मंगळवार, २० जानेवारी, २०२६
विशेष लेख: श्री गुरु तेग बहादुर साहिब जी- 'हिंद दी चादर'
विशेष लेख:
श्री गुरु तेग बहादुर साहिब जी- 'हिंद दी चादर' श्री गुरु तेग बहादुर (एप्रिल 1621
नोव्हेंबर 1675) हे शीख धर्माचे नववे गुरु होते. त्यांचा जन्म अमृतसर (पंजाब) येथे
झाला. श्री गुरू तेग बहादुर यांनी आपल्या आयुष्यात अन्याय, धार्मिक असहिष्णुता आणि
अत्याचाराविरोधात लढा दिला. म्हणूनच त्यांना 'हिंद दी चादर' या नावाने गौरविले जात.
धर्म, मानवता, आदर्श आणि तत्त्वांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती
देणाऱ्यांमध्ये गुरु तेग बहादुर यांचे स्थान जागतिक इतिहासात अद्वितीय आहे. श्री
गुरु तेग बहादुर हे जगभर प्रभाव टाकणारे महान गुरु मानले जातात. त्यांच्या शहिदी
समागमाचा इतिहास सर्वदूर पोहोचावा यासाठी गुरू तेग बहादुर यांच्या 350 व्या शहिदी
समागमानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभाग व श्री गुरूतेग बहादुर
साहिबजी 350 शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने राज्यभर विविध प्रबोधनात्मक
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. 01 एप्रिल 1621 रोजी, अमृतसर येथे श्री गुरू
गुरू तेग बहादूर यांचा जन्म वडील गुरु हरगोबिंद आणि माता नानकी देवी यांच्या
कुटुंबात झाला. 1664 मध्ये त्यांना गुरू ही पदवी प्राप्त झाली तर त्यांचे पुत्र
गुरू गोविंदसिंह यांनाही गुरु पदवी प्राप्त झाली होती. गुरु तेग बहादूर यांचे मूळ
नाव ‘त्यागमल’ होते. बालपणी एका युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले त्यावेळी
त्यांच्या वडिलांनी त्यांना ‘तेग बहादूर’ म्हणजेच ‘तलवारीसारखा धैर्यवान’ हे नाव
दिले. ते अतिशय शांत, ध्यानशील आणि संयमी स्वभावाचे होते. त्यांनी मोठे भाग्य,
संपत्ती, मान नाकारत आनंदपूर साहिब येथे ध्यान आणि सेवा यांमध्ये आयुष्य व्यतीत
केले. धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात लढा देत असताना त्यांना दिल्लीतील
चांदणी चौकातील तुरूंगात ठेवण्यात आले होते. तेथे त्यांनी ध्यान करत, ईश्वराचे
स्मरण करण्यास प्राधान्य दिले. मानवधिकारांच्या सुरक्षेसाठी काम करीत असताना गुरू
तेग बहादुर शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, करूणा आणि धैर्य या मुल्यांचा
संदेश दिला. त्यांची अनेक भक्तिगीते गुरू ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. त्यांनी
आनंदपूर साहिब हे पवित्र स्थळ स्थापन केले. जे आजही शीख धर्मातील अत्यंत महत्वाचे
तीर्थस्थान मानले जाते. त्यांच्या बलिदानामुळे ते धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक
बनले होते. त्यांच्या स्मरणार्थ त्यांची जयंती देशभरात श्रद्धेने साजरी केली जाते.
केंद्र शासनाने 2022 मध्ये त्यांची 400 वी जयंती देशभर साजरी केली होती. त्यांनी
देशाला साधे आणि गहन तत्वज्ञान दिले व सुमारे 57 शबद (भक्तिगीते) आणि 57 सलोक
(उपदेशपर पदे) रचले. या रचनांमध्ये वैराग्य, सत्य, मृत्यूचे चिंतन, आत्मज्ञान आणि
परमेश्वरावर श्रद्धा या भावना प्रबळ आहेत. त्यांच्या सर्व रचना गुरु ग्रंथ
साहिबच्या शेवटच्या भागात आहेत. 'जो नर दुःख में दुःख नहीं मानें, सुख सनेहु अरू भय
नहीं जा कै, कांचन माटी मानै, लोभ मोह अभिमान न ता कै, हरख सोग नहीं जा कै जो नर
दुःख में दुःख नहीं मानै' म्हणजेच जो मनुष्य दुःखात असला तरी दुःखी होत नाही, जो
सुखात असला तरी अहंकार करत नाही, ज्याच्यासाठी सोने आणि माती समान आहेत, जो लोभ,
मोह, अभिमान, आनंद आणि शोक यांपासून मुक्त आहे तोच खरा ज्ञानी आहे. अशा अनेक
भावपूर्ण आणि मानवी जीवनाचा सार सांगणाऱ्या रचना त्यांनी केल्या आहेत. श्री गुरु
तेग बहादुर साहिब यांचे जीवन निर्भयता, धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेसाठी
केलेल्या त्यागाचे प्रतीक आहे. हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या
साहिबजीच्या शहिदीला 350 वर्षे पूर्ण होत झाल्यानिमित्त महाराष्ट्र शासन आणि श्री
गुरू तेग बहादुर साहिबजी 350 शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने राज्यात
विविध ठिकाणी भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. नुकतेच 7 डिसेंबर
2025 रोजी नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उत्तर प्रदेशचे
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध धार्मिक व सामाजिक
संघटनांसह श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांना आदरांजली अर्पण करण्यात येऊन
सामाजिक, प्रबोधनात्मक व जागृतीपर कार्यक्रम संपन्न झालेत. याप्रसंगी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहेब यांच्या
350 व्या शहिदी समागमनिमित्त संकेतस्थळाचे आणि गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाचा
इतिहास सांगणाऱ्या गीताचे लोकार्पण झाले. नांदेड येथे मुख्य कार्यक्रम ‘हिंदी दी
चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त येत्या 24 व
25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथील मोदी मैदानावर आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय
गृह तथा सहकार मंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख
उपस्थिती राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्री श्री. शहा 25 जानेवारीला या
कार्यक्रमाकरिता उपस्थित राहून श्री गुरु तेग बहादुर यांच्या पावन स्मृतींना
अभिवादन करतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल,
सिंधी या सहा समाजातील देशभरातील सर्व संत, महंत, सामाजिक कार्यकर्ते, गणमान्य
व्यक्ती, समाजबांधव एकत्र येऊन श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या पावन स्मृतींना
नमन करुन त्यांचा धर्मरक्षण, सहिष्णुता आणि एकात्मतेचा-मानवतेचा संदेश सर्वदूर
पोहोचविणार आहे. या शहिदी समागम कार्यक्रमातून हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर
साहिबजी यांच्या कर्तृत्व आणि विचारांचा परिचय जनतेला होणार आहे. -संकलन: विभागीय
माहिती कार्यालय, अमरावती 00000
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा