सोमवार, १८ नोव्हेंबर, २०२४

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपुर्ती योजनेंतर्गत अर्ज स्विकारण्याबाबत सूचना.

 मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपुर्ती योजनेंतर्गत अर्ज स्विकारण्याबाबत सूचना.

          अमरावती, दि. 18 :राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाची शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपुर्ती योजना सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाईनरित्या अंमलबजावणी करण्यात येत आहे.

            तथापि, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सन 2018-19 ते 2023-24 या वर्षात ज्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अडचणी निर्माण झाल्या अशा अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्यशासनाने भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाची शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती ऑफलाईन पद्धतीने मंजूर करून अदा करण्यास मान्यता दिलेली आहे. त्याकरिता शासन निर्णयामध्ये विहित कार्यपद्धती अवलंबविण्यात आलेली आहे.यानुषंगाने योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी व महाविद्यालय यांनी संबंधित जिल्हयांचे सहायक, आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे.विविध स्तरावर ऑफलाईन अर्ज स्विकारण्याकरिता खालीलप्रमाणे वेळापत्रक दिलेले आहे.

            उपरोक्त योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे दि.30 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावे.तसेच संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी अर्जाची तपासणी करून आवश्यक कागदपत्रांसह 31 जानेवारी 2025 पर्यंत अन्वेषण प्रस्ताव सादर करावे.

            सन 2018-19 ते 2023-24 पर्यंत महाडीबीटी प्रणालीमार्फत वरील योजना राबविण्यात येत असल्यातरी पोर्टलद्वारे अर्ज करतांना येणाऱ्या विविध अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे विहित मुदतीत अर्ज भरूनही अर्ज महाडीबीटी एडमिन कडून अर्ज ऑटो रिजेक्ट होणे, अर्जाची आधार नोंदणी न करता अर्ज भरणे, एखाद्या वर्षी विद्यार्थ्यांच्या नियमित परीक्षा अथवा पुरवणी परीक्षेचा निकाल विहीत वेळेत न लागल्यामुळे अर्ज भरता न येणे अथवा अर्ज भरूनही पुढच्या वर्षीचा अर्ज नुतनीकरण करण्यास अडचण येणे अशा बऱ्याच अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच राज्य शासनाची शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपुर्ती योजनेचा लाभ देता येत नाही.

            तेव्हा, सन 2018-19 ते 2023-24 या कालावधीतील भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतीपूर्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी प्रणालीवर नोंदणीकृत असलेल्या अर्जाचे ऑफलाईन प्रस्ताव विहित नमुन्यात उपरोक्त दिलेल्या मुदतीत संबंधित सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करण्याचे आवाहन, अमरावती विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, (समाज कल्याण) सुनिल वारे, विभागातील संबंधित सर्व विद्यार्थी व महाविद्यालयांचे प्राचार्य यांना केले आहे.

०००००

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा