संवेदनशीलता आणि शिस्तीतून लोकाभिमुख प्रशासन घडवा
* अमरावती विभागात 'महसूल दिन' उत्साहात साजरा
* उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार
अमरावती, दि. 01 : महसूल विभाग हा संपूर्ण शासनाचा कणा आणि मुख्य चेहरा आहे. सामान्य जनता शासनाचे प्रतिनिधी म्हणून महसूल प्रशासनाकडे पाहते. त्यामुळे या विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आपल्या वर्तनात शिस्त, संवेदनशीलता आणि सहानुभूती आणून लोकाभिमूख प्रशासन घडवावे, असे विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी आज येथे सांगितले.
1 ऑगस्ट 'महसूल दिना' निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी से.नि. अपर आयुक्त सुरज वाघमारे, अपर आयुक्त संजय जाधव, अपर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह विभागातील पुरस्कारार्थी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
विभागीय आयुक्त श्रीमती गुंडे म्हणाल्या की, महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य नागरिकांचा थेट संपर्क या विभागाशी येतो. 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान साजऱ्या होणाऱ्या महसूल सप्ताहाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत जलदगतीने पोहोचवावा. महसूल विभागात होत असलेले नवनवीन तंत्रज्ञान आणि डिजिटल बदल अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वेगाने स्वीकारून अधिक पारदर्शक व लोकाभिमुख काम करावे. डिजिटल सेवांचा प्रभावी वापर करून नागरिकांना सुलभ व पारदर्शक सेवा देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. महसूल विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी. या योजनांच्या फलश्रुतीची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यापक जनजागृती व प्रसिद्धी द्यावी.
त्या पुढे म्हणाल्या की, सध्या 'एल निनो'च्या परिणामांमुळे अत्यंत कमी दिवसांत अधिक पाऊस पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती विभागात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी येथील आपत्ती व्यवस्थापन केंद्र आणि बचाव पथकांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आपत्तीच्या काळात जिवाची पर्वा न करता नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांचा (Social Media) वापर करताना अत्यंत काळजी घ्यावी. आपल्या कोणत्याही कृत्याने शासनाची प्रतिमा डागाळणार नाही याची दक्षता बाळगावी.
सामान्य जनतेच्या प्रत्येक प्रश्नांचे निराकरण करणारा महसूल विभाग हा एकमेव विभाग आहे. नागरिकांच्या जीवनात विकासात्मक बदल घडवून आणण्यासाठी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी जबाबदारीपूर्वक कार्य करावे, असे से. नि. अपर आयुक्त सुरज वाघमारे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
योजना, धोरण, उपक्रम, शासन निर्णयांची अंमलबजावणी व महसूल गोळा करण्याचे महत्वपूर्ण कार्य करुन देशाच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण भूमिका निभावणारा विभाग म्हणून महसूल विभागाकडे पाहीले जाते, असे उपजिल्हाधिकारी विवेक जाधव यांनी सांगितले.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा विभागीय आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विभागीय आयुक्त कार्यालयातील सुरज वाघमारे (अपर आयुक्त), संतोष आठरे (तहसीलदार), मधुकर धुळे (नायब तहसीलदार), संतोष चव्हाण (निम्नश्रेणी लघुलेखक), उषा गवई (अव्वल कारकून), शशिकांत पाचघरे (महसूल सहाय्यक), संतोष चव्हाण (वाहन चालक), श्रीमती माया राजवाडे (शिपाई) या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.
तसेच विभागातील जिल्हाधिकारी कार्यालयातील गोविंद दाणेज (अपर जिल्हाधिकारी, अमरावती), शरद जावळे (उपविभागीय अधिकारी, अकोला), जीवन मोराणकर (तहसीलदार, चिखलदरा), अनिल वाडेकर (नायब तहसीलदार, वाशिम), श्रीमती विद्या गोमासे (लघुलेखक, यवतमाळ), अरुण कुकडे (सहा. महसूल अधि., अमरावती), कु. वर्षा ठाकरे (सहा. महसूल अधि. अकोला), चंद्रशेखर मनवर (मंडळ अधिकारी, वाशिम), श्रीमती अश्विनी फाटे (महसूल सहाय्यक, यवतमाळ), शैलेश घोगरे (ग्राम महसूल अधि, वाशिम), अतुल टाके (वाहनचालक, यवतमाळ), आकाश वानखडे (शिपाई, अमरावती), छत्रपती मडावी (महसूल सेवक, यवतमाळ), सौ. छायाबाई डहाके (पोलीस पाटील, वाशिम) या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे.
*******
.jpeg)
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा