शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१९

शेतकऱ्यांना कर्जवाटपाची गती वाढवावी - किशोर तिवारी




शेतकऱ्यांना कर्जवाटपाची गती वाढवावी
   - किशोर तिवारी
Ø  विविध विभागांचा आढावा
Ø  पंधरा दिवसात पून्हा आढावा घेणार

अमरावती, दि. २ : राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. या कर्जमाफीमुळे राज्याने दिलेल्या पैशापेक्षा कमी कर्जवाटप झाले आहे. कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळणे गरजेचे आहे, यासाठी बँकांनी कर्जवाटपाची गती वाढवावी, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले.
आज विभागीय आयुक्त कार्यालयात विविध बाबींचा आढावा श्री. तिवारी यांनी घेतला. यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अकोलाचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, वाशिमचे जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक, मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिना, अकोलाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयूष प्रसाद आदी उपस्थित होते.
श्री. तिवारी म्हणाले, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळणे हा त्यांचा हक्क आहे. कर्जमाफीसाठी पात्र परंतू खात्यात अद्याप पैसे जमा झाले नसल्याने अनेक शेतकऱ्यांना कर्जवाटप झाले नसल्याने ते अडचणीत आले आहेत. याबाबत तालुका प्राधिकरणाकडे पाठपूरावा करण्याच्या सूचना राज्यस्तरीय बँकेच्या समितीने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष पैसा जमा होईपर्यंत त्या शेतकऱ्यांची क्षमता पाहून कर्ज द्यावे. कर्जवाटपाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी बँकांनी लवचिक धोरण स्विकारावे. बँकानी असहकाराचे धोरण स्विकारल्यास पतपूरवठ्याची समस्या निर्माण होईल.
पीक विमा हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. शेतकरी स्वत:हून हप्ता भरत आहेत. त्यांना विम्याची रक्कम मिळावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेतकरी आत्महत्येकडे मानवीय दृष्टीकोनातून पहावे. पात्र आणि अपात्र आत्महत्येमध्ये ज्यादा अंतर नसावे. कर्त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर त्या कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊन आत्महत्येच्या लाभाबाबत निर्णय घ्यावा.
ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यावर भर देणे गरजेचे आहे. आयूष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. आयूष्मान योजनेतील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना लाभ देण्यात यावा. तसेच ट्रामा केअर यूनिट आणि रूग्णालयासाठी लागणारे साहित्य तातडीने वाटप करण्यात यावे. सिंचनासाठी बळीराजा प्रकल्प राबविण्यात येत आहे. तसेच अन्नधान्य पूरवठा आणि गॅस जोडणी देण्यासाठी पुढाकार घ्यावा. तूर खरेदीचे पैसे वाटप करण्यात आले आहे. मत्स्य, दुग्ध व्यवसायामध्ये झालेली वृद्धी शेतकऱ्यांना फायद्याची ठरणार आहे. 

आढावा घेण्यात आलेल्या योजनांची प्रगती समाधानकारक होण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत. याबाबत १५ दिवसांनी पून्हा आढावा घेण्यात येईल, असेही श्री. तिवारी यांनी सांगितले.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा