शेतकरी आत्महत्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे
विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांचे जिल्हा प्रशासनाला आदेश
अमरावती, दि. 23 : अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात 17 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यानुषंगाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत व दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने त्याबाबतचा विस्तृत अहवाल तीन आठवड्याच्या आत सादर करण्याचे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षा तथा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी दिले.
22 ऑगस्ट 2023 ला ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ या वर्तमानपत्रासह विविध वृत्तपत्रातून ‘यवतमाळ जिल्ह्यात 17 दिवसांत 17 शेतकऱ्यांची आत्महत्या’ या शिर्षकाच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. याची गंभीर दखल घेत विभागीय आयुक्तांनी यवतमाळ जिल्हाधिकारी पंकज आशिया व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांची तातडीची बैठक घेऊन केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.
यावेळी विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्हा प्रशासनाने आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या घरी जाऊन कुटंबातील सदस्यांची सांत्वनपर भेट घेतली असल्याचे जिल्हाधिकारी श्री. आशिया यांनी सांगितले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तात्काळ मदत देण्यासाठी समिती गठीत करण्यात आली असून गुरुवारी (ता. 24ऑगस्ट) बैठक होईल. राज्य शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या योजनेंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत देण्यात येईल. तसेच स्वयंसेवी संस्थांकडूनही मदत उपलब्ध करुन दिल्या जाईल. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात येईल. तसेच वृत्तपत्रातून प्रसिध्द झालेल्या बातमीचा अहवालही विभागीय आयुक्तांना लवकर सादर करण्यात येणार, अशी माहिती श्री. आशिया यांनी यावेळी दिली.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा