शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात
माजी विद्यार्थ्यांचा सत्कार व
प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अभिमुखता व प्रेरणा कार्यक्रम संपन्न
अमरावती, दि. 10 : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे नुकताच (दि. 4 नोव्हेंबर) माजी विद्यार्थ्यांचा सत्कार संमारंभ व प्रथम वर्ष विद्यार्थ्यांकरीता अभिमुखता व प्रेरणा (ओरिएन्टेशन व इंडक्शन) कार्यक्रम उत्साहात पार पडला. संस्थेतील यशस्वी माजी विद्यार्थ्यांपैकी संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेली कु. पल्लवी चिंचखेडे यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभात राज्यस्तरीय कृषी क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचे स्टार्टअपचा बहुमान राज्यपाल व उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते प्राप्त करणाऱ्या माजी विद्यार्थी परशुराम आखरे आणि शैक्षणिक तथा सामाजिक उपक्रम राबवून नामांकित पारितोषिक पटकविणारा प्रणव सोनटक्के आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेतील माजी विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय संस्थेचे नावलौकिक झाले आहे. याप्रसंगी संस्थेत प्रथम वर्षांत नविन प्रवेशित विद्यार्थ्यांकरीता ओरिएन्टेशन व इंडक्शन कार्यक्रमही घेण्यात आला.
या कार्यक्रमात सर्व सत्कारमुर्तीनी आपले मनोगत व्यक्त केले. ध्येय प्राप्त करण्यासाठी त्या प्रती प्रखर जिद्द आपल्यामध्ये असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण कु. पल्लवी चिंचखेडे यांनी केले. युवकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन लोकाभिमुख स्टार्टअप सुरु करायला हवे, असे श्री. आखरे यावेळी म्हणाले. स्वत:च्या बळावर परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे. आपल्यासाठी मेहनत घेणाऱ्या आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करायला हव्यात, असे श्री. सोनटक्के यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. महल्ले यांनी संस्थेचा नावलौकिक वाढविण्यास माजी विद्यार्थ्यांचा महत्वपूर्ण वाटा असून, संस्थेतील नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांनी सुध्दा यशस्वी विद्यार्थ्यांप्रमाणे प्रगती करावी, असे आवाहन श्री. महल्ले यांनी केले. महाविद्यालयाच्या प्रवेशासंदर्भात डॉ. डी. ए. झटाले यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ए. एम. महल्ले होते. तसेच प्रमुख पाहूणे म्हणून अल्यूम्नी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, माजी एअर कमांडर प्रमोद वानखडे, संजय कांडलकर. विजय धोटे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला संस्थेतील सर्व विभागप्रमुख, अध्यापकवृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. एम. व्हि. जपे, प्रभारी अधिकारी, विद्यार्थ्यी कल्याण , डॉ. डी. ए. झटाले, प्रथम वर्ष समन्वयक तसेच संस्थेतील अध्यापक व कर्मचारी यांनी प्राचार्य डॉ. ए. एम. महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा