शुक्रवार, २४ जानेवारी, २०२५

देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अर्ज सादर करण्यास दि. 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ

देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अर्ज सादर करण्यास दि. 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ अमरावती, दि.24 : देशातील AIIMS, IIM, IIIT, NIT, IISc & IISER, Institution of National Importance & Other Colleges या शैक्षणिक संस्थांसह भारत सरकार मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राबविली जाते. या योजने अंतर्गत सन 2024-25 वर्षाकरिता दि. 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत आवेदन अर्ज मागविण्यात आले आहे, असे समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. राज्यातील 100 अनुसूचित जातीच्या/नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निहाय 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. सदर योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित विद्यापीठ/संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पूर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क संबंधित विद्यापिठ/शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात जमा करण्यात येते. वसतीगृह व भोजन शुल्क यांचा देखील संस्था आकारणीनुसार खर्च देण्यात येणार आहे. या योजनेविषयी आधिक माहिती, जाहिरात, आवेदन अर्ज व नियमावली शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ताज्या घडामोडी या मथळ्याखाली प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर संकेतस्थळावरुन विहित अर्जाचा नमूना डाऊनलोड करुन तो परिपुर्ण भरुन कागदपत्रासह दि 14 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, 3 चर्च पथ पुणे. येथे सादर करावे. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांना योजनेंतर्गत लाभ देय राहील. सदर योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थानी अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रादेशिक उपायुक्त श्री. वारे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

बुधवार, २२ जानेवारी, २०२५

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी पुढील वर्षभर राज्यातील #एसटी च्या सर्व बस स्थानकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ राबवण्यात येणार आहे

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी रोजी पुढील वर्षभर राज्यातील #एसटी च्या सर्व बस स्थानकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत तब्बल ३ कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असून ' अ ' वर्गात पहिला येणाऱ्या बसस्थानकाला १ कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे.

#दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी (२१ जानेवारी) महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत.

#दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्याच दिवशी (२१ जानेवारी) महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ६,२५,४५७ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे, हा एक नवा विक्रम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामंजस्य करारांच्या व्यतिरिक्त विविध कंपन्यांच्या प्रमुखांची भेट घेतली व त्यांना गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. #टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट असून टाटा समूह ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. #WEF25 #MahaAtDavos #Davos2025

सोमवार, २० जानेवारी, २०२५

मेळघाट हाट येथील खादी महोत्सव 25 जानेवारीपर्यंत

मेळघाट हाट येथील खादी महोत्सव 25 जानेवारीपर्यंत अमरावती, दि. 20 : प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामो‌द्योग मंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने बस स्टॉड समोरील सायन्सकोर मैदान येथील मेळघाट हाट येथे खादी महोत्सवाला सुरवात झाली असून 25 जानेवारी 2025 पर्यंत हा महोत्सव चालणार आहे. अमरावतीकरांनी मोठ्या संख्याने खादी महोत्सवाला भेट ‌द्यावी, असे आवाहन खादी व ग्रामो‌द्योग मंडळ आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामो‌द्योग मंडळामार्फत जिल्ह्यात विकेंद्रीत सोलर चरखा समुह कार्यक्रम राबविण्यात येत असून उ‌द्योग विभागाच्या महाराष्ट्र राज्य औ‌द्योगिक समुह विकास कार्यक्रमातंर्गत सोलर चरखा समुहासाठी सामुहिक सुविधा केंद्र अमरावती एम. आय. डी. सी. क्षेत्रात प्रस्थापित करण्यात आले आहे. या प्रकल्पातंर्गत खादी व सोलर चरख्यापासून अनेक दर्जेदार उत्पादने तयार केले जात असून यामध्ये ग्रामीण भागातील 300 पेक्षा जास्त महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. यामध्ये धारणी तालुक्यातील शंभर महिलांचा समावेश आहे. या प्रकल्पातंर्गत उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त दि. 20 ते 25 जानेवारी 2025 पर्यंत खादी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये विविध दर्जेदार खादी उत्पादने सवलतीच्या दरात अमरावतीकरांना उपलब्ध होणार आहेत. तसेच मेळघाटातील महिला बचत गटांनी तयार केलेली विविध दर्जेदार उत्पादने मेळघाट हाट येथे विक्रीस उपलब्ध आहेत.

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

लेखा व कोषागारे विभागाच्या कला व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

लेखा व कोषागारे विभागाच्या कला व क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न सर्वसाधारण विजेते पद अमरावती जिल्ह्याने तर उपविजेता पद वाशीमने पटकाविले अमरावती. दि, 17 : लेखा व कोषागारे संचालनालयाव्दारे दोन दिवसीय विभागीय कला व क्रीडा स्पर्धा 2025 चे आयोजन वाशिम येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा या पाच जिल्ह्यांतील अधिकारी-कर्मचारी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या विभागस्तरीय स्पर्धेमध्ये अमरावती जिल्ह्याने विशेष कामगिरीची नोंद करत कला व क्रीडा स्पर्धा 2025 चे सर्वसाधारण विजेते पद पटकावले असून सर्वसाधारण उपविजेता वाशिम संघ ठरला. सांस्कृतिक स्पर्धेमध्ये एकेरी महिला गायन या प्रकारात अमरावतीच्या वरिष्ठ कोषागार अधिकारी श्रीमती शिल्पा पवार यांनी प्रथम स्थान मिळवले. दुहेरी माहिला गायन स्पर्धेमध्ये श्रीमती तृप्ती तिप्पट व श्रीमती भारती वालचाळे यांनी प्रथम स्थान मिळवले. सामुहिक नृत्य प्रकारात अमरावती संघाने व्दितीय स्थान प्राप्त केले. वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. विभागीय स्तरावर वैयक्तिक, दुहेरी तथा सामुहिक स्पर्धा यावेळी घेण्यात आल्यात. त्यात धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, चालणे, पोहणे, कॅरम, बुध्दिबळ, टेबलटेनिस, बॅडमिंटन, हॉलीबॉल, क्रिकेट, थ्रोबॉल, खो-खो व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. या क्रीडा स्पर्धेमध्ये अमरावती जिल्हा क्रिकेट या प्रकारात विजेता ठरला तर खो-खो महिला संघाने प्रथम स्थान पटकावले तसेच थ्रोबॉलमध्ये महिला संघ व्दितीय ठरला . धावणे 100 मीटर या प्रकारात महिला गटातून अमरावतीच्या आरती जनबंधू यांनी व्दितीय स्थान पटकाविले. धावणे 200 मीटर या प्रकारात महिला गटातून प्रिया कापसे यांनी प्रथम तर पुरुष गटातून श्रीकार माटे यांनी व्दितीय क्रमांक पटकावला. तसेच 100 बाय 4 रिले प्रकारातून पुरुष गटातून अमरावती संघ उपविजेता ठरता यामध्ये भूषण जोशी, रुपेश जयपुरे, मयूर देशमुख व श्रीकार माटे यांनी सहभाग नोंदविला. या प्रकारात अमरावती महिला संघाने सुध्दा व्दितीय क्रमांक पटकावला असून यामध्ये भारती जनबंधू, कोमल गोसावी, प्रतिभा पवार व जागृती चौधरी यांनी सहभाग नोंदविला. नयना सोलव यांनी थाळी फेक महिला प्रकारात प्रथम तर लांब उडी महिला प्रकारात व्दितीय क्रमांक पटकावला. चालणे तीन किमी प्रकारातून सारिका कोरान्ने यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पोहणे 50 मीटर व 100 मीटर या दोन्ही प्रकारात लेखाधिकारी जयदेव देशपांडे यांनी प्रथम स्थान पटकाविले. कॅरम या खेळ प्रकारात पुरुष गटातून चंदन गजभिये व महिला गटातून प्रिया करडे यांनी व्दितीय स्थान पटकावले. कॅरम दुहेरी महिला यामध्ये प्रिया करडे व राजश्री भोकरे यांचा संघ उप विजयी झाला. बुध्दीबळ मिश्र या प्रकारात राजश्री भोकरे यांनी प्रथम स्थान मिळविले. टेबल टेनिस एकेरी पुरुष यामध्ये अमरावतीचे सहा. संचालक अमोल ईखे यांनी व्दितीय स्थान पटकावले तर टेबल टेनिस पुरुष दुहेरी यामधून अमोल ईखे व विकी रोडे यांचा संघ उप विजयी ठरले. टेबल टेनिस दुहेरी महिला यामधनु प्रिया करडे व राजश्री भोकरे यांनी व्दितीय स्थान मिळविले. बॅडमिंटन एकेरी पुरुष या गटातुन भुषण जोशी उप विजेते ठरले असून बॅडमिंटन एकेरी महिला या गटातून नयना सोलव हया उप विजेत्या ठरल्या. बॅडमिंटन दुहेरी महिला यामध्ये नयना सोलव व प्रिया करडे यांनी व्दितीय स्थान मिळविले. रांगोळी स्पर्धेत स्त्री सक्षमीकरण या विषयावर रांगोळी काढून अमरावतीच्या यामिनी खरड यांनी प्रथम क्रमांक मिळविला. अमरावती विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यामध्ये सहसंचालक (लेखा व कोषागारे) श्रीमती प्रिया तेलकुंटे , सहसंचालक (स्थानिक निधी) श्री. गायकवाड साहेब, वरिष्ठ कोषागार अधिकारी श्रीमती शिल्पा पवार तसेच वित्त विभागातील अधिकारी तथा कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

प्रधानमंत्री यांच्या हस्ते स्वामित्व योजनेअंतर्गत आज सनदांचे ऑनलाईन वाटप

अमरावती, दि. 17 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दि. 24 एप्रिल 2020 रोजी स्वामित्व योजनेचे उद्घाटन केले होते. या योजनेचा उद्देश गावांतील आबादी क्षेत्रातील घरांसाठी मालमत्ता पत्रक देणे हा आहे. ही योजना ग्रामीण विकास विभाग, भूमि अभिलेख कार्यालय (महसूल विभाग) आणि सर्व्हे ऑफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम असून यासाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि प्रगत नकाशांकन तंत्रांचा उपयोग केला जातो. ही योजना ग्रामीण समुदायांच्या आर्थिक समावेशनात सुधारणा, पतपुरवठ्यास सुलभता आणि एकूणच सामाजिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविते. उदया, शनिवार दि. 18 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वामित्व योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक घरमालकांना मालमत्ता कार्ड, सनदचे ई-वितरण करतील, तसेच या योजनेतील काही लाभार्थ्यांशी संवाद साधतील. यानंतर मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी, अधिकारी इत्यादींच्या उपस्थितीत स्थानिक कार्यक्रमामार्फत मालमत्ता कार्ड, सनदचे प्रत्यक्ष वितरण करण्यात येणार आहे. स्वामित्व योजनेचे लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी अमरावती विभागातील जिल्ह्यामधील तालुका आणि पंचायत स्तरावर एकुण 149या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या दिवशी स्वामित्व योजनेबाबत माहितीचे सादरीकरण भूमि अभिलेख विभागामार्फत करण्यात येणार असून त्यामुळे जनतेला योजनेच्या लाभाची माहिती मिळणार आहे. सदर कार्यक्रमास भूमी अभिलेख विभाग, ग्रामविकास विभाग, बॅंकेचे अधिकारी, कर्मचारी ग्रामीण जनतेस स्वामित्व योजनेतून तयार होणा-या मिळकत पत्रिकेवर मिळणाऱ्या कर्जा च्या योजनांसंबंधी माहिती जनतेस देता येईल. अमरावती जिल्ह्यातील एकुण 13 तालुक्यातील 34 गावांमध्ये सनद वाटप कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्हा स्तरावरील कार्यक्रम जिल्हा नियोजन भवन येथे होणार आहे. खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार बळवंतराव वानखडे, आमदार प्रतापदादा अडसड, रवी राणा, सुलभाताई खोडके, उमेश यावलकर, प्रवीण तायडे, केवळराम काळे, गजानन लवटे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र यांच्या उपस्थितीत मौजे रामगाव तालुका अमरावती या गावाच्या सनद वाटपाचा कार्यक्रम पार पडणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एकुण 13 तालुक्यातील 50 गावांमध्ये सनद वाटप कार्यक्रम राबविण्यात येणार असून तालुकास्तरावरील कार्यक्रम मोताळा तालुक्यामध्ये होणार असून आमदार संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. अकोला जिल्ह्यातील एकुण 7 तालुक्यातील 12 गावांमध्ये सनद वाटप कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्हास्तरावरील कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे होणार असून कार्यक्रम स्थळी मौजे कळंबेश्वर येथील सनद वाटप कार्यक्रम होणार आहे. तसेच तालुका स्तरावरील कार्यक्रम मौजे भोकर तालुका तेल्हारा येथे आयोजित करण्यात आला असून आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थांना सनद वाटप करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 44 गावांमध्ये सनद वाटपाचा कार्यक्रम होणार असून आदिवासी विकासमंत्री अशोक ऊईके यांची प्रमुख उपस्थितीत होणार आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये 2 तालुक्यातील एकुण 9 गावांमध्ये कार्यक्रम होणार असून त्यास मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड उपस्थित राहणार आहेृ भुमि अभिलेख विभाग व गामविकास विभाग यांचे संयुक्त विद्यामानाने होणा-या सनद वाटप कार्यक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन भूमि अभिलेख विभागाने केले आहे.

गुरुवार, १६ जानेवारी, २०२५

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप दिवस’ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दीप प्रज्वलन केले. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा व अन्य मान्यवर उपस्थित होते. सिडबी (SIDBI) स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाकडून स्टार्टअपसाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक प्रादेशिक विभागाला ३० कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. काळाची गरज ओळखून स्टार्टअप धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. हे देशातील आधुनिक धोरण ठरणार असून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. नव उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती केली जाईल. देशात सुरुवातीला ४७१ स्टार्टअप होते, आज ती संख्या १ लाख ५७ हजार आहे. महाराष्ट्र केवळ भारताच्या #स्टार्टअप क्रांतीत सहभागी नाही तर त्याचे नेतृत्व करत आहे. राज्यात २६ हजार स्टार्टअप आहेत – मुख्यमंत्री #startupindia #Startup

बुधवार, १५ जानेवारी, २०२५

भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी एकाच वेळी राष्ट्राला समर्पित

भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी युद्धनौका, विनाशिका आणि पाणबुडी एकाच वेळी राष्ट्राला समर्पित मुंबई, दि. 15 : निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू असून भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भारतात निर्मित सूरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) या तीन महत्वाच्या नौका मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नौसेना प्रमुख दिनेशकुमार त्रिपाठी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले की, संपूर्ण विश्व हा परिवार मानून भारत विकासाच्या भावनेने काम करतोय. तीन आघाडीच्या लढाऊ जहाजांचा नौदलामध्ये समावेश एक मजबूत आणि स्वावलंबी संरक्षण दल निर्माण करण्यासाठी भारताची अटल वचनबद्धता अधोरेखित करते. भारतीय समुद्र क्षेत्रात भारत प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून उदयास आला आहे. नौदलाने अनेकांचे जीव वाचवले आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सुरक्षित केली आहे. यामुळे जगभरातून भारतावर विश्वास वाढला असून आज जागतिक स्तरावर, विशेषत: ‘ग्लोबल साउथ’मध्ये भारत एक विश्वासार्ह आणि जबाबदार भागीदार म्हणून ओळखला जातो. तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण सैन्याबरोबरच आर्थिक दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. जमीन, पाणी, हवा, खोल समुद्र किंवा अनंत अवकाश अशा सर्वच क्षेत्रात भारताने आपले हित जपून तिनही सेनादलांच्या माध्यमातून मागील काही वर्षात आत्मनिर्भर बनण्याची प्रशंसनीय वाटचाल सुरू ठेवली आहे. एकाच वेळी विनाशिका, युद्धनौका आणि पाणबुडी कार्यान्वित होत असल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर भारतीय नौदलाने स्वावलंबी होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी यावेळी नमूद केले. भारतीय सैनिकांना आता भारतीय युद्ध सामग्री उपलब्ध होत असून 100 हून अधिक देशांना संरक्षण सामग्री निर्यात केली जात आहे. या माध्यमातून ‘मेक इन इंडिया’ योजनेचा विस्तार होत असून आर्थिक प्रगतीचे दार उघडून भारताच्या तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्याच्या प्रक्रियेत मोठा हातभार लागत असल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्री श्री.मोदी यांनी काढले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग म्हणाले की, एकाच वेळी तीन युद्धनौका राष्ट्राला अर्पण होत असल्याने भारतीय समुद्री क्षेत्रात देशाची ताकद आणि महत्व वाढले आहे. या क्षेत्रातून मोठे व्यापार होत असून संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होत आहे. आधुनिकीकरणावर भर देण्यात येत असून या तिनही नौका त्यादृष्टीने सक्षम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नौदल प्रमुख ॲडमिरल श्री. त्रिपाठी यांनी नौदलासाठी गौरव आणि प्रतिष्ठेचा दिवस असल्याचे सांगून या निमित्ताने शक्ती, क्षमता आणि आत्मनिर्भरता साजरी केली जात असल्याचा उल्लेख केला. युद्धनौकांविषयी थोडक्यात… आयएनएस सूरत – हे प्रकल्पातील चौथे आणि अंतिम जहाज आहे असून जगातील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक विनाशिकांपैकी एक आहे. या जहाजामध्ये 75 टक्के स्वदेशी घटक असून यात अत्याधुनिक शस्त्र-संवेदक प्रणाली आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमता आहेत. आयएनएस वाघशीर – स्कॉर्पीन प्रकल्पातील ही सहावी आणि अंतिम पाणबुडी आहे. ही भारताच्या पाणबुडी बांधणीतील वाढत्या कौशल्याचे प्रतिनिधित्व करते. फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने ही तयार करण्यात आली आहे. आयएनएस निलगिरी - स्टेल्थ युद्धनौका प्रकल्पातील ही पहिली नौका आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोने याचे डिझाइन केले आहे. यात टिकाऊपणा, समुद्रात स्थिरता आणि स्टेल्थसाठी प्रगत वैशिष्ट्ये आहेत, जी स्वदेशी युद्धनौकांच्या पुढील पिढीचे प्रतिबिंब आहे. 0000

मंगळवार, १४ जानेवारी, २०२५

महाज्योतीमार्फत पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या पाच जिल्ह्यांमध्ये उत्कृष्टता केंद्र सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार • एआय तंत्राचाही वापर • नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार • एआय तंत्राचाही वापर • नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. 13 : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात येईल. विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य शासनाच्या शंभर दिवस आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ‘माहिती व जनसंपर्क’चे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह आदी उपस्थित होते. प्रधान सचिव तथा महासंचालक श्री. सिंह यांनी सादरीकरणाद्वारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामकाजात यापुढे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यावर भर द्यावा. डिजिटल माध्यम धोरण तयार करून नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात येणाऱ्या मान्यवरांना महाराष्ट्राचे विविध पैलू दर्शवणारे कॉफीटेबल बुक तयार करावे. राज्य शासन घेत असलेले निर्णय, योजना व उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत सर्व माध्यमांद्वारे जाणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या प्रतिमा संवर्धनासाठी व माहिती पोहचविण्यासाठी एआय न्यूजरुम तयार करुन त्याद्वारे माहिती लवकरात लवकर प्रसारित करण्याचे नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक साहित्य, मनुष्यबळ घेण्यात यावे. पत्रकारांसाठी असलेल्या आरोग्यविषयक तसेच इतर विविध कल्याणकारी योजनांना गती देण्यात यावी. पत्रकार पुरस्कारांचे लवकर वितरण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्यस्तरावर संदर्भ कक्ष शासकीय योजना, उपक्रम यांची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरावर संशोधन आणि संदर्भ कक्ष स्थापन करण्यात यावे. तसेच वर्तमानपत्रे व ईलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच डिजिटल माध्यमांद्वारेही योजना, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी डिजिटल मीडिया धोरण लवकरच तयार करण्यात यावे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे - एआयच्या प्रभावी वापरावर भर - माहिती जलदगतीने पोचविण्यासाठी यंत्रणा - महासंचालनालयाच्या बळकटीकरणावर भर - सध्या अस्तित्वातील सर्व होर्डिंग हे डिजिटल होर्डिंगमध्ये बदलणार - सोशल मिडियाचा प्रभावी वापर वाढविणार - एकाच ठिकाणी माहिती उपलब्धतेसाठी संशोधन आणि संदर्भ कक्ष ००००