सोमवार, १ डिसेंबर, २०२५

सर्व अत्याधुनिक आरोग्य सुविधा एका छताखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मेयोचा कायापालट

नागपूर, दि. 01 : शहरातील सर्वात जुने शासकीय रुग्णालय असलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कायापालट होत असून सर्व अत्याधुनिक आरोग्य सुविधा एकाच छताखाली येथे मिळत आहेत. 132 वर्षे जुने असलेले हे रुग्णालय ओळखले जाते ते मेयो म्हणूनच ओळखले जाते. वैद्यकीय शिक्षणासह येथील रुग्णालयाचा लाभ घेण्यासाठी ठिकठिकाणाहून रुग्ण येत असतात. विदर्भासहच मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांमधील रुग्णही नागपुरातील मेयो मध्ये उपचारासाठी येतात. मधल्या काळात या रुग्णालयाचा विकास जवळपास थांबला होता, मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारताच मेयोकडे विशेष लक्ष दिले आणि आज हे रुग्णालय कात टाकताना दिसत आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून आकस्मिक विभागापर्यंत रुग्ण आणि नातेवाईकांना जाण्यासाठी निःशुल्क इ रिक्षा, नेत्र विभाग, रक्तपेढी यांच्या स्वतंत्र रुग्णवाहिका यामुळे रुग्णांची मोठी सोय झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने वेकोलीने केलेल्या अर्थसाह्यामुळे मोतीबिंदूच्या अडीच हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. पेईंग वॉर्ड या रुग्णालयात आजवर 14 पेईंग वॉर्ड होते, आता मात्र एकूण 42 पेईंग वॉर्ड होणार आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय रुग्णही येथील दर्जेदार आरोग्य सुविधांचा लाभ घेऊ शकतील. याशिवाय रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा केंद्र बांधण्यात आले असून, त्यात 54 जणांची राहण्याची सोय आहे. या केंद्रात खाटा, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, पंखे अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने अमेरिकेतील शंकर आय फाऊंडेशन सोबत लवकरच करार होणार असून, येथे सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर ऑप्थेलमोलोजी स्थापन होणार आहे. त्यामुळे डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधिक उपकरणांद्वारे उपचार होऊ शकतील. याशिवाय परिसरात बहुमजली पार्किंग तळ उभारण्यात येत असून, 450 दुचाकी व 200 कार अशी तेथील क्षमता आहे. नवजात शिशु कक्षात आता बाळासह त्याच्या आईलाही राहता येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेयोच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे ही ब्रिटिशकालीन रुग्णालय अंतर्बाह्य बदलत आहेत. औषध, सिटी स्कॅन, एम आर आय या आरोग्य सुविधा निःशुल्क आहेत. रुग्णांनी येथील सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण यांनी केले आहे. 0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा