्षण

अमरावती, दि. 25 : घातखेड कृषि विज्ञान केंद्र, महिला व बालविकास प्रकल्प, अमरावती आणि चांदूरबाजार यांच्यातर्फे सेंद्रीय पद्धतीने पोषण परसबाग निर्मिती आणि व्यवस्थापाबाबत ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. या वेबीनारमध्ये अमरावती आणि चांदूरबाजार तालुक्यातील 60 अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका, आशा कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

घातखेड कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान विशेषतज्‍ज्ञ डॉ. प्रणिता कडू यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. डॉ. कडू यांनी प्रत्येकाची प्रतिकारशक्ती वाढावी, दैनंदिन आहारात विविध सुष्म पोषणद्रव्ये पुरविण्याकरिता घरीच उत्तम प्रतीचा विषमुक्त हिरव्या ताज्या पाले-फळभाज्या पिकवणे गरजेचे झाले आहे. उत्तम आरोग्यासाठी आवश्यक पालेभाज्यातील जीवनसत्वाचे महत्व आणि अभावाने होणारे आजार विशद करून पोषणसमृद्धीचे महत्त्व सांगितले.

शरीराची रोगप्रतिकारशक्ती आणि संरक्षण देण्यासाठी जीवनसत्वांची आवश्यकता असते. मात्र बहुतांश जीवनसत्व शरीरात तयार होत नसल्याने दैनंदिन आहारातून ती घेणे गरजेचे ठरत असल्याने जीवनसत्वाचे स्रोत सांगितले. त्यासाठी परसबागेमध्ये घ्यावयाच्या पालेभाज्या, लागवडीसाठी उपयुक्त जमीन, हवामान, पाण्याची गरज, हंगामानुसार पालेभाज्यांची लागवड, त्यासाठी आवश्यक वाफे, सेंद्रीय खते, किडीवर सेंद्रिय किटकनाशकांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

लोह, कॅल्शियम, जीवनसत्व-अ-क, आवश्यक प्रथिने, जीवनसत्व ब यांच्या अभावामुळे शरीरावर होणारे परिणाम, जीवनसत्वाचे फायदे मिळण्यासाठी पोषणबागेतून नियोजनबद्ध हंगामानुसार महत्वपूर्ण भाज्यांची लागवड केल्यास कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित राहू शकते. त्याकारिता स्रोत असणाऱ्या भाज्या, फळे व दीर्घायू उपयुक्त शेवगा, कडीपत्ता, आवळा, पपई, लिंबू आदी झाडे लागवडीचा आग्रह केला. तसेच औषधीयुक्त झाडे, विड्याची पाने, पुदिना, कृष्ण तुळस, हळद, अद्रक, गवती चहा, कोरफडीचे कोरोनाकाळातील आरोग्यविषयक महत्त्व सांगून परसबागेत लागवड करण्याचे आवाहन केले.

प्रशिक्षणासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. दुर्गे यांनी परिश्रम घेतले.

000000

 

 

 

दहावीच्या विद्यार्थ्यांनी रेखाकला विषयाचे सवलतीच्या गुणांबाबतचे प्रस्ताव 30 जून पर्यंत सादर करावे

 

दहावीच्या विद्यार्थ्यांनी रेखाकला विषयाचे सवलतीच्या

गुणांबाबतचे प्रस्ताव 30 जून पर्यंत सादर करावे

अमरावती, दि. 25 : इयत्ता दहावी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्यात येत आहेत. याबाबतचे प्रस्ताव विद्यार्थ्यांनी शाळेकडे दि. 25 ते 30 जून पर्यंत व शाळांनी विभागीय मंडळाकडे 28 जून ते. 2 जुलै 2021  पर्यंत सादर करावे.

यापूर्वी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शालेय व क्रीडा विभागाने केलेल्या तरतुदीनुसार इयत्ता दहावी परीक्षेमध्ये अतिरिक्त गुणांची सवलत देता येईल. सन 2020-2021 या वर्षी परिक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्यांनी एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण केली आहे, तथापि कोविड-19 च्या परिस्थितीमध्ये त्यांना इटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस बसता न आल्याने ते परीक्षा उत्तीर्ण होवू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांना एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेस मिळालेली श्रेणी इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेकरिता प्रदान करण्यात येईल. या श्रेणीच्या आधारे केवळ शैक्षणिक वर्ष सन 2020-21 मध्ये इ. 10 वी परिक्षेमध्ये अतिरिक्त गुणांची सवलत देण्यात येत असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.

0000

 

पाचवी व आठवीच्या द्वितीय बॅचच्या मूल्यमापनाचा निकाल 28 रोजी

 

पाचवी व आठवीच्या द्वितीय बॅचच्या

मूल्यमापनाचा निकाल 28 रोजी

अमरावती, दि. 25 : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे मार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पुणे, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व लातूर या सात विभागीय मंडळांमार्फत इयत्ता पाचवी (प्राथमिक स्तर) व इयत्ता 8 वी (उच्च प्राथमिक स्तर) मध्ये प्रविष्ठ द्वितीय बॅचच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन दि. 1 ते 10 जानेवारी 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते.

त्या मूल्यमापनाचा ऑनलाईन निकाल (www.msbos.mh-ssc.ac.in) या संकेतस्थळावर दि. 28 जून  रोजी सकाळी 11 वाजता जाहीर करण्यात येत आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांची विषयनिहाय श्रेणी दर्शविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांला त्याच्या माहितीची प्रत (Prinout) घेता येईल. पात्र विद्यार्थ्यांना त्यांनी इयत्ता 5 वी/इयत्ता 8 वी पर्यंतची अर्हता व विद्याविषयक कौशल्य प्राप्त केल्याचे प्रमाणपत्र यथावकाश वितरित करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

0000

 

बुधवार, २३ जून, २०२१

आयटीआय उर्त्तीर्ण युवकांसाठी 25 रोजी रोजगार भरती मेळावा

 

     आयटीआय उर्त्तीर्ण युवकांसाठी

     25 रोजी रोजगार भरती मेळावा

अमरावती, दि.21: जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांच्यावतीने औेद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील एन एस सभागृहात दि. 25 जून रोजी सकाळी 9 वाजता आय टी आय उत्तीर्ण युवकासांठी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले आहे. रोजगार मेळाव्यात सुजूकी मोटर्स गुजरात प्रा.लि.ही कंपनी उमेदवाराची फीटर, डिजेल मॅकॅनिक, वेल्डर, पेन्टर इत्यादी पदासांठी निवड करणार आहे. अठरा ते तेवीस वर्षे वय असलेले, दहावी व आयटीआय उत्तीर्ण युवक या मेळाव्यात सहभागी होऊ शकतील. उमेदवारांनी वर्ष 2016 ते 2020 या कालावधीतील आय. टी. आय. उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी आवश्यक मुळ कागदपत्रे, आधार कार्ड/पॅन कार्डची मुळ प्रत, गुणपत्रिकेसह उपस्थित राहावे, असे संस्थेच्या अंशकालीन प्राचार्या सौ. एम. डी. देशमुख यांनी कळविले आहे.

00000