गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९

शेतकऱ्यांनी किटकनाशके वापरताना काळजी घ्यावी


शेतकऱ्यांनी किटकनाशके वापरताना काळजी घ्यावी
अमरावती, दि. 22  : सध्याच्या हवामानातील बदलामुळे पिकांवर किड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. किड रोगांच्या नियंत्राणासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात किटकनाशकांची फवारणी करण्यात येते. किटकनाशकांच्या असुरक्षित हाताळणीमुळे शेतकऱ्यांना विषबाधा होऊ नये याकरीता किटनकनाशके हाताळतांना काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने कृषिविभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे.
किटकनाशकांचा वापर सुरु करण्यापूर्वी लेबलमधील दिशनिर्देश काळजीपूर्वक वाचावेत आणि त्यांचे अनुकरण करावे.त्यावरील चेतावणी आणि सावधगिरीकडे विशेष लक्ष द्यावे. किटकनाशकांच्या डब्यावरील मार्गदर्शक चिन्हाकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे. लाल रंगाचे चिन्ह/खुण असलेली औषधे सर्वात अधिक विषारी असून त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो. किटकनाशके थंड, कोरड्या आणि सुरक्षित जागी कुलूप लावून मुलांपासून दुर ठेवावीत. किटकनाशके नेहमी त्यांच्या मूळ डब्यात साठवावीत आणि कधीही ती खाद्य आणि खाद्य सामग्रीसह साठवू नये. किटकनाशकांचे रिकामे डबे, बाटल्या, खोकी इत्यादीचा पुर्नवापर करु नये. फवारणी करीता गळक्या फवारणी यंत्राचा वापर करु नये. किटकनाशके हाताळतांना सुरक्षिततेच्या दृष्टिने रबरी हातमोजे, लांब पॅट आणि लांब बाहीचे शर्ट वापरावेत तसेच पायात बुट, नाक व तोंडावर मास्क/रेस्पायरेटरचा वापर करावा. किटकनाशके वापरानंतर लगेच कपडे बदलवून हात धुवावेत. फवारणी वापरावयाची कपडे स्वतंत्र ठेवावीत तसेच, ती वेळोवेळी स्वच्छ धुवावीत. किटकनाशके विहिरी किंवा इतर जलस्त्रोताच्या जवळपास कधीही मिसळू नयेत अथवा त्याठिकाणी किटकनाशके वापरलेलीभांडी स्वच्छ करु नयेत. उघड्या हातांनी किटकनाशके कधीही ढवळू नयेत. त्याकरीता काठीचा वापर करावा तसेच किटकनाशकांचा वास घेणे टाळावे. किटकनाशकांचे शिल्लक द्रावण पडीक जमीनीत खड्डा करुन पुरुन टाकावे. बंद पडलेला नोंझल स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुंकू नये. त्यासाठी तार किंवा काडी किंवा टाचणीचा वापर करावा. रिकाम्या पोटी फवारणी करु नये. किटकनाशके वापरताना खाऊ, पिऊ किंव धुम्रपान करु नये. खाण्यापूर्वी किंवा पिण्याआधी हात आणि चेहरा धुवावा. किटकनाशक फवारणी नेहमी वाऱ्याच्या दिशेने करावी. किटकनाशक शरीरावर पडणार नाही याची काळजी घ्यावी. शरीरावर जखमा असलेल्या व्यक्तींनी किटकनाशके हाताळू नये. किटकनाशके फवारतांना आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन सुभाष नागरे, विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती विभाग अमरावती यांनी सर्व शेतकरी बंधूना केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा