आरोग्य विभागातर्फे आजपासून ‘एड्स नियंत्रण महिना’ उपक्रम
जिल्ह्यात एचआयव्ही संक्रमणदरात घट
आरोग्य विभाग व स्वयंसेवी संस्थांचे सातत्यपूर्ण कार्य
अमरावती, दि. 30 : शासकीय आरोग्य यंत्रणेतर्फे उपलब्ध विनामूल्य औषधोपचार, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने सातत्यपूर्ण जनजागृती व प्रभावी लोकशिक्षण यामुळे गत 15 वर्षांत जिल्ह्यातील एचआयव्ही संक्रमण दरामध्ये घट झाली आहे. यंदा एड्स नियंत्रण सोसायटीतर्फे ‘समानता’ हे घोषवाक्य घेऊन उद्यापासून (दि. 1 डिसेंबर) संपूर्ण जिल्ह्यात जनजागृतीपर ‘जागतिक एड्स नियंत्रण महिना’ साजरा करण्यात येणार आहे.
प्रभावी लोकशिक्षण, उपचार, सुरक्षितता साधनांची उपलब्धता यामुळे संक्रमणदरात घट झाल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी दिली. ते म्हणाले की, 2007-08 मध्ये 10 हजार 812 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 543 व्यक्ती बाधित आढळल्या. हे प्रमाण 5.02 टक्के होते. दरम्यान, तपासणी केंद्रे व तपासण्यांची संख्या वाढविण्यात आली. प्रभावी जनजागृतीमुळे नागरिक तपासण्यांसाठी केंद्रांवर येण्याचे प्रमाण वाढले. 2012-13 मध्ये 43 हजार 337 व्यक्तींच्या तपासणीत 741 व्यक्ती बाधित आढळल्या. हे प्रमाण 1.71 टक्के होते. 2017-18 मध्ये एक लाख 30 हजार 255 व्यक्तींच्या तपासणीत 388 व्यक्ती बाधित आढळल्या. हे प्रमाण 0.30 टक्के होते. 2021-22 मधील एक लाख 36 हजार 189 तपासण्यांमध्ये 246 व्यक्ती बाधित आढळल्या. हे प्रमाण 0.18 टक्के इतके आहे.
शासकीय रूग्णालयांत विनामूल्य उपचार
एचआयव्ही नियंत्रण व उपचारासाठी अमरावती जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, एक वैद्यकीय महाविद्यालय, चार उपजिल्हा रुग्णालये, नऊ ग्रामीण रुग्णालये, 60 प्राथमिक आरोग्य केंद्रे, एक क्षयरोग उपचार रुग्णालय, 59 खाजगी रुग्णालये, दोन गुप्तरोग केंद्रे, एक शासकीय रक्तपेढी, चार खाजगी रक्तपेढी एवढी यंत्रणा काम करते. या सर्व ठिकाणी एड्सविषयी माहिती व एचआयव्ही तपासणीच्या विनामूल्य सुविधा पुरविल्या जातात. मोफत उपचारासाठी शासकीय, उपजिल्हा, ग्रामीण रूग्णालयांत एआरटी केंद्रे सुरू आहेत.
संक्रमितांना एआरटी केंद्र येथे पोहोचवून आवश्यक तपासण्या, सीडी-फोर तपासणी व विनामूल्य उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण 51 हजार 467 गर्भवती मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सहा गर्भवती मातांना एआयव्हीची लागण झाल्याचे आढळले. त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. एप्रिल ते ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात एकूण 17 एचआयव्ही संक्रमित गरोदर मातांची शासकीय रुग्णालयात यशस्वी प्रसूती करण्यात आली. बाळाच्या सुरक्षिततेसाठी नेविरेपिन औषध देण्यात आले. ग्रामीण व शहरी क्षयरोग विभागाच्या सहकार्याने प्रत्येक क्षयरूग्णाची एचआयव्ही तपासणी करण्यात येऊन तसे आढळल्यास त्यांना आवश्यक औषधोपचार दिले जातात.
स्वयंसेवी संस्थांची भक्कम साथ
शासकीय आरोग्य यंत्रणेच्या या कार्याला स्वयंसेवी संस्थांचीही भक्कम साथ लाभली आहे. जिल्ह्यात स्थलांतरित कामगारांसाठी भाग्योदय बहुद्देशीय संस्था कार्य करत आहे. मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण व आरोग्य प्रसारक मंडळ संस्था गावपातळीवर लिंक वर्कर कार्यक्रमात 100 गावांसाठी तपासणी व समुपदेशन करत आहे. देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांमध्ये एचआयव्हीच्या प्रसाराची माहिती देऊन जागृती व तपासणी करून घेण्यास प्रोत्साहित करण्याचे कार्यही ही संस्था करत आहे. त्याचबरोबर, संत सत्यदेवबाबा महिला मंडळ संस्था ही संस्थाही या कार्यात अग्रेसर आहे. आधार संस्थेच्या वतीने संक्रमित बांधवांना सामाजिक, मानसिक व आर्थिक साह्य मिळण्यासाठी विविध शासकीय योजना व सेवासुविधा पोहोचविण्याचे कार्य केले जाते. श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे ट्रकचालक, क्लीनर बांधवांमध्ये माहिती देऊन जागृती व तपासणी करून घेण्यास प्रोत्साहित करण्याचे कार्य होत आहे. समर्पण संस्थेतर्फे तृतीयपंथी व्यक्तींसाठी कार्य होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाच्या संयुक्त विद्यमाने विविध महाविद्यालयांत 78 रेड रिबन क्लब काम करतात. त्यात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, रॅली, पथनाट्य, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, एड्स स्लोगन (घोषवाक्य)स्पर्धा आयोजित केल्या जातात.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
‘समानता’ हे घोषवाक्य घेऊन एड्स नियंत्रण सोसायटीतर्फे संपूर्ण जिल्ह्यात जनजागृतीपर ‘जागतिक एड्स नियंत्रण महिना’ साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त दि. एक डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयापासून जनजागृती रॅली काढण्यात येईल. त्याचप्रमाणे, दि. तीन डिसेंबर रोजी पब्लिक फोरम कार्यक्रमात आरोग्य कर्मचारी व नागरिकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम होईल. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी कार्यक्रम, पथनाट्य, पोस्टर आदी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत, असे
जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे यांनी सांगितले.
०००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा