सोमवार, २२ डिसेंबर, २०२५
‘होमस्टे’ योजनेतून पर्यटकांना निवास सुविधा इच्छुकांनी होमस्टे करिता नोंदणी करण्याचे पर्यटन संचालनालयाकडून आवाहन
अमरावती दि.२२ : जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाव्दारे ‘होमस्टे’ (Home Stay) योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत स्थानिक नागरिकांना त्यांच्या घरातील उपलब्ध खोल्या पर्यटकांसाठी निवासासाठी उपलब्ध करून देता येणार आहेत. जिल्ह्यातील इच्छुक घरमालकांनी शासनाने निर्धारित केलेल्या अटी व निकष पूर्ण करून होमस्टे नोंदणी करावी. नोंदणीकृत होमस्टेना पर्यटन विभागामार्फत आवश्यक मार्गदर्शन, प्रसिद्धी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन संचालनालयाचे विभागीय उपसंचालक विजय जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
होमस्टेमुळे पर्यटकांना स्थानिक संस्कृती, परंपरा, खाद्यसंस्कृती व जीवनशैलीचा अनुभव मिळणार असून स्थानिक नागरिकांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध होणार आहे. विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील लोकांना याचा मोठा लाभ होणार आहे.
पर्यटन विकासासोबतच स्थानिक रोजगारनिर्मिती, स्वयंपूर्णता व शाश्वत पर्यटनाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे अमरावती विभातील हॉटेल व्यावसायीक व नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचे श्री. कमलेश नंदनवार (मो. क्र. ८९७५८४८९८७) आणि श्रीमती उज्ज्वला काळे (मो. क्र. ८३७९०५८०६०) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन पर्यटन संचालनालयाव्दारे करण्यात आले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा