सोमवार, ७ एप्रिल, २०२५
रविवार, ६ एप्रिल, २०२५
*बंजारा काशी पोहरादेवी येथे जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा*
*बंजारा काशी पोहरादेवी येथे जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा*
*पोहरादेवीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही*
*— मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
वाशिम, दि. ६ एप्रिल (जिमाका) : बंजारा समाजाचा इतिहास शौर्य, पराक्रम व त्यागाचा आहे. बंजारा काशी पोहरादेवी या पवित्र स्थळाच्या विकासासाठी राज्य शासनाने नंगाराभवन, संस्कृती परंपरेचे दर्शन घडविणारे संग्रहालय अशी अनेक कामे पूर्ण केली. येथील उर्वरित कामेही लवकरच पूर्ण केली जातील. निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
श्रीराम नवमी आणि संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा बंजारा काशी पोहरादेवी येथे झाला. काही तांत्रिक अडचणींमुळे मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी कार्यक्रमाला दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित राहून सर्वांशी संवाद साधला. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, धर्मगुरू परमपूज्य बाबूसिंग महाराज,
उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार सईताई डहाके, संजय कुटे, राजेश राठोड, तुषार राठोड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, प्रभू श्री रामचंद्राने सर्व घटकांना एकत्र करत समता, एकता, न्यायप्रियता आदी मूल्य व्यवस्था असलेले आदर्श रामराज्य निर्माण केले. संत सेवालाल महाराज यांनी हा आदर्श अनुसरत प्रत्येकात राम जागविण्याचा प्रयत्न केला.
बंजारा समाज प्राचीन समाज असून, ऋग्वेदातही त्याचा उल्लेख आढळतो. या समाजाचे देशातील प्राचीन काळापासून व्यापार, वाहतूक क्षेत्र समृद्ध करण्याबरोबरच धार्मिक, सांस्कृतिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. समाजाच्या प्रगतीसाठी शासनातर्फे संत सेवालाल महाराज तांडा सुधारणा समिती, तांड्याला ग्रामपंचायतीचा दर्जा यासह अनेक निर्णय, तसेच नवीन योजना व उपक्रम हाती घेतले आहेत. पोहरा देवी या पवित्र स्थळी भाविकांच्या सुविधेसाठी आवश्यक सर्व कामे पूर्ण केली जातील.
मंत्री श्री. महाजन, राज्यमंत्री श्री. नाईक व विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी जन्मोत्सव व पाळणा कार्यक्रम तसेच आरती झाली.
यावेळी मंत्री श्री. महाजन, श्री. राठोड यांनी श्री जगदंबा मातेचे दर्शन घेतले, तसेच संत सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. सोहळ्याला हजारो भाविक उपस्थित होते.
०००
शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५
ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनामुळे भारतभूमीचा सच्चा सुपुत्र हरपला - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. ४ : मेरे देश की धरती, ए वतन ए वतन हम को तेरी कसम, अशी एकाहून एक सरस देशभक्तीपर गीते ज्यांच्यावर चित्रित झाली, असे ज्येष्ठ निर्माते, पटकथाकार, दिग्दर्शक,अभिनेते मनोजकुमार म्हणजे सर्वांचे 'भारतकुमार' यांच्या निधनामुळे भारतभूमीचा एक सच्चा सुपुत्र हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, आपल्या अभिनय कारकिर्दीत शहीद, पुरब और पश्चिम, हिमालय की गोद मै, हरियाली और रास्ता, रोटी कपडा और मकान, क्रांती अशा विविध सिनेमात मनोजकुमार यांनी मुख्य भूमिका साकारल्या. सिनेमांमधून देशभक्ती, शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसहित भारतीयत्वाची भावना देशवासियांच्या मनात रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे क्रांतिकारकांच्या बलिदानाने मिळलेले असून त्यांचा आपल्याला कधीही विसर पडू नये यासाठी त्यांनी आपल्या कलाकृतीमधून लोकांना त्यांची जाणीव करून दिली. मनोजकुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल २०१६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. भारतभूमीला वंदनीय मानणारा हा सच्चा कलावंत आज भारतभूमीच्या कुशीत कायमचा विसावला आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार यांच्या निधनामुळे
भारतभूमीचा सच्चा सुपुत्र हरपला
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ४ : मेरे देश की धरती, ए वतन ए वतन हम को तेरी कसम, अशी एकाहून एक सरस देशभक्तीपर गीते ज्यांच्यावर चित्रित झाली, असे ज्येष्ठ निर्माते, पटकथाकार, दिग्दर्शक,अभिनेते मनोजकुमार म्हणजे सर्वांचे 'भारतकुमार' यांच्या निधनामुळे भारतभूमीचा एक सच्चा सुपुत्र हरपल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
आपल्या शोकसंदेशात उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, आपल्या अभिनय कारकिर्दीत शहीद, पुरब और पश्चिम, हिमालय की गोद मै, हरियाली और रास्ता, रोटी कपडा और मकान, क्रांती अशा विविध सिनेमात मनोजकुमार यांनी मुख्य भूमिका साकारल्या. सिनेमांमधून देशभक्ती, शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नांसहित भारतीयत्वाची भावना देशवासियांच्या मनात रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला.
आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे क्रांतिकारकांच्या बलिदानाने मिळलेले असून त्यांचा आपल्याला कधीही विसर पडू नये यासाठी त्यांनी आपल्या कलाकृतीमधून लोकांना त्यांची जाणीव करून दिली. मनोजकुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाबद्दल २०१६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले.
भारतभूमीला वंदनीय मानणारा हा सच्चा कलावंत आज भारतभूमीच्या कुशीत कायमचा विसावला आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची
‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत
मुंबई दि. ४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती दिनानिमित्त' करण्यात आलेली तयारी, सामाजिक न्याय विभागाच्या योजना आणि अंमलबजावणी या विषयावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत सोमवार दि. ७ आणि मंगळवार दि. ८ एप्रिल २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. ८ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR
राज्यातील अनुसूचित जाती, ज्येष्ठ नागरिक इत्यादी वंचित वर्गातील लोकांना शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा या क्षेत्रात समान संधी आणि सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध योजना व उपक्रम देखील राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर येत्या १४ एप्रिल २०२५ रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती देशाभरत साजरी करण्यात येणार आहे. डॉ.आंबेडकर यांच्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो अनुयायी आणि नागरिक चैत्यभूमीवर येणार असल्याने त्यांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री श्री. शिरसाट यांनी विभागांतर्गत घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णय आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त कशा प्रकारे तयारी करण्यात आली आहे, याबाबत माहिती दिली आहे.
मंगळवार, १ एप्रिल, २०२५
‘अभिजात मराठी’साठी लवकरच समिती गठित करणार - मराठी भाषा मंत्री उदय सामंत
‘अभिजात मराठी’साठी लवकरच समिती गठित करणार
- मराठी भाषा मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. १ : मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाला असून आता भाषेच्या संशोधन आणि विकासासाठी तसेच भाषेच्या उन्नतीसाठी काम करण्यात येत आहे. यासाठी लवकरच एक समिती गठित करण्यात येईल, असे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रत्येक विभागास १०० दिवसांमध्ये करावयाच्या कामांची उद्दिष्टे दिली, त्या अनुषंगाने मराठी भाषा मंत्री सामंत यांच्या अध्यकतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. बैठकीस मराठी भाषा विभागाचे सहसचिव दादासाहेब भोसले तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मराठी भाषा मंत्री सामंत म्हणाले की, मराठी पुस्तकांना पुरस्कार देण्यात येतो. वाचक हा पुस्तक खरेदी करताना प्रथम पुस्तकाचे मुखपृष्ठ पाहून पुस्तक घेतो. त्यामुळे मराठी पुस्तकांच्या उत्तम मुखपृष्ठासाठी पुरस्कार देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
श्री.सामंत म्हणाले की, मराठी भाषा विभागाच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांचे नूतनीकरण करण्यात येत असून प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा भवन उभारण्याचे काम सुरू आहे. सीमा भागात असलेल्या गावामध्ये मराठी भाषेच्या प्रसारासाठी निधीची तरतूद करण्यात येईल, असे मराठी भाषा मंत्री श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.
विदर्भातील शेतकऱ्यांना रेशीम शेतीतून समृद्ध करण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या सहकार्याने विविध योजनांची अंमलबाजवणी करीत आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल होत असून रेशीम शेतीला अधिक चालना देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तुती व टसर रेशीम उद्योगाच्या विकासासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव तातडीने तयार करून पाठपुरावा करावा. रेशीम उद्योग कार्यालय नसलेल्या जिल्ह्यांमध्ये बाएफच्या मदतीने कार्यालय कार्यान्वित करण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
भारत नेट टप्पा दोन प्रकल्पांतर्गत सर्व ग्रामपंचायतींमध्ये उत्तम संपर्क यंत्रणा निर्माण करावी - केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया अती दुर्गम भागातील 'कनेक्टिव्हिटी' वाढविण्यासाठी केंद्राला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारत नेट टप्पा दोन प्रकल्पांतर्गत सर्व ग्रामपंचायतींमध्ये
उत्तम संपर्क यंत्रणा निर्माण करावी
- केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया
अती दुर्गम भागातील 'कनेक्टिव्हिटी' वाढविण्यासाठी
केंद्राला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १ : देशात प्रत्येक ग्रामपंचायतीला वेगवान संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी भारत नेट प्रकल्प राबविण्यात येत आहे. भारत नेट टप्पा एकमध्ये महाराष्ट्राने दमदार कामगिरी केली आहे. आता टप्पा दोन राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत राज्यातही उर्वरित प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत संपर्क यंत्रणा प्रस्थापित करण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिले. मुंबईतील बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मालमत्तांबाबत नगरविकास विभाग, बृहन्मुंबई महापालिका आणि केंद्रीय दूरसंचार विभागातील अधिकाऱ्यांची एक समिती तयार करण्याच्या सूचना देत समितीने चार आठवड्यात अहवाल देण्याचे निर्देशही केंद्रिय मंत्री सिंधिया यांनी दिले.
सह्याद्री अतिथिगृह येथे मुंबईतील बीएसएनएलच्या मालमत्ता आणि महाराष्ट्रातील संपर्क यंत्रणा बाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्य सचिव सुजाता सैनिक, केंद्रीय दूरसंचार सचिव नीरजकुमार, बीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट रावी आदी उपस्थित होते.
केंद्रीय दळणवळण मंत्री सिंधिया म्हणाले, भारत नेट टप्पा दोन अंतर्गत फोर जी नेटवर्कचे देशभरात एक लाख टॉवर उभारण्यात येणार आहे. हे टॉवर प्रामुख्याने संपर्क नसलेल्या भागात उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे राज्यात अतिदुर्गम भागातही चांगली संपर्क यंत्रणा निर्माण होईल. ग्रामीण भागात सांगली संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी येत असलेले अडथळे दूर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
अती दुर्गम भागातील 'कनेक्टिव्हिटी' वाढविण्यासाठी केंद्राला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यामध्ये गडचिरोलीसह दुर्गम आणि अतीदुर्गम भागात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यास राज्यशासन केंद्राला संपूर्ण सहकार्य करेल. टॉवर उभारण्यासाठी गडचिरोलीच्या अतीदुर्गम भागात संपूर्ण सुरक्षा दिली जाईल. या भागात संपर्क यंत्रणा उत्तम प्रकारे निर्माण झाल्यास येथील युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे सोयीचे होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीदरम्यान सांगितले.
गडचिरोलीसह अन्य ठिकाणी दुर्गम भागातही संपर्क यंत्रणा निर्माण करण्यात येत आहे. भारत नेट टप्पा दोन अंतर्गत संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये राज्यात संपर्क यंत्रणा निर्माण करण्यासाठी शासन काम करेल. या टप्प्यातही राज्य देशात सर्वात पुढे राहून काम करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
बीएसएनएल व एमटीएनएलच्या मुंबईतील मालमत्तांवर असलेली आरक्षणे आणि उद्देश तपासून घेण्यात येतील. यापैकी नियमानुसार काढणे शक्य असलेली आरक्षणे काढण्याची कार्यवाही करण्यात येईल. या मालमत्तांवर नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा निर्माण करण्याचा शासनाचा मानस आहे. याबाबत गठित केलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्य शासन कार्यवाही करेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
गडचिरोलीच्या अती दुर्गम भागात संपर्क यंत्रणा निर्माण झाल्यास नक्षलवादाचा संपूर्णपणे बीमोड करणे राज्य शासनाला शक्य होणार आहे. शासनाने नक्षलवाद संपवण्यासाठी सुरू केलेल्या कार्यवाहीत संपर्क यंत्रणा निर्माण झाल्यास अधिक बळ मिळेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या मुंबईतील मालमत्ता, मोबाईल टॉवर उभारणी, प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत भारत नेटच्या अंतर्गत निर्माण होणारी संपर्क यंत्रणा आदींबाबत सविस्तर चर्चा झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाबळेश्वर पर्यटन महोत्सव बोधचिन्हाचे अनावरण महाबळेश्वर येथे २ ते ४ मे दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
महाबळेश्वर पर्यटन महोत्सव बोधचिन्हाचे अनावरण
महाबळेश्वर येथे २ ते ४ मे दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन
मुंबई, दि. १ : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी २ ते ४ मे २०२५ या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, एमटीडीसीचे मुख्य लेखा वित्त अधिकारी जितेंद्र सोनवणे उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे २ मे २०२५ रोजी उद्घाटन होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. पर्यटन विभाग व स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय महोत्सवात प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला – संस्कृती, खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी आणि या माध्यमातून पर्यटन वृद्धी व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.
या महोत्सवात स्थानिक लोक संस्कृतीचा समावेश असलेले कार्यक्रम तसेच नामांकित कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, महाबळेश्वर परिसरातील उदा. पाचगणी, कास पठार, कोयनानगर, तापोळा, गड-किल्ले दर्शन व इतर पर्यटन स्थळ, दर्शन सहलीचे आयोजन, पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी करण्यात येणार आहे. पॅराग्लाडींग, पॅरामोटरींग, जलक्रिडा, ट्रेकींग, रॉक क्लायबींग, घोडेस्वारी आदी विविध साहसी उपक्रम राबविणे, स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन उभारणी, स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन उभारणी, महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत. या महोत्सवात विशेषतः देशांतर्गत विविध राज्यातील पर्यटन क्षेत्राशी निगडीत भागधारक, प्रवासी संस्थांचे प्रतिनिधी, ट्रॅव्हल एजेंट, टूर ऑपरेटर्स, सोशल मीडिया प्रभावक यांना आमंत्रित करुन त्यांचा समावेश असलेल्या परिचय सहलीचे आयोजन करण्यात येईल.
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाटात वसलेले हे एक गिरीस्थान आहे. हे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर समुद्रसपाटीपासून सुमारे ४,५०० फूट उंचीवर वसलेले आहे. जुन्या बॉम्बे प्रेसीडेन्सीची ही पूर्वीची ऊन्हाळी राजधानीचे ठिकाण होते. येथील विलक्षण हिरवळ सुंदर बागा आणि श्वास रोखून धरणारे दृश्य हे पर्यटकांना भुरळ घालतात. ब्रिटीश काळात बांधलेल्या असंख्य भव्य वास्तू आजही गत स्मृतींची आठवण करुन देतात. या ठिकाणी स्ट्रॉबेरी व्यतिरिक्त असंख्य नद्या, भव्य कॅस्केड, भव्य शिखरे, प्राचीन मंदिरे, बोर्डींग स्कूल, सुंदर आणि हिरवेगार घनदाट जंगल, धबधबे, टेकड्या व दऱ्यांसाठी देखील प्रसिद्धी आहे
पर्यटकांसाठी पर्यटन महोत्सव कालावधीत विविध श्रेणींतील निवास व्यवस्था उपलब्ध असून येथे ५० निवासी टेंट पर्यटक आणि मान्यवरांसाठी उपलब्ध होणार आहेत. ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि घोडेस्वारी यासारख्या साहसी उपक्रमांचा अनुभवही पर्यटकांना घेता येईल. तसेच, स्थानिक बाजारापेठांमध्ये फेरफटका, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीचा आस्वादही पर्यटकांना घेता येईल. रोजच्या दिनक्रमातून दूर जात अनुभवसमृद्ध पर्यटनासाठी हा महोत्सव उत्तम पर्याय आहे.
रिझर्व्ह बॅंक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ; डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआयचा महत्वाचा वाटा - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
रिझर्व्ह बॅंक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ;
डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात
आरबीआयचा महत्वाचा वाटा
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
मुंबई, दि. १ : भारत २०४७ मध्ये ‘विकसित भारत’ (Viksit Bharat 2047) होण्याच्या दिशेने पुढे जात असताना, अर्थव्यवस्थेतील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि समावेशक वित्तीय प्रणाली आवश्यक आहे. रिझर्व्ह बॅंक भारताच्या आर्थिक स्थैर्याचा आधारस्तंभ राहणार आहे. भारताला डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा वाटा आहे. मजबूत बँकिंग प्रणाली, वित्तीय नवउपक्रम आणि ग्राहकांचा विश्वास कायम राखण्याच्या दृष्टीने याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले.
एनसीपीए नरिमन पॉईंट येथे आयोजित रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ९०व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात राष्ट्रपती श्रीमती मुर्मू बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा उपस्थित होते.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ९०व्या वर्धापन दिनाचा उत्सव आज साजरा करत आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या प्रतिष्ठित संस्थेच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर ही देशातील सर्वात महत्त्वाच्या संस्थांपैकी एक आहे. देशाची केंद्रीय बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारताच्या अद्वितीय विकास प्रवासाच्या केंद्रस्थानी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील खडतर स्थितीपासून ते आजच्या जागतिक महासत्तेपर्यंतच्या प्रवासात आरबीआय हा महत्त्वाचा आधारस्तंभ राहिला आहे. १९३५ मध्ये स्थापन झालेली ही संस्था नेहमीच देशाच्या विकासाच्या प्रवासापेक्षा एक पाऊल पुढे राहिली असून या प्रवासात देशाचे नेतृत्वही केले असल्याचे राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या.
आरबीआय केवळ केंद्रीय बँक नसून वित्तीय समावेशन व संस्थात्मक उभारणीमध्येही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. संस्थात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून आरबीआय ने नाबार्ड, आयडीबीआय, सिडबी आणि नॅशनल हाऊसिंग बँक यांसारख्या महत्त्वपूर्ण वित्तीय संस्था स्थापन केल्या आहेत, ज्या शेती, लघु व्यवसाय आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी महत्त्वाचा पाठिंबा देतात. 'लीड बँक योजना'सारख्या उपक्रमांमुळे बँकिंग सेवा ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवण्यात मदत झाली आहे. आर्थिक समावेशनाच्या दिशेने आरबीआय ने प्रधानमंत्री जनधन योजनेसाठी अनुकूल धोरणात्मक वातावरण निर्माण केले आहे. विशेषतः, महिलांच्या मोठ्या संख्येने या योजनेत सहभागी होणे हा आर्थिक सक्षमीकरणाचा सकारात्मक बदल आहे.
डिजीटल व्यवहारांत देशाला जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात वाटा
भारताला डिजिटल व्यवहारांमध्ये जागतिक नेतृत्व मिळवून देण्यात आरबीआय चा मोठा वाटा आहे. युपीआय (UPI) सारख्या नाविन्यपूर्ण प्रणालींमुळे आर्थिक व्यवहार सहज, सुरक्षित आणि किफायतशीर झाले आहेत. याशिवाय, आरबीआय ने एक संपन्न वित्तीय-तंत्रज्ञान (Fin-Tech) पर्यावरण निर्माण करण्यासही मदत केली आहे. जसे-जसे भारत तंत्रज्ञानाधारित वित्तीय व्यवस्थेकडे वाटचाल करत आहे, तसे आरबीआय ग्राहक संरक्षण अधिक बळकट करत आहे आणि नव्या आव्हानांचा सामना करत आहे. आरबीआय ग्राहकांच्या विश्वासास प्राधान्य देत असून, ठेवीदारांसाठी विमा सुरक्षा, तसेच तक्रार निवारण यंत्रणा मजबूत करत आहे. 'एकात्मिक लोकपाल योजना' (Integrated Ombudsman Scheme) द्वारे ग्राहकांना तक्रार निवारणाची सुलभ आणि पारदर्शक सुविधा मिळत आहे.
वित्तीय साक्षरता ही ग्राहक संरक्षणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आरबीआयच्या विविध मोहिमा आणि प्रकाशने नागरिकांना वित्तीय व्यवहारांतील जोखीम समजावून सांगतात, फसवणुकीपासून वाचण्यास मदत करतात आणि सुज्ञ आर्थिक निर्णय घेण्यास प्रोत्साहन देतात. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसोबतच सायबर सुरक्षेच्या जोखमीही वाढत आहेत. त्यामुळे आरबीआय डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी सक्रिय पावले उचलत आहे. आरबीआय पर्यावरण पूरक धोरणांच्या दिशेने पावले उचलत आहे. हरित (ग्रीन) अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करताना आरबीआयने 'ग्रीन डिपॉझिट फ्रेमवर्क' आणि 'प्राधान्य क्षेत्र कर्जपुरवठा' (Priority Sector Lending - PSL) अंतर्गत हरित वित्तपुरवठा यासारख्या उपक्रमांद्वारे मोठे योगदान दिले आहे. आरबीआयने काळानुसार स्वतःला विकसित करत भारताच्या आर्थिक परिवर्तनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. महागाई नियंत्रण, वित्तीय समावेशन, आर्थिक स्थैर्य आणि मजबूत वाढ यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये त्याची भूमिका निर्णायक ठरली आहे.
गेल्या ९० वर्षांत आरबीआयचा प्रवास सरकारच्या दृष्टीकोन आणि धोरणांशी सुसंगत राहिला आहे. आर्थिक सुधारणांपासून स्थिरतेपर्यंत, सरकार आणि आरबीआय यांचे सहकार्य देशाच्या आर्थिक वाढीसाठी उपयुक्त ठरले आहे. केवळ एका स्वाक्षरीने आरबीआयच्या गव्हर्नरच्या स्वाक्षरीने एक साधे कागदाचे तुकडे चलन बनते. ही ताकद दुसऱ्या कोणाच्याही स्वाक्षरीला नाही. सर्वसामान्य नागरिकांना आरबीआय सोबत थेट संपर्क नसतो, परंतु त्यांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांमध्ये आरबीआयचा अप्रत्यक्षपणे प्रभाव असतो. गेल्या नव्या दशकांत आरबीआयने कमावलेली सर्वात मोठी संपत्ती म्हणजे जनतेचा विश्वास. हा विश्वास कायम राखण्यासाठी आरबीआयने नेहमीच स्थिरता, आर्थिक प्रगती आणि वित्तीय सुरक्षेच्या उद्दिष्टांवर भर दिला आहे. १९९० च्या आर्थिक उदारीकरणापासून कोविड-१९ महामारीपर्यंत आरबीआयने वेगवान आणि प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. तसेच, जागतिकीकरणाच्या काळातही देशाच्या वित्तीय व्यवस्थेची सुसूत्रता कायम राखली असल्याचे सांगून राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांनी रिझर्व्ह बॅंक व्यवस्थापनाचे अभिनंदन केले.
यावेळी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या योगदानाचे महत्व अधोरेखित करत जागतिक स्तरावर होत गेलेल्या गतीमान बदलांच्या पार्श्वभूमीवरही आरबीआयने आर्थिक बाबी नियंत्रित करण्यात ठामपणे बजावलेल्या कामगिरीचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष स्टॅम्पचे अनावरण ही करण्यात आले.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)













