धर्मादाय आयुक्तांकडून आदिवासी गोरगरिबांना वस्त्रदान
मेळघाटात नियमितपणे राबविणार सामाजिक उपक्रम
- धर्मादाय
आयुक्त महेंद्र महाजन
(फोटो ओळ : आदिवासी
बांधवांना वस्त्रदान करताना धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन व मान्यवर)
अमरावती, दि. 21 : धर्मादाय सहआयुक्त कार्यालय व सार्वजनिक न्यास वकील
संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलदरा तालुक्यात गोरगरीब आदिवासी बांधवांसाठी
वस्त्रदान उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र
केशव महाजन यांच्याहस्ते गरजू आदिवासी बांधवांना वस्त्रदान करण्यात आले.
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात व मेळघाटात गरजू गरीब लोकांना धर्मादाय
विभागाच्यावतीने वस्त्रदानाचा उपक्रम नियमितपणे राबविला जाणार असल्याचे धर्मादाय
आयुक्त महेंद्र महाजन यांनी सांगितले.
आमदार राजकुमार पटेल, अमरावती विभागाचे धर्मादाय सहआयुक्त संभाजी ठाकरे,
धर्मादाय उप आयुक्त नवनाथ जगताप, सहायक धर्मादाय आयुक्त रोहिणी पाठक, वकील संघाचे
अध्यक्ष प्रमोद बोथरा, उपाध्यक्ष अॅड. मिलिंद देशपांडे, सचिव अॅड. नरेश पारडशिंगे,
सार्वजनिक न्यास विभागाचे अधीक्षक पिंकी राय, नीलेश करलुके, निरीक्षक संतोष राऊत,
उमेश लुंगे, रवींद्र गुल्हाने, विक्रम पवार, अस्मिता पटेल, सचिन बाकल, सचिन कांबळे
तसेच चिखलदरा नगरपरिषदेचे नगरसेवक आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. महाजन म्हणाले
की, समाजात आजही अनेक गरीब लोकांना पुरेसे वस्त्र मिळत नाही, दैनंदिन परिधान
करावयाची वस्त्र घेण्याची त्यांची ऐपत नाही. थंडीमध्ये सुध्दा गरीब लोकांना
ओढण्यासाठी गरम लोकरचे कपडे मिळत नाहीत. अशा गरजू लोकांसाठी धर्मादाय सह आयुक्त व
वकिल संघटनेव्दारे राबविला जाणारा वस्त्रदान कार्यक्रम हा स्तुत्य व कौतुकास्पद
उपक्रम आहे. प्रत्येक व्यक्तीला सुरळीतपणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. समाजातील
दानशुर व्यक्तींनी गोरगरीब लोकांचे जीवन सुखकर होण्यासाठी मानवतेच्या
दृष्टीकोनातून वस्त्रदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमासाठी ज्या
धर्मादाय संस्थांनी दान केले त्यांचे श्री. महाजन यांनी कौतूक केले. समाजातील गरीब
लोकांचे जीवन सुखमय करण्याचे धर्मादाय संस्थेचा मुळ उद्देश असून तो सफल करण्यासाठी
धर्मादाय विभागाने पुढाकार घेऊन वस्त्रदानाचा उपक्रम प्रभावीपणे राबवावा. धर्मादाय
विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची त्यांनी माहिती दिली.
आरोग्याच्या सुविधा मिळविणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून त्या अंतर्गत
धर्मादाय रुग्णालयातील मोफत व सवलतीच्या दरात उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सुविधांचा
गरजूंनी लाभ घेण्याचे आवाहन श्री. महाजन यांनी केले.
धर्मादाय
विभागाव्दारे राबविण्यात येणारा गोरगरीब आदिवासी बांधवांसाठी वस्त्रदान हा स्तुत्य
उपक्रम असल्याचे सांगून कौतूक केले. समाजातील इतर धनाड्य व्यक्तींनी सुध्दा याचे
अनुकरण करुन अशाप्रकारचे उपक्रम नियमितपणे राबविले जावेत, असे आमदार राजकुमार पटेल
यांनी यावेळी सांगितले.
श्री. ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील धर्मादाय
संस्थाना गरजु गरीब लोकांसाठी वस्त्रदान करण्याचे आवाहन धर्मादाय विभागाव्दारे
करण्यात आले होते. त्याला धर्मादाय संस्थांनी भरभरुन प्रतिसाद देत आपापल्यापरीने
गरीब लोकांसाठी साडया, चादरी, ब्लैंकेट, टावेल, कपडे इत्यादी वस्त्रांचे दान केले.
त्या दान केलेल्या वस्त्रांचे वितरण राज्याचे धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन
यांच्या शुभ हस्ते गरजू आदिवासी बांधवांना करण्यात आले. या वस्त्रदान कार्यक्रमाचा
सुमारे दोन हजार गरीब आदिवासी बांधवांनी लाभ घेतला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या
हस्ते गोरगरीब आदिवासी बांधवांना व महिलांना वस्त्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मादाय उपायुक्त
नवनाथ जगताप यांनी, तर सुत्र संचालन अधीक्षक पिंकी राय यांनी केले. प्रमुख
पाहुण्यांचा परिचय अधीक्षक नीलेश करलुके, संतोष राऊत व अॅड. कुलकर्णी यांनी करून
दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मादाय सह-आयुक्त कार्यालयातील सर्व अधिकारी,
कर्मचारी तसेच वकील संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.
0000