गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०२५
इयत्ता दहावी परीक्षेच्या आवेदनपत्र सादरीकरणास मंडळाकडून मुदतवाढ अंतिम मुदत १८ नोव्हेंबर ऑनलाईन आवेदनपत्र www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध
अमरावती, दि. १३ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) फेब्रु-मार्च २०२६ परीक्षेसाठी आवेदनपत्र सादर करण्याच्या तारखांमध्ये विलंब शुल्कासह १८ नोव्हेंबर पर्यंत राज्य मंडळातर्फे प्रसिध्दी पत्रकाद्वारे असे कळविण्यात आले आहे. मंडळाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, विद्यार्थ्यांना तसेच शाळांना आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक आठवड्याची अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मंडळामार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इ.१० वीच्या परीक्षेसाठी नियमित, पुनर्परिक्षार्थी, तसेच खाजगी विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्रे भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाणार आहे. यावर्षीही विद्यार्थ्यांनी आपल्या शाळामार्फत किंवा मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत.
ऑनलाईन अर्ज सादरीकरणाची प्रक्रिया
नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे शाळामार्फत UDISE + प्रणालीतील PEN-ID वरून भरली जाणार आहेत. प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी अर्ज भरताना विद्यार्थ्यांची माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून पाहणे बंधनकारक आहे. त्यानंतर प्रिंट काढून विद्यार्थ्यांकडून स्वाक्षरी घेतल्यानंतर मुख्याध्यापकांनी शिक्क्यासह प्रमाणीकरण करायचे आहे. पुनर्परिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत तसेच ITI (Transfer of Credit) घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे मात्र www.mahahsscboard.in या मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन भरायची आहेत.
महत्त्वाच्या तारखा
मंडळाने दिलेल्या नव्या मुदतीनुसार, विलंब शुल्कासह आवेदनपत्र सादरीकरणाचा कालावधी ११ नोव्हेंबर २०२५ पासून १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ठेवण्यात आला आहे. विलंब शुल्काने आवेदनपत्र भरलेल्या विद्यार्थ्यांचे RTGS/NEFT द्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी ११ ते १८ नोव्हेंबर पर्यंत सुरू राहील, तसेच माध्यमिक शाळांनी RTGS/NEFT ची पावती / चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रिलिस्ट १९ नोव्हेंबर २०२५ पर्यंत या कालावधीत विभागीय मंडळाकडे सादर कराव्या लागतील.
शाळांसाठी महत्त्वाच्या सूचना
मंडळाने सर्व माध्यमिक शाळांना निर्देश दिले आहेत की आवेदनपत्रे भरण्यापूर्वी त्यांच्या School Profile मध्ये शाळा, संस्था, विषय आणि शिक्षक यासंबंधीची सर्व माहिती अद्ययावत करून ठेवणे आवश्यक आहे. तसेच, ऑनलाईन चलनावर नमूद केलेल्या ICICI बँकच्या Virtual Account मध्येच RTGS किंवा NEFT द्वारे अचूक शुल्क रक्कम भरावी. मंडळाने स्पष्ट केले आहे की कोणत्याही परिस्थितीत रोख स्वरूपात शुल्क स्वीकारले जाणार नाही. ऑनलाईन शुल्क भरल्यानंतर अर्जाच्या Payment Status मध्ये “Not Paid” ते “Paid” आणि Application Status मध्ये “Draft” ते “Send to Board” असा बदल झाल्यासच मंडळाकडून अर्ज स्वीकृत झालेला मानला जाईल.
विद्यार्थ्यांनी घ्यायची काळजी
सर्व विद्यार्थ्यांनी आपली वैयक्तिक माहिती, नाव, विषय, जन्मतारीख आदी तपशील Pre-List मधून नीट पडताळून पहावेत. कोणत्याही चुका झाल्यास शाळा स्तरावरच त्या दुरुस्त करून नंतर अंतिम सादरीकरण करावे. परीक्षा शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र (Hall Ticket) देण्यात येणार नाही, असा स्पष्ट इशारा मंडळाने दिला आहे.
पुढील मुदतवाढ मिळणार नाही
मंडळाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की विलंब शुल्कासह आवेदनपत्र सादरीकरणासाठी दिलेली ही अंतिम मुदत असून, यानंतर कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी आणि शाळांनी ही प्रक्रिया ठरलेल्या वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा