शुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०२४

कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

             अमरावती, दि.7:  भारत निवडणूक आयोगाने दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाव्दारे महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी राज्य शासनाने अधिसूचनेद्वारे मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील सर्व कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी, असे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निर्गमित केले आहे.

 

            उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या 24 ऑक्टोबर रोजीच्या शासन निर्णयानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात ही सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने यांना लागू राहील. खासगी कंपन्या, सर्व दुकाने, निवासी हॉटेल्स, उपाहारगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, रिटेलर्स, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, व्यापार, औद्योगिक उपक्रम आदींचा त्यात समावेश आहे.  अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट्टीऐवजी कमीत कमी दोन ते तीन तासाची सवलत देता येईल. मात्र, त्यासाठी आस्थापना किंवा कारखाना मालकाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. मतदानासाठी सुट्टी किंवा पूर्वपरवानगीने सवलत न दिल्यास आस्थापना धारकाविरूद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

                                          

00000

  


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा