सोमवार, ९ जून, २०२५

छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला शुभारंभ

मुंबई, दि. ९ - भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत आज पासून सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव रेल्वेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि स्वातंत्र्य इतिहास जिवंत ठेवण्याचे काम या रेल्वेच्या माध्यमातून होणार आहे. आज या रेल्वेतून सातशे पेक्षा जात प्रवासी प्रवास करत आहेत. यातील ८० टक्के प्रवासी हे चाळीस वर्षाच्या आतील आहेत. जे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाहण्यासाठी जात आहेत. राज्यातील सर्व भागातून आलेल्या सर्व प्रवाशांना या सर्किट रेल्वेच्या माध्यमातून इतिहास अनुभवण्याची संधी मिळणार आहे. शिवराज्याभिषेकास ३५१ वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या या दिवशी ही रेल्वे सुरू होत असल्याचा आनंद आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मोगल, परकीय आक्रमकांना पराभूत करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुढे हे स्वराज्य अटकेपर्यंत विस्तारले. ही गौरव यात्रेचा आजचा मुक्काम रायगड येथे असणार आहे. तसेच या यात्रेत शिवनेरी, लालमहाल, पुण्याची शिवसृष्टी अशा महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देणार आहे. तर कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन ही होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबतच राज्याचे संस्कृती कार्य मंत्री आशिष शेलार आणि त्यांचा विभाग, पर्यटन विभाग यांचे अभिनंदन करतो. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रवाशांना शुभेच्छा दिल्या. तसेच या पहिल्याच सर्किट यात्रेत प्रवास करत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक विभागाचे सचिव विकास खारगे, पर्यटन प्रधान सचिव अतुल पाटणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज कुमार सूर्यवंशी, भारतीय रेल्वेचे जनरल मॅनेजर धर्मवीर मीना, आय आर सी टी सी चे राहुल हिमालियन, महाराष्ट्र पर्यटन विभागाचे विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, वरिष्ठ व्यवस्थापक संजय ढेकणे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी, प्रवासी उपस्थित होते. रेल्वे मधुन प्रवास करणाऱ्या पर्यटकांचे रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांचे कडून पारंपरिक ढोल-ताशा यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. पर्यटकांना पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. पर्यटकांना महाराष्ट्र राज्यातील पर्यटनाच्या दृष्टीने तयार करण्यात आलेली माहिती पत्रके वाटून माहीती देण्यात आली. एकूणच उत्साही वातावरणात पर्यटकांना या प्रवासासाठी रवाना करण्यात आले. या ५ दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम आयोजित केले आहेत. भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाशी समन्वय साधून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे या गौरवशाली ट्रेनचे हे आगमन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे भव्य दर्शन घडवणारे ठरेल.भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहीती पर्यटकांना देण्यात येणार आहे. सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी आयरसीटीसी च्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. 5 दिवसांच्या या प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते महाराजांच्या गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता येईल सहल तपशील – पाच दिवसांची ही यात्रा पुढील ठिकाणांना भेट देणार आहे. रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती. लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले. कसबा गणपती व शिवसृष्टी, पुणे – पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय. शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ. भीमाशंकर ज्योतिर्लिंग – 12 ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ. प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण. कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.

शुक्रवार, ६ जून, २०२५

आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माध्यमांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावी - अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने जनसंपर्क अधिकारी यांची बैठक

मुंबई, दि. ६ : आपत्तीच्या काळात जनतेपर्यंत वस्तुनिष्ठ व खरी माहिती पोहचणे अधिक गरजेचे असते. यासाठी आपत्ती काळात घडणाऱ्या सर्व घटना, आपत्ती व्यवस्थापन व मदत कार्याची वस्तुनिष्ठ माहिती संबंधित यंत्रणांकडून घेऊन प्रसारमाध्यमांद्वारे माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविण्याची जनसंपर्क अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी असते. आपत्तीच्या काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अधिक सतर्क राहून प्रसार माध्यमांना वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे आवाहन मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी केले. यंदाच्या पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने मुंबईतील सर्व यंत्रणा व विभागांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, संचालक (वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे यांच्यासह विविध विभागाचे जनसंपर्क अधिकारी उपस्थित होते. अपर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर म्हणाले, नैसर्गिक आपत्ती संदर्भात कोणतीही अचूक पूर्वसूचना मिळत नसते. अशा वेळी यंत्रणांमध्ये, विभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. आपत्तीपूर्व तयारी, तातडीचा प्रतिसाद आणि समन्वय महत्त्वाच्या असून या काळात माहितीचा अचूक प्रसार आणि जनतेपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचविणे गरजेचे असते. जनसंपर्क अधिकाऱ्यांनी आपत्ती संदर्भातील माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची खातरजमा करूनच प्रसारित केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी समन्वय, संवाद आणि संवेदनशीलतेवर भर द्यावा - हेमराज बागुल आपत्कालीन परिस्थितीत समन्वय, संवाद आणि संवेदनशीलता यावर भर द्यावा असे सांगून संचालक (प्रशासन) हेमराज बागुल म्हणाले, आपत्ती काळात जनसंपर्क अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ माहिती देण्याबरोबरच जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा. चुकीची माहिती आणि विसंवाद शासनाची प्रतिमा मलीन करू शकते. त्यामुळे संस्थांची प्रतिमा जपण्यास प्राधान्य द्यावे, असेही श्री. बागुल म्हणाले. अफवांचे खंडन करण्यास प्राधान्य द्यावे – डॉ. गणेश मुळे आपत्तीच्या वेळी प्रशासनाच्या प्रत्यक्ष कृती आणि मदतकार्याची वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या कामाबरोबरच आपत्ती काळात पसरवल्या जाणाऱ्या अफवांचे खंडन करण्यास जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे, असे संचालक ( वृत्त व जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे यांनी सांगितले. श्री.मुळे म्हणाले, आपत्ती परिस्थितीत स्थानिक, राज्य व केंद्रीय यंत्रणा तत्काळ मदत कार्यात सहभागी होतात. या यंत्रणांकडून वस्तुनिष्ठ माहिती घेवून ती समाजमाध्यमे, वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी व रेडिओ यांसारख्या माध्यमांच्या सहाय्याने जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पार पाडावी. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करून त्यांना मदतीच्या उपाययोजनांची माहिती देणे, आणि आवश्यक सूचना पोहचवणे हे जनसंपर्क अधिकाऱ्यांचे महत्वाचे काम असल्याचे सांगून डॉ. मुळे म्हणाले जनसंपर्क अधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहण्यासाठी आणि माहितीच्या आदान- प्रदानासाठी प्रत्येक विभागाने स्वतःचा व्हॉटसॲप ग्रुप तयार करावा, ज्यामध्ये समन्वय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असावा. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व समाज माध्यमांना तत्काळ माहिती देण्यात यावी. आपल्या कार्यक्षेत्रात अचानक धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास त्याची माहिती तत्काळ समाजमाध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवावी, आपत्ती व्यवस्थापन पुस्तिका दरवर्षी अद्ययावत माहितीसह असावी, विशेषतः महत्त्वाचे हेल्पलाइन नंबर आणि यंत्रणांचे संपर्क तपशील याचा त्यामध्ये समावेश असावा असेही श्री.मुळे म्हणाले. यावेळी उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त अजय साबळे, मुंबई दूरदर्शनच्या उपसंचालक संगीता गोडबोले, ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, आकाशवाणीचे सहायक संचालक डॉ.संतोष जाधव, सहायक संचालक (माहिती) इर्शाद बागवान यांनीही विविध सूचना मांडल्या.

बकरी ईद निमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ६ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ईद अल - अधा (बकरी ईद) निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद मुबारक! ईद अल - अधा (बकरी ईद) हा सण त्याग, करुणा व परोपकाराचा संदेश देतो. हा सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती, सौहार्द व समृद्धी घेऊन येवो या मंगल कामनेसह सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद अल अधाच्या शुभेच्छा देतो, असे राज्यपाल राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांची मुलाखत

मुंबई, दि. ६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, स्वाती पांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करित आहे. यामध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना दळणवळणाची पुरेशी सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादी बाबींवर प्रामुख्याने भर देण्यात येत आहे. याच दृष्टीकोनातून विमान वाहतुकीवर लक्ष केंद्रित करण्यात येत असून ग्रामीण उत्पादकांना आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला शहरी बाजारपेठेशी जोडणे, समन्वय साधणे यासाठी शासनस्तरावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) मार्फत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याअनुषंगानेच नागरी आणि खासगी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, हरित आणि स्मार्ट विमानतळ विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक पावले उचलण्यात आली आहेत. याविषयी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात श्रीमती पांडे यांनी माहिती दिली आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. १० जून २०२५ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री ८.०० वा. प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर खाली दिलेल्या लिंकवरून ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे. एक्स- https://twitter.com/MahaDGIPR, फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR, यू ट्यूब - https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR,

समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार;हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इगतपुरी येथे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण संपन्न

नाशिक, दि. ५ : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम (सा. उ.) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार नितीन पवार, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन करण्यात आले आहे. या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्हे जेएनपीटी बंदराशी जोडले गेले आहेत, आता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडला जाईल. ७०१ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी ५५ हजार ३३५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. समृद्धी महामार्गाचा ७६ किलोमीटर मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो. या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून अतिशय खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे अभियांत्रिकी आव्हान पेलले. यातील इगतपुरी जवळील बोगदा हा ८ किलोमीटर लांबीचा असून तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे. समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गामुळे एक हजार शेततळी तयार झाली आहेत. याबरोबरच दर ५०० मीटर अंतरावर जलपुनर्भरण व्यवस्था करण्यात आली आहे. या महामार्गालगत सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी ३५ मेगावॉट प्रकल्पाचे काम सुरू आहे. महामार्गालगत गेल कंपनीतर्फे गॅस वाहिनी टाकण्यात आली आहे. या माध्यमातून नव्याने विकसित होणाऱ्या स्टीलसिटी गडचिरोली पर्यंत गॅस पोहोचविता येईल. तसेच धार्मिक आणि पर्यटन स्थळे या मार्गामुळे जोडली आहेत. वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. महामार्ग अपघात मुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या महामार्गामुळे वन्यजीवांच्या संचारत अडथळे येऊ नयेत म्हणून १०० प्रकारच्या संरचना तयार करण्यात आल्या आहेत. देशात अशा प्रकारची रचना प्रथमच साकारण्यात आली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा संचार विना व्यत्यय सुरू आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आगामी काळात शक्तिपीठ महामार्ग साकारण्यात येणार आहे. या महामार्गामुळे मराठवाड्यातील आर्थिक चित्र बदलण्यास मदत होईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गामुळे वेळ, प्रदूषण आणि इंधनाची बचत होणार आहे. या महामार्गामुळे कृषी, पर्यटन विकास, औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. पर्यावरण पूरक असा महामार्ग राज्याच्या विकासात गेम चेंजर ठरेल. तसेच नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागासाठी लाभदायक ठरेल, त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग उपयुक्त ठरेल. या महामार्गावर प्रवाशांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. वाहन चालवतांना चालकांनी वेग मर्यादेचे पालन करावे, असेही आवाहन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पर्यावरण संवर्धनासाठी यंदा १० कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या महामार्गानंतर आता राज्यातील अन्य प्रकल्पांनाही गती देण्यात येईल, असे सांगत त्यांनी या प्रकल्पासाठी परिश्रम घेणारे अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कौतुक केले. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. तत्पूर्वी. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्यासह मान्यवरांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वाहनाचे सारथ्य केले.

पी. एम. सुर्यघर मुक्त बिजली योजना ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ योजनेंतर्गत प्रस्ताव आमंत्रित · 16 जून अंतीम मूदत

अमरावती, दि. 5 : पी. एम. सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ या घटकाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनाने ९ ऑगस्ट २०२४ रोजी ज्ञापन प्रसिध्द केले आहे. त्यानुसार राज्यात सदर योजना राबविण्याकरीता महाऊर्जा व महावितरणमार्फत प्रत्येक जिल्ह्यात एक गाव राज्यात २४ गावे महावितरण व १२ गावे महाऊर्जामार्फत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ म्हणून विकसित याअनुषंगाने अमरावती विभागातील पाच जिल्ह्यापैकी अमरावती जिल्ह्यातील एक गाव महाऊर्जामार्फत विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी अमरावती जिल्ह्यातील पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. अशी माहिती महाऊर्जाचे अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रफुल तायडे यांनी दिली आहे. पी. एम. सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत मॉडेल सोलर व्हिलेज या योजनेच्या संर्वांगीण व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती (DLC) दि.२९ मे रोजी गठीत करण्यात आली असून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जिल्हा नियोजन अधिकारी, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत हे या समितीचे सदस्य असून विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा हे या समितीचे सदस्य सचिव आहे. मॉडेल सोलर व्हिलेज निवडीबाबत पुढीलप्रमाणे निकष केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय मंत्रालयाव्दारे निश्चित करण्यात आले आहे. १) जिल्ह्यातील निवड केलेले गाव हे महसूल गाव असावे व त्याची लोकसंख्या जनगणनेनुसार किमान ५ हजारापेक्षा जास्त असावी. २) स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या गावांमध्ये स्पर्धेच्या कालावधी दरम्यान जास्तीत जास्त विविध अपारंपारिक ऊर्जा साधने/सौर उपकरणे आस्थापित करणे गरजेचे आहे. सौर उपकरणांमध्ये पी.एम. सुर्यघर योजनेंतर्गत जास्तीत जास्त घरांवर सोलर रुफ टॉप प्रकल्प उभारणी करणे तसेच पी.एम. कुसुम योजनेंतर्गत जास्तीत जास्त सौर पंप अथवा इतर विकेंद्रीत अपारंपारिक ऊर्जा प्रकल्प आस्थापित करणे गरजेचे आहे. व या अनुषंगाने या सर्व अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांची क्षमता १० मेगा वॅट पर्यंत असणे अपेक्षित आहे. ३) याकरीता सी.एस.आर.निधी, विभागाचा निधी किंवा जिल्हास्तरीय निधी व इतर उपलब्ध असलेल्या निधीचा वापर करता येईल. ४) अग्रणी बँकेमार्फत वैयक्तिक लाभार्थ्याला सौर प्रकल्प उभारणीकरीता बँकेच्या पात्रता निकषानुसार कर्ज उपलब्ध होऊ शकेल. ५) स्पर्धेतील विजेत्या गावाचा सविस्तर प्रकल्प अहवाल महाऊर्जातर्फे तयार करण्यात येईल व प्राप्त होणाऱ्या एक कोटी ऐवढ्या केंद्रीय वित्त सहाय्यामधून गावाला पुढीलप्रमाणे गावातील कामे करता येईल गावासाठी सामुदायिक सौर प्रकल्प (बी.ई.एस.एस.) किंवा इतर प्रकल्प, एन आर एल एम बचत गटांसाठी विविध सौर प्रकल्प, गावातील शासकीय ईमारतींचे सौर विद्युतीकरण, सौर आधारित व इतर प्रकल्प, सौर कृषी पंप, इतर सौर अधारित तंत्रज्ञानावर असलेले अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प, बचत गट/प्राथमिक स्तरावरील सहकारी संस्था/डेअरी/मत्स्योद्योग प्रकल्प इत्यादी प्रकल्पासाठी ९० टक्के अर्थ सहाय्य दिल्या जाईल. या अनुषगांने अमरावती जिल्ह्यातील उपरोक्त निकषानुसार पात्र असेलल्या गावांकडून दि. १६ जून २०२५ पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी महाऊर्जा विभागीय कार्यालय,अमरावती दुरध्वनी/भ्रमणध्वनी क्र.०७२१ २६६१६१०/८६६९९११०११ तसेच ई-मेल domedaamravati@mahaurja.com वर संपर्क साधावा किंवा कार्यालयास प्रत्यक्ष भेट देण्यात यावी, असे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल व. तायडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा -विभागीय आयुक्त श्वेता सिंघल · ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमात सक्रीय सहभाग · जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विभागीय आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण

अमरावती, दि. 5 : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या घराच्या आवारात आईच्या नावाने एक झाड लावावे. राज्य शासनाच्या ‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ अभियानाची अमरावती विभागात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन श्रीमती सिंघल यांनी याप्रसंगी केले. अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी, अजय लहाने, उपायुक्त संतोष कवडे, राजीव फडके यांच्यासह विभागीय आयुक्तालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते. जागतिक पर्यावरण दिनाचे महत्व विशद करुन श्रीमती सिंघल म्हणाल्या की, प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने वृक्षारोपण कार्यक्रम राबवावा. राज्य शासनाने हरित महाराष्ट्र, समृध्दी महाराष्ट्र अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात 10 कोटी वृक्ष लावण्याचे उद्दीष्ठ ठेवले असून त्यात आपलाही सहभाग नोंदविण्यासाठी आजपासून ते 15 ऑगस्टपर्यंत विभागाला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वृक्षारोपणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा. याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन सद्यस्थिती जाणून घेण्यात येणार आहे. वृक्षारोपणाचे महत्त्व जाणून प्रत्येकाने यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा. मुबलक प्राणवायू निर्मितीसाठी तसेच ग्लोबल वार्मिंगपासून येणाऱ्या पिढीला सुरक्षित करावयाचे असल्याने प्रत्येकाने वृक्षारोपणाची चळवळ बळकट करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त श्रीमती सिंघल यांनी यावेळी केले. यावेळी उपस्थित विभागीय आयुक्तालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी पृथ्वीच्या व सृष्टीच्या संरक्षणासाठी वृक्षारोपण करुन एक पेड माँ के नाम उपक्रम प्रामाणिकपणे राबविणार असल्याची शपथ घेतली.

गुरुवार, ५ जून, २०२५

‘समृद्धी महामार्ग’ वाढवण बंदराशी जोडणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इगतपुरी येथे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण

नाशिक, दि. ५ : हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरणार आहे. येत्या काळात या महामार्गाला वाढवण बंदराशी जोडण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम (सा. उ.) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार नितीन पवार, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्गासाठी विक्रमी वेळेत भूसंपादन करण्यात आले आहे. या मार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील २४ जिल्हे जेएनपीटी बंदराशी जोडले गेले आहेत, आता हा महामार्ग वाढवण बंदराशी जोडला जाईल. ७०१ किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी ५५ हजार ३३५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. समृद्धी महामार्गाचा ७६ किलोमीटर मार्ग नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून जातो. या भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा असून अतिशय खडतर भौगोलिक परिस्थितीत मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे अभियांत्रिकी आव्हान पेलले. यातील इगतपुरीजवळील बोगदा हा ८ किलोमीटर लांबीचा असून तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा आणि देशातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा आहे. समृद्धी महामार्गासह पालखी मार्गावर वन विभागाच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गामुळे एक हजार शेततळी तयार झाली आहेत. याबरोबरच दर ५०० मीटरवर जलपुनर्भरण व्यवस्था करण्यात आली आहे. या महामार्गालगत सौर ऊर्जा निर्मिती करण्यात येणार आहे. त्यापैकी ३५ मेगावॉट प्रकल्पाचे काम सुरू आहे. महामार्गालगत गेल कंपनीतर्फे गॅस वाहिनी टाकण्यात आली आहे. या माध्यमातून नव्याने विकसित होणाऱ्या स्टीलसिटी गडचिरोली पर्यंत गॅस पोहोचविता येईल. तसेच धार्मिक आणि पर्यटनस्थळे या मार्गामुळे जोडली आहेत. वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलामुळे वाहतूक सुलभ होण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. महामार्ग अपघातमुक्त करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या महामार्गामुळे वन्यजीवांच्या संचारात अडथळे येऊ नयेत म्हणून १०० प्रकारच्या संरचना तयार करण्यात आल्या आहेत. देशात अशा प्रकारची रचना प्रथमच साकारण्यात आली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा संचार विना व्यत्यय सुरू आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आगामी काळात शक्तिपीठ महामार्ग साकारण्यात येणार आहे. या महामार्गामुळे मराठवाड्यातील आर्थिक चित्र बदलण्यास मदत होईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. कृषी, पर्यटन विकास, औद्योगिकीकरणाला चालना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, समृद्धी महामार्गामुळे वेळ, इंधनाची बचत होणार आहे. प्रदूषणास आळा बसणार आहे. या महामार्गामुळे कृषी, पर्यटन विकास, औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. पर्यावरणपूरक असा महामार्ग राज्याच्या विकासात गेम चेंजर ठरेल. तसेच नाशिक जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समृद्धी महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण भागासाठी लाभदायक ठरेल, त्याचप्रमाणे शक्तिपीठ महामार्ग उपयुक्त ठरेल. या महामार्गावर प्रवाशांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. या महामार्गावर वाहन चालकांनी वेग मर्यादेचे व वाहतूक निमयांचे पालन करावे, असेही आवाहन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. अन्य प्रकल्पांनाही गती जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पर्यावरण संवर्धनासाठी यंदा १० कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या महामार्गानंतर आता राज्यातील अन्य प्रकल्पांनाही गती देण्यात येईल, असे सांगत त्यांनी या प्रकल्पासाठी परिश्रम घेणारे अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी कौतुक केले. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्यासह मान्यवरांनी महामार्गाची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वाहनाचे सारथ्य केले.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आव्हानाला जिल्हा प्रशासनाचा उस्फूर्त प्रतिसाद एक पेड माँ के नाम उपक्रम अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात वृक्षारोपण * जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते आईच्या नावे वृक्षारोपण * 5 जून ते 15 ऑगस्ट पर्यंत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशाने जिल्ह्यात राबविणार अनेक उपक्रम

अमरावती , दि. 5 : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील प्रत्येकाने आपल्या घरासमोर आईच्या नावाने एक झाड लावण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. या पार्श्वभूमीवर आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी 'एक पेड माँ के नाम' अंतर्गत त्यांच्या आईच्या नावे पिंपळाचे रोप लावून वृक्षारोपण केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केले. यावेळेला अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, उपजिल्हाधिकारी श्री विवेक जाधव, पालकमंत्री यांचे स्वीय सहा. विपीन पिसे आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 'एक पेड माँ के नाम' उपक्रमात जिल्हा प्रशासनासह स्थानिक स्वयंसेवी संस्था , विद्यार्थी, सर्व शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग घ्यावा. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पर्यावरण दिना निमित्त 'एक पेड माँ के नाम' हे अभियान राबविण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्या. जिल्ह्याचा औद्योगिक विकास होत असताना पर्यावरणाचे संतुलन ढळू नये यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी म्हणून आपल्या घराच्या आवारात एक रोप लावावे. प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याने वृक्षारोपण कार्यक्रम राबवावा. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 15 ऑगस्टपर्यंत उद्दिष्ट ठेवून वृक्षारोपण ड्राईव्ह कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन सद्यस्थिती जाणून घेण्यात येणार आहे. वृक्षारोपणाचे महत्त्व जाणून प्रत्येकाने यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा. येणाऱ्या पिढीला आपल्याला संतुलित पृथ्वीचा वारसा सोपवायचा आहे, असे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यावेळी म्हणाले. यावेळी तहसिलदार, उप विभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.