गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२६

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान ‘भगवान बिरसा मुंडा गौरव दिन सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून अनुसूचित जमातींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या सप्ताहात १३ नोव्हेंबर रोजी न्यूक्लियस बजेट योजनेंतर्गत लाभार्थ्यांना धनादेश वितरण आणि महिला बचत गटांसाठी उपक्रम, १४ नोव्हेंबर रोजी स्मारकांची स्वच्छता व दीपोत्सव, तर १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन आणि #गडचिरोली येथे राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच १६ नोव्हेंबर रोजी शासकीय कागदपत्रांसाठी सेवा शिबिरे, १७ नोव्हेंबर रोजी आरोग्य व पोषण जनजागृती आणि १८ नोव्हेंबर रोजी आदिवासी समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी कार्यक्रम होणार आहेत.

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षक नियुक्ती, शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रे, तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राणी दुर्गावती योजना सुरू करण्यात आली आहे. कोलाम, कातकरी, माडिया व पारधी समाजाच्या विकासासाठी विशेष पॅकेज आणि आदिवासी संस्कृतीच्या अभ्यासासाठी विद्यापीठ स्तरावर अध्ययन केंद्र स्थापन करण्याचे निर्णय घेतल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

मुंबई उपनगर जिल्ह्यात पाच लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत २ लाख १२ हजार ३९० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. मियावाकी पद्धत, जिओ मॅपिंग व आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनासह या मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

#भगवानबिरसामुंडा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा