गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२६

 

‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा

                      -अपर आयुक्त संजय जाधव

अमरावती, दि. 6 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वाटचाली निमित्त देशभरात दि. 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येणार आहे. आपल्या देशाच्या एकात्मतेचे आणि अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज प्रत्येक शासकीय कार्यालयांवर फडकावून या राष्ट्रीय उत्सवात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उर्त्स्फूतपणे सहभागी व्हावे, असे आवाहन अपर आयुक्त संजय जाधव यांनी आज येथे केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत श्री. जाधव यांनी हर घर तिरंगा मोहिमेच्या अनुषंगाने दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून विभागाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, शिक्षण, महिला व बालविकास, मनपा प्रशासन आदी विभागाचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

शासनाच्या सूचनेनुसार महापालिका आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने या अभियानाची व्यापक तयारी करण्यात येत आहे. शहरात महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या केंद्रात तसेच इतर ठिकाणी राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यासाठी विक्री आणि वितरण केंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच, नागरिकांमध्ये या उपक्रमाबाबत जनजागृती करण्यासाठी शिक्षण, महिला व बालविकास तसेच आरोग्य विभागाव्दारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्याचा हा सोहळा केवळ एक शासकीय उपक्रम नसून, प्रत्येक भारतीयाच्या असीम देशप्रेमाची ती एक अभिव्यक्ती आहे. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ होते. विभागातील प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या इमारतींवर तिरंगा फडकवून या चळवळीत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. जाधव यांनी यावेळी केले.

राष्ट्रध्वजाचा आदर राखून शासकीय कार्यालयाच्या इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवताना 'भारतीय ध्वज संहिते'चे तंतोतंत पालन केले जावे. ध्वज कुठेही फाटलेला किंवा मळलेला नसावा, तिरंगा उतरवताना त्याचा योग्य सन्मान राखला जावा आणि अभियान कालावधीनंतर ध्वज सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवावा, अशी काळजी घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

०००००० 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा