शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४

शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम पिक स्पर्धा सहभागी होण्यासाठी कृषि विभागाचे आवाहन

 

शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम पिक स्पर्धा

सहभागी होण्यासाठी कृषि विभागाचे आवाहन

        अमरावती,दि. 28: पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात. या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी येत्या हंगामात रब्बी हंगाम पिक स्पर्धा घेण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

शेतीची उत्पादकता वाढावी, यासाठी शेतकरी विविध प्रयोग करतात, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांना गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढते. ते अधिक उमेदीने नवनवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास पुढे येतात. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच परिसरातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक होवून जिल्ह्याच्या उत्पादनात भर पडेल, यासाठी कृषि विभागातर्फे पिक स्पर्धा घेण्यात येत आहे.

            पिक स्पर्धेतील जिल्ह्याकरिता रब्बी हंगामातील स्पर्धेसाठी ज्वारी, गहू,हरभरा,करडई व जवस पिके समाविष्ट करण्यात आली आहेत. स्पर्धेत सहभागी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर जमीन असणे आणि ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. तसेच एकावेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. लाभार्थीचे शेतामध्ये त्या पिकाखालील किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पिकस्पर्धेसाठी प्राप्त झालेले सर्व अर्ज स्पर्धेकरिता पात्र राहतील. पिक स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शेतकऱ्याला पुढील पाच वर्षे त्याच पिकाकरीता पिक स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

सर्वसाधारण गटासाठी प्रवेश शुल्क पिकनिहाय प्रत्येकी 300 रुपये, तर आदिवासी गटासाठी 150 रूपये राहणार आहे.ज्वारी,गहू,हरभरा,करडई व जवस या पिकासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम दि. 31 डिसेंबर 2024 आहे.

पिकस्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासह प्रवेश शुल्क चलन, सातबारा, आठ अ चा उतारा आणि अनुसूचित जमातीचा असल्यास जात प्रमाणपत्र संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्या पिकाची पिकस्पर्धा संबधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील.

            तालुका पातळीस्तरावर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले पाच हजार रूपये, दुसरे तीन हजार रूपये, तिसरे दोन हजार रूपये बक्षीस देण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले 10 हजार रूपये, दुसरे सात हजार रुपये, तिसरे पाच हजार रूपये बक्षीस असणार आहे. राज्य पातळीवर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले 50 हजार  रुपये, दुसरे 40 हजार रुपये, तिसरे 30 हजार रुपये बक्षीस असणार आहे.

            पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा,तसेच पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ होण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा,असे आवाहन कृषी आयुक्तालय पुणेचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण ) रफिक नाईकवाडी यांनी केले आहे.

०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा